‘वेळ कुठाय?’ या सर्रास ऐकू येणाऱ्या वाक्याबद्दल लिहायचं खूप दिवस मनात होतं. म्हटलं, आज लिहूच. वेळ नसणं ही जणू एक राष्ट्रीय समस्या आहे. कुणालाही कोणतंही काम सांगा- अनेकदा हे सहज सोपं उत्तर तयार असतं. आजकालचं युग धावपळीचं झालंय. सारे सदैव व्यस्त असतात. पण सगळे एवढे व्यस्त असतात का, की जरासुद्धा वेगळं काही करायला सवड नसावी त्यांना? तुम्हा मुलांच्या बाबत सांगायचं तर हे सर्वसामान्यपणे आढळणारं दृश्य आहे- शिक्षक किंवा पालक काही सांगू लागले किंवा सुचवू लागले की अनेकदा अनेक मुलं लगेच हा प्रश्न विचारतात, ‘‘वेळ कुठाय?’’ अभ्यास करायला वेळ नाही. सरावाला किंवा रियाजाला वेळ नाही. निसर्गात भटकायला वेळ नाही. झाडं लावायला वेळ नाही. वाचनाला तर वेळ नाहीच नाही. हे सर्वासाठी लागू नाही, पण दुर्दैवाने अनेकांसाठी लागू आहे हे वाईट, बरं का! हा तुमचा खूप मोठ्ठा हितशत्रू आहे. काय म्हणताय, आम्ही काय उगाच म्हणतोय का, वेळ नाहीय असं? तुम्ही उगाच म्हणत असालही किंवा नसालही, जे काही उत्तर असेल ते तुम्हीच ठरवा. त्यासाठी एक सोप्पं तंत्र वापरा. सकाळपासून प्रत्येक गोष्टीसाठी जेवढा वेळ लागला तो तेवढा आवश्यक होता का, की काही काळ वाया गेला हे शोधा. म्हणजे पहा हं, सकाळी दूध पिण्यासाठी पंधरा मिनिटं लागली, ते पाच मिनिटांमध्ये आटोपलं असतं. किंवा मित्र/ मत्रिणीशी फोनवर अर्धा तास बोललो/बोलले ते दोन मिनिटांमध्ये झालं असतं. आईने काम सांगितल्यावर वाद घालण्यात दहा मिनिटं घालवली; जर का कामच केलं असतं तर पाच मिनिटांचंच होतं. असं जर होत असेल तर दूध पितानाची दहा मिनिटं, फोनवरची पंचवीस मिनिटं, वादासाठीची दहा मिनिटं.. असा कित्ती वेळ आहे पहा बरं तुमच्याकडे! आणि तुमच्याबाबतीत खरंच जर का असं नसेल तर  सोप्पं आहे. आजचा ‘हा’ तुमचा हितशत्रू नाहीच आहे. मग पाठवताय ना प्रतिक्रिया. आहे की नाही वेळ की अजूनही ‘वेळ नाहीये?’

joshimeghana231@yahoo.in