02 March 2021

News Flash

शी बाबा कंटाळा!

मी या पहिल्या हितशत्रूपासून सुरुवात करणार आहे.

मित्रांनो, अनेकदा आपल्या अनेक पराभवांचं किंवा मानहानीचं कारण आपले ‘हितशत्रू’ असं आपण सांगतो. आणि हितशत्रू म्हणजे कोण? जे आपल्या हिताला बाधा आणतात ते शत्रू. आपल्या आजूबाजूला असतातच असे शत्रू. काही वेळा ते आपण चटकन ओळखतो, काही वेळा ओळख पटते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते; पण ते असतात. त्यांच्याशी आपल्याला सामना करावा लागतो हे शंभर टक्के सत्य आहे. पण फक्त तेच हितशत्रू आपल्या अहितासाठी टपलेले असतात असं नाही, तर काही हितशत्रू असे असतात जे आपणच निर्माण करतो, कळत किंवा  नकळत त्यांची जोपासना करतो आणि आपल्या हिताला बाधा आणायला आपणच कारणीभूत ठरतो. असे हितशत्रू म्हणजे आपली पालुपदं. आपलं प्रत्येकाचं काही ना काही पालुपद असतं आणि अनेकदा ते आपल्या हिताला मारक ठरत असतं. तर अशाच हितशत्रूंबाबत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत या वर्षभर. यात सगळीच पालुपदं येतील असं नाही, पण आपलं पालुपद ओळखायला आणि त्याला उखडून टाकायला याचा नक्कीच उपयोग होईल.

मी या पहिल्या हितशत्रूपासून सुरुवात करणार आहे. कारण हा माझा हितशत्रू मीच जोपासलेला अगदी लहानपणापासून! माझी लीलाताई मला- ‘शी बाबा कंटाळा’अशी हाक मारायची. या पालुपदाने माझं बरंच नुकसान केलं, म्हणजे माझं बरंच अहित साधलं म्हणून तो माझा हितशत्रू. कोणतंही काम याच पालुपदानं सुरू करायची सवय असल्यानं मी लहानपणी सगळीच कामं कंटाळत सुरू करीत असे आणि त्यामुळे कोणत्याही कामाचा आनंद मिळतच नसे. किंवा तो जर मिळाला तर मला तो घेता येत नसे. बरं, काम सांगणारा, कामात मदत करणारा, सहकार्य करण्याला उत्सुक असणारा नक्कीच कंटाळत असणार! आणि परत तो कंटाळा माझ्या प्रगतीला मारक ठरत होता, नक्कीच! ताईने जेव्हा भेटेल तेव्हा चिडवून, ओरडून माझं हे पालुपद काढून टाकलं आणि माझ्यात एवढा फरक झाला, की त्यानंतर मला जे ओळखू लागले, ते मला एक उत्साही मुलगी म्हणून ओळखत नि ओळखतात. बिच्चाऱ्यांना काय माहीत माझ्या या हितशत्रूबद्दल! पण जर वेळीच या हितशत्रूला मी हद्दपार केलं नसतं तर मी कायमच एक कंटाळवाणी आणि आळशी मुलगी म्हणून प्रसिद्ध झाले असते आणि त्याचा फटका मला कायम बसला असता.

मित्रांनो, मी सुरुवातीलाच माझ्या पालुपदाबद्दल सांगितलंय, कारण या हितशत्रूपासून मी मला सोडवून घेतलं म्हणून माझ्यातली टंगळमंगळ करायची वृत्ती पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्याचा मला कायमच फायदा झाला. जसं महात्मा गांधींनी स्वत: गूळ खायचा कमी करून इतरांना गूळ कमी खाण्याचा उपदेश केला, तसंच हे!

मेघना जोशी

joshimeghana231@yahoo.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 2:41 am

Web Title: meghna joshi story for kids
Next Stories
1 बाराशे दिवस!
2 डोकॅलिटी
3 लिंबू सरबत
Just Now!
X