19 November 2019

News Flash

तो/ती करतेय ते?

अनेकदा आपल्या अत्यंत जवळच्या माणसांनी, म्हणजे- आई-बाबा, काका-काकू, आजोबा -आजी, ताई-दादा वगैरेंनी एखादी गोष्ट करू नको!

अनेकदा आपल्या अत्यंत जवळच्या माणसांनी, म्हणजे- आई-बाबा, काका-काकू, आजोबा -आजी, ताई-दादा वगैरेंनी एखादी गोष्ट करू नको! असं सांगितल्यावर बचावात्मक पवित्र्यात वापरलं जाणारं हे वाक्य म्हण्जे- ‘तो/ती करतेय ते?’ याचा अर्थ असा असतो की, मी करतो ते तुम्हाला चालत नाही, पण तीच गोष्ट वा कृती त्या दुसऱ्या कोणी केलेली मात्र तुम्हाला चालते. एकतर तुम्ही दुजाभाव करताय असं म्हणायचं असतं; किंवा तुम्ही सगळे मलाच उपदेश करता किंवा माझ्यावरच बंधनं लादता असं म्हणायचं असतं. म्हणजे थोडक्यात, माझ्यावर अन्याय कसा होतोय असं सांगणं असतं. पण खरंच असतो का हा अन्याय अगर बंधन वा उपदेश? दुसरा जो कोणी असतो/ असते, तो/ती जे काही करत असतात तेही या ‘आपल्या’ माणसांना पसंत नसतं, पण ते तसं सांगण्याएवढी आपुलकी किंवा जवळीक नसते त्याच्याशी/तिच्याशी; पण तसं वागणं तुमच्यासाठी हानीकारक आहे हे सांगण्याचा तुमची जवळची, प्रेमाची माणसं म्हणून त्यांना नक्कीच अधिकार असतो. त्या आपुलकीपोटी, प्रेमापोटीच ते तुम्हाला तसं न करण्याचा सल्ला देत असतात. या आपुलकीवर, प्रेमावर संशय घेत जर का तुम्ही असं भाष्य करत राहिलात तर तुमच्या या ‘आपल्या’ माणसांची आपुलकी गमावून बसाल आणि ते तुमच्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच या हितशत्रूपासून तुम्ही जाणीवपूर्वक दूर राहिलं पाहिजे. ज्या ज्या वेळी हा शत्रू डोकं वर काढेल तेव्हा तेव्हा जे कोणी सल्ला देणारे असतील त्यांच्याशी मोकळेपणाने आणि सौजन्याने बोललं पाहिजे. म्हणजे मग आपोआपच तो/ती जरी ते करत असतील तरी ते तुमच्या हिताचं किंवा सुखाचं नसेल तर तुम्ही करणं किती चुकीचं आहे याची जाणीव तुम्हाला त्या संवादातून होईल. आणि ते तुमच्यावर अन्याय करत नाहीएत, दुजाभाव करत नाहीएत किंवा बंधनं लादत नाहीएत; तर तुमचं हितच पाहतायत हे तुम्हाला आपोआपच पटेल.

– मेघना जोशी

joshimeghana231@yahoo.in

First Published on April 15, 2018 12:15 am

Web Title: meghna joshi story for kids 2
Just Now!
X