18 January 2019

News Flash

जमेल?

अनेकांना कुठल्याही कामाचा श्रीगणेशा करण्याआधी ‘जमेल मला?’

|| मेघना जोशी

joshimeghana231@yahoo.in

 

अनेकांना कुठल्याही कामाचा श्रीगणेशा करण्याआधी ‘जमेल मला?’,असा प्रश्न विचारायची सवय असते. आणि गंमत म्हणजे, खूप वेळा हा प्रश्न इतरांना न विचारता ते स्वत:लाच विचारतात आणि त्याचं ‘छे! कसं जमेल तुला, जमणारच नाही, अशक्यच आहे हे तुझ्यासाठी,’ असं उत्तर स्वत:चं देत त्या कामातून अंग काढून घेतात.

आत्मविश्वासाला सुरुंग लावणारा सामान्यत: विचारला जाणारा हा प्रश्न खूप मोठ्ठा हितशत्रू. सुरुवातीलाच रोखणारा, धाडसाला हाणून पाडणारा असा हा आपण उभा करत असलेला ब्रह्मराक्षस. हा अक्राळविक्राळ राक्षस आपल्याला अनेक नवीन क्षेत्रांमधल्या प्रवेशासाठीच प्रतिबंध करतो, त्यामुळे आपण अनेक नवनवीन गोष्टींनाच कायमचे मुकतो. अनेकदा साध्याच्या शेवटच्या टप्प्याचा विचार करत सुरुवातच न करण्याच्या निर्णयाप्रत आपल्याला आणण्यासाठी हा कारणीभूत ठरतो. पण याला नामोहरम करण्यासाठी आपण एक सुंदर चाल खेळू शकतो बरं का! म्हणजे एखादा निबंध लिहिण्यापूर्वी समजा हा प्रश्न तुमच्या मनात आला, तर म्हणा, ‘पाहू जमतं का, पहिला परिच्छेद म्हणजे प्रस्तावना तर पूर्ण करतो.’ त्यानंतर परत जर का याने डोकं वर काढलं तर म्हणा, ‘मधले विषयाच्या गाभ्याचे एकदोन परिच्छेद तर संपवून पाहतो.’ शेवटी जर का हा डोकावलाच तर म्हणा, ‘आता काय शेवटच आलाय तो तर जमेलच.’ हे फक्त निबंधाबाबतच नाही, निबंधाचं फक्त उदाहरण. पोहायला, धावायला, नाचायला, बोलायला, लिहायला, प्रयोग करायला, शिवणकाम किंवा भरतकाम करायला, प्रवास करायला, स्वयंपाक करायला किंवा अशा कोणत्याही कामादरम्यान ‘मला जमेल?’. असं जर का वाटायला लागलं तर ‘जमेल जमेल’ असं प्रयत्नपूर्वक म्हणत भीती दाबायचा विचार केलात तर ती आणखीनच उफाळेल; याउलट एक एक पायरी जमवत गेलात तर नंतर याचं अस्तित्वच तुमच्या लक्षात येणार नाही. मग करणार ना या प्रश्नाचा पायरीपायरीने पराभव?

First Published on April 29, 2018 12:05 am

Web Title: meghna joshi story for kids 3