अनेक जणांना काहीतरी काम सांगितलं की ओठावर येणारा वा मनात येणारा हा सहजोद्गार- ‘मी?’ किंवा ‘मी..?’ असं जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा एकतर तो त्या कामासाठी स्वत:ला खूप कमी लेखत असतो, किंवा ते काम स्वत:च्या क्षमतेपेक्षा खूपच कमी दर्जाचे आहे, असा त्याचा समज असतो. या दोन्ही समजातून येणारा हा सहजोद्गार. पण एकदम असा समज करून घेणं किंवा समोर आलेल्या कामावर पटकन् असा शेरा मारणं खूपच हानीकारक असतं. म्हणजे पहा हं, जर काम पूर्ण करणं आपल्या क्षमतेपलीकडचं आहे असं समजून ‘मी?’ असा प्रश्न विचारत असाल तर तुम्ही एका मोठ्ठय़ा संधीला मुकत आहात. आपल्या क्षमतेपेक्षा थोडंसं मोठ्ठं काम स्वीकारणं, त्यासाठी अचूक मार्गदर्शक शोधणं, त्यांची मदत मिळवणं आणि ते काम पूर्णत्वाला नेणं ही आत्मविश्वास जोडण्याची खूप मोठी संधी आहे. ‘मी?’ असा प्रश्न विचारताना संधी सुरुवातीलाच उखडून टाकतोय हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर काम कमीपणाचं समजून तुम्ही ‘मी..?’ हा प्रश्न विचारत असाल तर कामापेक्षा आपली क्षमता जर का जास्त असेल, तर ते काम तुम्ही त्या क्षमतेपर्यंत नेऊन स्वत:ला सिद्ध करू शकता. म्हणजे काम सोपवणारा त्यानंतर तुम्हाला असं कमी दर्जाचं काम सोपवताना दहादा विचार करेल. मग आता असं करून पहा बरं.. ज्यावेळी ‘मी?’ किंवा ‘मी..?’ असा प्रश्न विचारावासा वाटेल तेव्हा ‘मीच का?’ असा प्रश्न सकारात्मक विचार ठेवून विचारा. आणि ‘मी?’ किंवा ‘मी..?’ हा प्रश्न गिळून टाका आणि ‘मीच का?’ याचं उत्तर कृतीतून देण्यासाठीचा योग्य मित्र अथवा मार्गदर्शक शोधा नि लागा कामाला. पुढचं सारं काळावर सोपवून टाका आणि बघा!

मेघना जोशी

joshimeghana231@yahoo.in