खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दहिवली नावाचं एक गाव होतं. या गावात राहणारे बरेचसे लोक सधन शेतकरी व सावकार होते. त्यामुळे हे गाव फार समृद्ध होतं. एके वर्षी गावात मुबलक पाऊस पडला. अमाप धान्य पिकलं. सर्वत्र आनंदी आनंद पसरला. सावकार मालामाल झाले आणि त्यांनी ठरवलं की, या वर्षी गावातल्या गणेश मंदिरात भव्य उत्सव करायचा. श्रीमंतांची पूजा; त्यामुळे थाटमाटही श्रीमंती होता. सोन्याच्या समया, चांदीचे दिवे अन् चंदन -कस्तुरीचा दरवळ. अहाहा! दहिवलीचं गणेश मंदिर लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने सोन्यासारखं लखलखत होतं. साजूक तुपातल्या मिठाईचा सुवास सर्वत्र भरून राहिला होता. थोडय़ाच अवधीत पूजेला सुरुवात होणार होती.

गावाच्या एका बाजूला गरीबांची वस्ती होती. पूर्ण दिवस कष्ट करायचे, धनिकांच्या शेतात राबायचं आणि चरितार्थ चालवायचा, हे त्याचं आयुष्य. तिथेच एका चंद्रमौळी झोपडीत एक म्हातारी राहायची. म्हातारी निराधार होती. त्यामुळे या वयातही भाजी, फुलं असं काहीबाही विकून पोट भरायची. मिळालेल्या पैशात म्हातारीचं कसंबसं भागायचं. पण तरीही आपल्या ताटातला घास ती मुक्या पाखरांना घालायची. सर्वाशी प्रेमाने वागायची आणि देवाचं नामस्मरण करून दिवस साजरा करायची.

त्या दिवशी भल्या पहाटे म्हातारीने अंघोळ-पाणी आटपलं आणि पूजासाहित्य घेऊन ती मंदिराच्या दिशेने निघाली. मंदिरात भक्तजनांची ही गर्दी जमली होती. सावकार व इतर धनिकांची व्यवस्था सभामंडपात करण्यात आली होती आणि म्हातारीच्या वस्तीतले लोक मात्र अंगणात एका बाजूला उभे होते. थोडय़ा वेळाने पूजेचा मुहूर्त झाला. मंदिरातले नगारे वाजू लागले तशी या साऱ्यांनी मंदिरात जाण्यासाठी एकच गर्दी केली. पण मस्तवाल सावकारांनी धक्के मारून त्यांना हाकलून लावलं. बिचारे खूप दु:खी झाले. पण काय करणार? खाली मान घालून चुपचाप आपापल्या घरी परतले.

घरी आल्यावर म्हातारीने शांत मनाने पूजेची तयारी सुरू केली. अंगणातल्या जास्वंदीचा हार केला, निरांजन लावलं आणि गूळ-खोबरं घेऊन ती पूजेला बसली. मंदिरातला श्रीमंती थाटमाट तिने बघितला होता, त्यामुळे प्रसाद म्हणून देवापुढे एक लाडू तरी ठेवायला हवा, या विचाराने उदास होऊन ती म्हणाली, ‘‘देवा, तुझ्यापुढे नैवेद्य म्हणून लाडू-मिठाई ठेवायची इच्छा होती, पण काय करू? माझ्यापाशी फक्त हे गूळ-खोबरं आहे. ते गोड मानून घे.’’ असं म्हणून तिने मनोभावे हात जोडले. आणि तिथे मंदिरात काय झालं माहीत आहे? गाभाऱ्यातली गणेशमूर्ती अदृश्य झाली. ‘‘अरे बापरे, हा काय चमत्कार? आता काय करायचं?’’ सारे गडबडले. एकच गोंधळ माजला. घाबरलेल्या सावकारांनी भराभरा आपले रथ जोडले अन् शोधाशोध सुरू झाली.

शोधत शोधत सारेजण गावातल्या त्या गरीब वस्तीपाशी आले. दुरूनच त्यांना एका चंद्रमौळी झोपडीत अलौकिक प्रकाश पसरलेला दिसला. मोठय़ा कुतूहलाने ते सारेजण झोपडीपाशी आले आणि पाहतात तो काय! ती गरीब म्हातारी स्वत:च्या हाताने बाप्पाला भरवीत होती आणि जास्वंदीच्या लालचुटूक फुलांनी अन् हिरव्यागार दुर्वानी सजलेला बाप्पा मोठय़ा आनंदाने गूळ-खोबरं खात होता. ती एवढीशी जीर्ण झोपडी दिव्य सुगंधाने दरवळत होती. ते दृश्य बघून सावकार शरमले आणि त्यांनी हात जोडून देवाची क्षमा मागितली. तसा बाप्पा म्हणाला, ‘‘भक्तजनहो, मी भावभक्तीचा भुकेला आहे. मला श्रीमंती थाटमाट नकोत. मला हवी- खरी श्रद्धा व माणुसकी! ही म्हातारी फार गरीब आहे. पण त्याही परिस्थितीत ती मुक्या पाखरांना जेऊ घालते. सर्वाशी प्रेमाने वागते. आणि म्हणून मी तिच्यावर प्रसन्न झालो आहे. आजपासून मला लाडू-मिठाईचा नाही, तर गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जाईल.’’ एवढं सांगून श्रीगणेश अंतर्धान पावले.

त्या दिवसापासून गणपतीबाप्पाला गूळ -खोबऱ्याचा म्हणजे मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. मुलांनो, देवाची पूजा म्हणजे उंच उंच मूर्ती व आरत्यांच्या दणदणाट नाही, तर खरी श्रद्धा व माणुसकी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा!

माधवी सावंत