‘‘किंवा हे बघा, मी काय म्हणतोय ते पाहा..’’ तुम्ही बोलताना अनेकदा अशी सुरुवात करता का? अशा प्रकारची पाहण्याच्या संदर्भातील वाक्ये तुमच्या बोलण्यात वारंवार डोकावतात का? हो, हो.. कदाचित तुम्हाला नाही शोधता येणार. मग घ्या ना इतरांची मदत! विचारा ना त्यांना- असं बोलत असता का तुम्ही? आणि त्याबरोबरच इतर काही गोष्टींचाही विचार करायला हरकत नाही.
गेल्या लेखांकामध्ये म्हटल्याप्रमाणे टी.व्ही. पाहून झाल्यावर त्यातलं दृश्य प्रामुख्याने लक्षात राहतं का तुमच्या? तुम्ही थोडीशी ओळख झालेल्या माणसांना त्यांच्या नावांपेक्षा त्यांच्या चेहऱ्याने जास्त लक्षात ठेवता का? तुम्ही एखादा पत्ता सांगताना किंवा समजून घेताना त्याच्या जवळपासच्या ठळक खुणा डोळ्यासमोर आणून तो सांगू किंवा समजून घेऊ शकता का? एखादा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला त्यातील प्रसंग संगीताच्या तुलनेत जास्त लक्षात राहतात का? किंवा पुन्हा त्या गाण्याच्या ओळी ऐकल्यावर त्या व्हिडीओमधील दृश्य तुमच्या डोळ्यांसमोर तरंगतात का? तुम्ही अभ्यास करताना वाचण्यावर, ऐकण्या लिहिण्यापेक्षा जास्त भर देता का? समजा तुम्ही बसस्टॉपवर किंवा एखाद्या दुकानात उभे आहात तर तुम्ही आजूबाजूच्या वस्तू न्याहाळण्यात वेळ घालवता का? एखाद्या समारंभासाठी जाऊन आल्यावर पुन्हा त्या समारंभाची आठवण आली तर तुमच्या डोळ्यांसमोर तिथली दृश्ये प्रामुख्याने तरळतात का? आता शेवटची आणि छोटीशी गोष्ट मोबाइलवर कुणाचा फोन आला किंवा तुम्ही कुणाला फोन केला तर असं होतं का पाहा बरं! त्या व्यक्तीचा चेहरा किंवा ती वर्णन करत असलेली परिस्थिती तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहते. यातल्या जर अनेक बाबी तुमच्या बाबतीत घडत असतील तर फक्त त्या नमूद करून ठेवा. कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई आता करायची नाहीए. कारण अजून पुढचे लेखांकही वाचायचेत नं!
मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com