‘‘सारंग, ओवी, अथर्व, श्रेयस.. चला येताय ना खेळायला?’’ शार्दूल सगळ्या मुलांना खेळायला बोलवत होता. ‘‘भूमी, स्वरा, राकेश, रसिका, चला. तुम्हीही या खेळायला..’’ रोज संध्याकाळी खेळायची वेळ झाली की मुलं एकमेकांना जोराने हाका मारून बोलावतात. त्यांच्या आवाजानं सोसायटी दणाणून जाते. मुलं उत्साहाने रोज एकत्र जमतात आणि मैदानी खेळ खेळतात. फुटबॉल, क्रिकेट, तर कधी बॅडमिंटन, लपाछपी असे वेगवेगळे खेळ. कधी छान गप्पा मारतात. कधी भांडत, तर कधी चढाओढीनं खेळणाऱ्या मुलांना खेळाचं मैदान एकत्र आणतं म्हणून सोसायटीतल्या या मैदानालाही कधी कधी हेवा वाटायचा. मनानं आणि शरीरानं निरोगी राहण्यासाठी मुलं खेळतात. मोबाईल, टीव्ही सोडून सगळी मुलं मैदानात येतात याचाच आनंद होता.

आज मात्र श्रेयसनं खेळायला येणार नाही म्हणून सांगितलं. ‘का नाही येत तू?’ असं विचारायला सगळी मुलं त्याच्या घरी गेली. ‘काकू, श्रेयस का नाही येत खेळायला?’ असा सगळ्या मुलांनी प्रश्न विचारला. ‘अरे मुलांनो, त्याची परीक्षा आलीय ना जवळ! आणि तुमच्याही परीक्षा आता सुरू होतील ना? आता खेळायचा वेळ थोडा कमी करून अभ्यास करा. चांगला अभ्यास करून उत्तम मार्क्‍स मिळवायचे आहेत ना तुम्हाला?’’ आई म्हणाली.

‘‘अरे, काय यार या परीक्षेची कटकट! सगळ्या आई-बाबांना आमच्यापेक्षा त्या परीक्षेचंच कौतुक!’’ ओवी चिडक्या स्वरात म्हणाली. लगेच राकेशनंही सूर काढला, ‘‘नाहीतर काय! सारखं एकच ऐकायचं- ‘परीक्षा आलीय.. अभ्यास कर. टीव्ही कमी बघ. मोबाईलला हात लावू नकोस. कित्ती वेळ झोपतोस?’ असं माझ्याही आईचं पालुपद सारखं सुरू असतं.’’

तशी श्रेयसची आई समजावणीच्या स्वरात म्हणाली, ‘‘अरे, मुलांना चांगले मार्क्‍स मिळाल्यावर आम्हाला जसा आनंद होतो तसा तुम्हालाही होतोच की नाही?’’

‘‘नाही काकू. मला वाटतं, आमच्यापेक्षा आई-बाबांनाच जास्त कौतुक असतं परीक्षेचं. मला अथर्व सांगत होता की, त्यानं दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्‍स मिळवले तर त्याचे बाबा त्याला अमेरिकेला घेऊन जाणार आहेत. आणि ती स्वरा सांगत होती.. तिला बारावीला नव्वद टक्के मिळाले तर तिचे बाबा तिला गाडी घेऊन देणार आहेत. आणि यशला चांगले मार्क्‍स मिळाले तर त्याची आई त्याला मोठ्ठा मोबाईल घेऊन देणार आहे.’’ भूमी म्हणाली.

‘‘कुणाला मोबाईल मिळणार आहे?’’ असं म्हणत देवळातून आलेली आजी खुर्चीत बसली. तसा मुलांनी एकच गोंधळ केला आणि ‘श्रेयस परीक्षा आहे म्हणून खेळायला येत नाही,’ अशी एकच तक्रार केली. तशी आजी रागाच्या सुरात म्हणाली, ‘‘श्रेयस, तू खेळायला का जात नाहीस? परीक्षा आली म्हणून खेळणं थांबवण्यापेक्षा खेळायचा वेळ कमी करायचा. अभ्यासाच्या ताणातून मोकळं होण्यासाठी बदल म्हणून थोडा वेळ खेळ, टीव्ही बघणं, अवांतर वाचन, थोडं निवांत फिरणं यात वेळ घालवायला हवा. म्हणजे मग मनावर ताण येत नाही आणि शरीरावरसुद्धा! आणि काय गं ओवी, मार्क्‍स मिळवण्यासाठी आई-बाबांना अटी नाही घालायच्या हं. हे बक्षीस हवं आणि ते मिळायला हवं म्हणून. अरे, चांगले मार्क्‍स मिळाले तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार असतो भविष्यात. ‘मी पास झालो, चांगले मार्क्‍स मिळाले,’ असं सांगताना तुम्हालाही आनंद होतोच की! त्यासाठी आई-बाबांशी करार कशाला करायचा? ’’

तिथेच भाजी निवडत असलेली श्रेयसची आई म्हणाली, ‘‘अरे बाळांनो, परीक्षा ही आपल्याला सतत अभ्यासू ठेवते. म्हणूनच ती आपली चांगली मैत्रीण आहे असं तुम्हाला वाटायला हवं. परीक्षेचा बागुलबुवा कशाला करायचा? तिची भीती वाटण्यापेक्षा ‘माझा अभ्यास छान झालाय.. तो कितपत झालाय हे कळण्यासाठी परीक्षा आहे!’ असं वाटायला हवं तुम्हाला. आणि बरं का बाळांनो, अभ्यासासाठी भरपूर कष्ट करायचे. परंतु तरीही मार्क्‍स कमी पडले तर नाराज नाही व्हायचं. आपल्याला इतर अनेक आवडी, छंदही असतात. काही वेळा त्यात आपण रमतो. उत्तम प्रगती करतो. फक्त परीक्षेचा बाऊ करता कामा नये. इतर अनेक कला, वेगवेगळी माध्यमं यांतलं यशही महत्त्वाचं असतंच की! परीक्षा ही प्रत्येक क्षेत्रातल्या आपल्या मूल्यमापनासाठी असते, हे लक्षात ठेवायचं.’’

‘‘हो, आमच्या बाईसुद्धा सारखं हेच सांगतात. परीक्षेला आनंदानं आणि आत्मविश्वासानं सामोरं जा. काही मुलं परीक्षेला घाबरून आजारी पडतात. काही मुलं भीतीनं झालेला अभ्यासही विसरतात असं बाई सांगत होत्या.’’ ओवी म्हणाली.

‘‘अरे मुलांनो, वर्षभर नियमित अभ्यास केला, वर्गात शिकवताना लक्ष दिलं आणि नवं काहीतरी शिकायला मिळेल अशी भावना ठेवली की मग कंटाळा नाही येत परीक्षेचा. उलट आनंदच वाटतो. गणित बरोबर आलं, उत्तर अचूक देता आलं की उत्साह वाढतो!’’ आजी हे सांगत असतानाच सारंगनं विचारलं,

‘‘आजी, वर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षा केवळ तीन तासांत घेतली जाते. तेव्हा जर आठवलंच नाही तर..?’’

मुलांच्या हातात द्राक्षाच्या वाटय़ा देत आई म्हणाली, ‘‘बरं का रे, म्हणूनच अभ्यास नीटनेटका करायचा. त्या तीन तासांत तुम्ही किती मुद्देसूद उत्तरं लिहिता, अक्षर किती छान काढता, वेळेचं नियोजन करून पेपर कसा पूर्ण सोडवता याचीच तर ती परीक्षा असते. म्हणूनच लेखनाचा सराव करायचा. आणि बरं का रे सारंग, तुम्हाला सगळ्यांना सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन यांच्यासारखी कर्तृत्ववान मंडळी आवडतात ना. पण बघ नं- खेळाडू किती सराव करतात. पण मॅचच्या वेळची त्यांची कामगिरी ही त्यांची परीक्षाच असते. गायक रोज रियाज करतात. मैफल गाजवणं ही त्यांच्यासाठी परीक्षाच असते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांना ‘अग्नि’-‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राच्या उड्डाणाआधी केवढी तयारी करायला लागली. अरे, कोणत्याही क्षेत्रात कष्ट करायची तयारी हवी, मग परीक्षेत यश मिळतंच. आता माझंच बघ ना! स्वयंपाकाच्या तयारीला किती वेळ लागतो. तरीही प्रत्यक्षात स्वयंपाक चांगला करणं, सर्वाच्या आवडीचा करणं ही माझ्यासाठी रोज परीक्षाच असते ना! नाहीतर एवढा मनापासून केलेला स्वयंपाक तुम्हाला आवडला नाही, तुमचं पोट भरलं नाही तर आई नापास. हो की नाही?

‘‘नाही हो काकू, आमच्या परीक्षेत आणि तुमच्या परीक्षेत फरक आहे. शाळेच्या परीक्षेत कधी कधी मुलं कॉपी करतात. अभ्यास न करता त्यांना चांगले मार्क्‍स मिळतात. मग आम्ही कष्ट करून मिळवलेल्या मार्काना काय महत्त्व उरणार?’’  शार्दूल म्हणाला.

‘‘तसं नाही रे बाळा.’’ श्रेयसची आई शाळेत शिक्षिका असल्याने ती मुलांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देत होती- ‘‘मुलांनो, कॉपी करणं वाईटच रे. काही मुलं आजूबाजूच्या मुलांना उत्तरं विचारतात तेव्हा त्यांना हळूच उत्तरं सांगणाऱ्या मुलांची चूक आहे. अभ्यास आपण केलेला असतो. त्याचे मार्क्‍स मी इतर मुलांना का मिळवून द्यायचे? असा विचार उत्तर सांगणाऱ्या मुलांनी केला पाहिजे. कधी बारीक अक्षरांत पायावर लिही, कागदावर लिही.. अशी कॉपीसाठीची मेहनत करतात ही मुलं. पण अभ्यास मात्र नको करायला. त्यांना लाज, भीती कशी वाटत नाही याचंच आश्चर्य वाटतं.’’

‘‘असं कॉपी करण्यापेक्षा मला अभ्यास केलेलाच आवडतो. परीक्षा खूप आवडते मला. एकलव्याला नाही का- फक्त झाडावरच्या पोपटाचा डोळा दिसत होता.. तशी मला परीक्षा दिसते.’’ रसिकाच्या या बोलण्यावर ‘हो स्कॉलर!’ असं म्हणत सगळे हसायला लागले.

आजी हसत हसत रागावत म्हणाली, ‘‘अरे हसताय काय? तिचं बरोबरच आहे. आपण केलेल्या अभ्यासानं आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचता येतं. परीक्षेमुळे एकाग्रता वाढते. स्मरणशक्तीचं महत्त्व कळतं. शांत वातावरणात सलग तीन तास पेपर लिहिल्यानं स्थिरता वाढते. म्हणून परीक्षेचं महत्त्व ओळखा आणि आनंदानं परीक्षेला सामोरं जा. अभ्यास करा. पण त्याचा ताण मात्र नाही घ्यायचा!’’

सगळ्या मुलांनी ‘हो’ म्हणत होकारार्थी मान डोलावली. यानिमित्तानं मुलांशी परीक्षेविषयी बोलता आलं म्हणून आई खूश होती. तिनं सगळ्या मुलांना शुभेच्छा दिल्या.

‘‘काकू, परीक्षा झाल्या की सुटीत आम्ही  पार्टी करणार.’’ रसिकानं हे जाहीर करताच आई म्हणाली, ‘हो गं रसिका.. नक्की! मस्त पार्टी करा. पण तू आणि तुम्ही सगळ्या मुलांनी परीक्षा ‘माझी’ आहे हेही लक्षात ठेवायचं. ज्या ज्या गोष्टी माझ्या आहेत असं आपण समजतो त्या गोष्टींवर खूप प्रेम करतो आपण, हो ना? म्हणजे ‘माझी आई’, ‘माझी शाळा’, ‘माझी खेळणी’, ‘माझी स्कूल बॅग.’ या गोष्टी आवडतात आपल्याला. तशीच परीक्षासुद्धा ‘माझी’ आहे असं मानलं ना की ती आनंददायी होईल सर्वासाठी. हो ना! चला, पळा आता सगळे. भरपूर अभ्यास करा आणि मनापासून करा. पण रिलॅक्स व्हायला थोडं खेळासुद्धा! तुम्हा सर्वाना परीक्षेसाठी ‘ऑल दी बेस्ट’! ‘थँक्यू’ म्हणत पोरांनी धूम ठोकली.

– मीरा कुलकर्णी

meerackulkarni@gmail.com