|| मीरा कुलकर्णी

‘आजी, आम्ही आलोऽऽऽ’ असं म्हणत रिक्षातून बॅगा काढायच्या आधीच मुलांनी घराकडे धूम ठोकलीसुद्धा! मुलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आजी ‘या रे बाळांनो, केव्हाची वाट बघतेय,’ असं म्हणत लगबगीनं हातात पाण्याचा तांब्या आणि तांदळाची वाटी घेऊन दारात आली. ‘अरे, थांबा बाहेरच’ म्हणत आजीनं मुलांच्या पायावर पाणी घालून तांदूळ ओवाळून टाकले आणि मुलांना आत घेतलं. आजोळी आली होती ना मुलं! आजीचं असं ओवाळणं मुलांना खूप आवडायचं आणि आजीला नातवंडांचं कौतुक वाटायचं. मुलं आत येताच आजीला आणि मामीला बिलगली. ‘अरे! आई-बाबा कुठं आहेत?’ असं मामीनं विचारल्यावर ‘अगं, रिक्षातून सामान उतरवतायत,’ असं हसत उत्तर देत मुलं घरभर नाचायला लागली.

या वर्षी सगळ्या आते-मामे भावंडांनी सुटीमध्ये एकत्र जमायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे श्रेयस, तनीशा, राही, इरा, केदार सगळे मिळून सुटीला आजीकडे आले होते. ‘ए आजी, आता सुटीत आम्ही आराम करणार हं! मस्त खेळणार, टी.व्ही. बघणार, निवांत झोपणार..’ मुलं आपला कार्यक्रम सांगत होती. तेवढय़ात ‘अरे, आई-बाबांना सामान उचलायला मदत करा, पळा..’ असं मामीनं सांगताच मुलं पटकन् पळाली आणि सामान घेऊन आली.

सुटीला मुलं आल्यानं आजीचं घर गजबजून गेलं होतं. ‘चला हात-पाय धुवा.. चहा घ्यायचाय. आणि भूक लागली असेल नं? नाश्ता पण करायचाय. चला, आवरा पटापट. खाताना गप्पा मारू.’ आजीनं असं सांगताच मुलं छान आवरून आली. मामीनं मुलांसाठी छान गरमागरम इडली- सांबार आणि चटणीचा बेत केला होता. सगळे नाश्त्याच्या निमित्ताने निवांत एकत्र बसले. ‘आजी, या वर्षी आम्ही आधीच आई-बाबांना सांगितलं होतं- आम्ही कोणत्याही क्लासला, शिबिराला जाणार नाही म्हणून.’ श्रेयस म्हणाला.

‘हो आजी, आम्हाला तुझ्याकडेच सुटीला यायचं होतं.’  छोटीशी इरा गाल फुगवत म्हणाली.

‘नाही तर काय! आता शाळा नाही म्हणजे अभ्यासाची कटकट नाही. आम्हाला रोजच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळा आलाय म्हणून निवांत सुटी हवीय आम्हाला.’ केदार बोलत असतानाच सगळ्यांच्या माना होकारार्थी हलत होत्या.

‘हो, पण मामीला, आजीला मदत करायची हं. फक्त आराम, मजा म्हणजे सुटी नाही.’ आईनं असं सांगताच मुलं ‘तू अशीच आहेस!’ असं म्हणत पुटपुटायला लागली.

‘अगं आरती, काळजी नको करूस. या मुलांकडून मी सुटीत ‘होमवर्क’ करून घेणार आहे.’ आजी म्हणाली.

‘ए, जरा चटणीचं सरकव ना इकडे,’ असं म्हणत इडलीवर ताव मारत राही म्हणाली, ‘आजी, आता हे काय नवीन? अगं सुटी आहे ना. मग कसलं होमवर्क? तू तरी आमची बाजू घे!’

‘अगं राही, आपण सुटीत मजाच करायची आहे. एरवी तुम्ही शाळा-क्लासच्या निमित्तानं दिवसभर घराबाहेर असता. खूप दमून जाता. म्हणून घरातल्या बऱ्याच गोष्टी शिकायच्या राहून जातात नं! पण अगदी लहान-सहान गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. त्या यायला पाहिजेत नं आपल्याला,’ आजी बोलत असतानाच तनीशा म्हणाली, ‘हो आजी, मी रोज दारात आणि देवापुढे रांगोळी काढणार, या सुटीत रांगोळी काढायला शिकायची असं मी केव्हाच ठरवलय. ती संस्कार भारतीची रांगोळी मला खूप आवडते.’

‘ए केदार, पाण्याची बाटली दे नं.’ बोलताना पाणी मागणाऱ्या तनीशाला केदारनं ‘पाणी संपलंय’ असं खुणेनच सांगितलं. ‘ए मामी, फ्रीजमधली दुसरी बाटली दे ना गं पाण्याची.’ श्रेयस म्हणाला.

‘संपल्या सगळ्या भरलेल्या बाटल्या. आता रोज पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायचं काम एकेकानं करायचं हं. नाही तर गार पाणी नाही मिळणार प्यायला.’ मामीनं या ‘होम वर्क’ची जबाबदारी मुलांवर टाकली.

‘बरं का मुलांनो,’ आजीनं मुलांच्या हातात आंब्याची फोड ठेवत सांगायला सुरुवात केली- ‘अरे, जेवायला बसायच्या आधी रोज ताटं वाटय़ा घ्यायच्या. जेवण झाल्यावर सगळी भांडी उचलायला मदत करायची. अशा छोटय़ा वाटणाऱ्या कामांमुळे खूप मदत होते घरातल्या बायकांना. आपापल्या वाळलेल्या कपडय़ांच्या घडय़ा करून ठेवायचं कामही प्रत्येकानं करायचं, म्हणजे घरात शिस्त राहील. तुम्हालाही कामाची सवय होईल.’

‘हो आजी, घरीही  मी रोज रूमाल आणि सॉक्सची घडी घालून स्कूल बॅगपाशी रात्रीच ठेवते,’ असं इरानं म्हणताच सगळे हसायला लागले.

‘शहाणं गं माझं बाळ.’ असं म्हणत आजीनं तिचा गोड पापा घेतला. मामीनं सगळ्यांना मस्त कॉफी करून आणली होती. प्रत्येकाला कॉफीचा कप देत मामी म्हणाली, ‘रोज आपल्या पांघरुणाची घडी घालायची हं प्रत्येकानं. चप्पल-बूट स्टँडमध्ये ठेवायचे. हे ‘होम वर्क’ पण करायचं रोज.

‘अरे, जाता जाता होणारी कामं असतात ही. एकदा हाताला वळण लागलं की मग ते काम जड वाटत नाही.’

‘मामी, मी कधी कधी रवीनं घुसळून ताक करीन.’ तनीशानं स्वत:चा कार्यक्रम सांगितला. ‘आजी, तू मला कोशिंबीर करायला शिकव हं.’ राही म्हणाली ‘अरे व्वा! म्हणजे आमचं बरंच काम हलकं होणार तर. रोज रात्री सगळ्यांनी मिळून रामरक्षाही म्हणायची हं! ’ आजी म्हणाली. त्यावर‘पत्ते, कॅरम खेळायचे. सायकलिंग, स्वीमिंग करायचं अशी काही तरी धम्माल करायची तर हा ‘होम वर्क’ काय देतेस आजी? आणि मामी तू पण तशीच!’ असं म्हणत केदार फुरंगटला.

‘केदार, मंडईतून भाजी आणायचं काम कधीतरी तूही करायचंस. मंडई आपल्या घराजवळच आहे नं. म्हणजे तुला हिशोब कळेल आणि ‘रोज त्याच त्या भाज्या काय खायच्या?’ अशी तक्रार करतोस नं.. कळेल तुला त्याचं उत्तर मंडईत गेल्यावर.’ मामीनं केदारकडे काम दिलं.

‘आजी, मला मॅगी करायला येते. मी करीन मॅगी..’ असं तनीशानं म्हणताच ‘ए मॅगीवाली’ म्हणून सगळे तिला पुन्हा चिडवायला लागले.

‘बघ नं सगळे कसे हसतात ते! आजी मला डोसाही येतो करायला. फक्त मॅगी नाही.’

‘भांडू नका रे.’ आजी थोडी रागावलीच!

‘ए मामी, आम्ही एक दिवस पार्टी करू का? मी मॅगी करेन, श्रेयस सरबत करेल, राही आणि इरा चणाचाट करतील, फक्त तू मदत करायची हं आम्हाला.’ तनीशा म्हणाली.

एरवी रोजच्या शाळेच्या व्यापात असणारी मुलं घरात पूर्ण वेळ थांबणार होती. हा मुलांच्या दृष्टीनं आनंद होता. पण आजीनं मात्र ही संधी साधून त्यांच्याकडून ‘होमवर्क’ करून घ्यायचं ठरवलं होतं. मुलं कितीही शिकली, कुठंही गेली तरी हाताला कामाचं वळण हवं. स्वावलंबी असायला हवं. आपण कामात थोडी मदत केली तर आपण कुणाला जड होत नाही, हा आजीचा संस्कार हेच या सुटीतलं खरं शिबिर आणि शिकणं होतं आणि ‘सोनारानं कान टोचलेलेच बरे असतात’ हे आईलाही पक्कं ठाऊक होतं.

इडली-सांबारावर ताव मारता मारता आजीनं पहिल्याच दिवशी प्रेमानं हसत-खेळत मुलांना ‘होम वर्क’ दिला आणि प्रेमळ आजीचं म्हणणं मुलांनी आनंदानं मान्य केलं. आजोळी धम्माल करायला आलेल्या मुलांनी आजीचं ‘होम वर्क’ मान्य केलं, पण आजी आणि मामीला रोजचं मेनू कार्ड सांगूनच. ‘ए आजी, उद्या शाबुवडे करणार का? एक दिवस पाणी पुरी हं मामी. तू श्रीखंड करणार नं? मला फ्राइड राइस आणि मंचुरियन खूप आवडतं.’ पोरं एकेक मेनू सांगत होती आणि हसत हसत आजी आणि मामीच्या माना होकारार्थी डोलत होत्या.

‘चला, उठा आता.. डिश उचला पटापट. अंघोळी करा,’ असं सांगत मामीनं पदर खोचला आणि ‘येऽऽऽ’ करत मुलांनी एकमेकांना टाळ्या दिल्या.

meerackulkarni@gmail.com