|| राजश्री राजवाडे-काळे

नुकतंच उजाडलं होतं. चिरपा घरटय़ाच्या दाराशी आला आणि उत्साहानं पंख फडफडवू लागला. आता बाहेरच्या जगात उड्डाण करायचे होते. घरटय़ातून बाहेर पडायचा आजचा दुसरा दिवस. आज जरा लांब उडायचे होते. चिरपा, चिरपी, चिंगी ही चिऊताईची पिल्लं उबदार घरटय़ातून बाहेर पडून नवं आयुष्य सुरू करणार होती. अर्थातच चिमणी आई आणि चिमणा बाबांनी उडायला शिकवण्याआधी त्यांच्यावर सूचनांचा भडिमार केला होताच. कुठे आणि किती लांब उडायचं, सुरक्षित जागा कोणत्या वगैरे वगैरे.. सभोवार पाहताना चिरप्याचं लक्ष डाव्या बाजूकडे गेलं. तिथे अजिबात जायचं नाही, तिथं माणसं राहतात.. अशी कडक सूचना तिन्ही पिल्लांना मिळाली होती. त्यांचं घरटं एका इमारतीतल्या खिडकीवर होतं, पाण्याच्या पाइपच्या एका फटीत. घरटय़ातून डोकावून पाहिलं की उजवीकडे झाडं वगैरे होती आणि डावीकडे पाहिलं की खिडकीच्या पलीकडचा घरातला भाग दिसायचा. चिरपा त्या घरात डोकावून बघत होता. त्याला कळेचना की इथे धोका कसला? माणसं तर काय सगळीकडेच असतात, त्या झाडाखालीसुद्धा! त्याला त्या घरातपण एक छोटुसं झाड दिसत होतं आणि गंमत म्हणजे ते झाड पाण्यात होतं. चिरप्याला वाटलं, छानपैकी त्या पाण्याजवळ बसावं, चांगलं उडता येऊ लागलं की एखादी चक्कर मारून येऊ तिथे. तो असा विचार करत असतानाच चिरपी आणि चिंगीने त्याला ढुश्या दिल्या आणि विचारू लागल्या, ‘‘काय रे, काय बघतोयस तिकडे?’’ आई-बाबांनी सांगितलंय ना तिकडे जायचं नाही म्हणून.’’ इतक्यात आई-बाबा त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींना घेऊन आले आणि चिरप्यासकट सगळ्या पिल्लांना उडायला घेऊनही गेले.

दुसऱ्या दिवशी चिरपा आणि त्याची भावंडं अगदी स्वतंत्रपणे उडायला लागली होती. आता चिरप्याचं लक्ष ‘त्या’ बाजूला होतं, जिथे जायला आईने मनाई केली होती. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याची भावंडं, आई-बाबा, काका, मावश्या सगळे तसे दूरवर होते. चिरप्याने विचार केला की, पटकन् जाऊनच पाहू तिकडे आणि तो क्षणार्धात उडाला आणि खिडकीतून घरात झेपावला. पाण्यातल्या त्या छोटुशा झाडाव्यतिरिक्त तिथं काहीच नव्हतं. झाडं, पानं, फुलं, माती काहीही नाही! चिरपा त्या झाडाजवळ बसला, इतक्यात एक छोटा मुलगा त्या खोलीत आला आणि चिरप्याला पाहून टाळ्या वाजवत ओरडू लागला. मग दुसरा मुलगा आला. ती मुलं गोंधळ घालू लागली. चिरप्याने ठरवलं की आता परत जाऊ. इतक्यात ती मुलं धावली आणि कसला तरी ‘धाडकन्’ आवाज आला. चिरपा परत जाण्याकरता खिडकीच्या दिशेने झेपावला. पण.. पण हे काय? हे काय आहे मधे? परत जाताच येईना. अंग, आपटत होतं कशावर तरी. लांबून वाटत होतं की, समोरच तर रस्ता आहे. पण.. पण जाताच येईना हे.. हे काय आहे? का जाता येत नाहीये? मुलांनी खिडकी केव्हा बंद केली समजलंही नाही चिरप्याला. कसं समजणार म्हणा, अशी फसवी काच असते हे त्याला कुठे माहीत होतं? शेवटी त्याने खिडकीचा नाद सोडला आणि दुसरीकडे कुठे रस्ता आहे का पाहू लागला. पण छे! कुठेच रस्ता नव्हता. उडून उडून तो खूप थकला. छातीत धडधडायला लागलं. ती मुलं उडय़ा मारत ओरडत होती. जरा शांत बसलं तर ती मुलं त्याच्याच दिशेने यायची. आता मात्र चिरप्याला रडू कोसळलं. तो पुन्हा उडू लागला. उडायचे त्राण नव्हते तरीसुद्धा! आणि काय आश्चर्य! त्याच्यासमोर अजून एक चिमणा! त्याच्यासारखाच, त्याच्याच वयाचा. त्याला वाटलं, हासुद्धा मोठय़ांचं न ऐकता आलाय इथे आपल्यासारखा. चिरपा त्याच्याशी बोलू लागला, पण तो मात्र काहीच बोलेना. फक्त तोंड उघडायचा अगदी चिरप्याने बोलायला तोंड उघडलं की फक्त. चिरप्याने नीट पाहिलं. त्याच्यासारख्याच हालचाली, सेम टू सेम! तो.. तो.. तोच होता! तो स्वत:! पण हे कसं शक्य आहे? हे काय विचित्र? उद्भुत.. आता मात्र चिरप्याला रडूच कोसळलं. खिडकीकडे पाहिलं तर बाहेर सगळं सगळं दिसत होतं. चिरप्याला आत पाहून नुसता चिवचिवाट करत होते. तो पुन्हा खिडकीकडे झेपावला, पण काही उपयोग झाला नाही. आता मात्र त्याने सुटकेची आशा सोडून दिली आणि दमलेला, घाबरलेला तो आई-बाबांचं आपण का ऐकलं नाही याचा पश्चाताप करत बसून राहिला. मुलं हळूहळू त्याच्या दिशेने येत होती. त्याने डोळे गच्च मिटून घेतले. इतक्यात एक वेगळाच आवाज ऐकू आला. चिरप्याने डोळे उघडले. आता अजून एक मोठ्ठा माणूस त्या खोलीत आला होता आणि त्या मुलांपेक्षा मोठय़ा आवाजात बोलत होता. चिरप्याला खात्री पटली की, आता काही खरं नाही. पुन्हा मोठ्ठा आवाज झाला. आता तो माणूस हातात कापड घेऊन ते चिरप्याच्या दिशेने भिरकावत त्याला उडवू लागला. चिरप्याला माहीतही नव्हतं की हा माणूस मुलांना खूप रागवलाय आणि त्याच्या सुकटेसाठी खिडकीही उघडलीय. कापडाने हुसकावायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर दमलेला चिरपा जबरदस्तीच उडाला आणि खिडकीपाशी बसला. पण हे काय? बाहेरचं गार वारं चिरप्याला जाणवलं आणि समजलं की आपण बाहेर जाऊ शकतोय.. तो उडाला आणि सगळ्या चिमण्यांच्या घोळक्यात सामील झाला! सगळ्यांच्या चिवचिवाटात त्याची अपराधी नजर आईकडे गेली. आईला ते समजलं आणि आईने नजरेनेच जणू सांगितलं की ‘आता पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही हं..’

shriyakale@rediffmail.com