News Flash

ऊन-पाऊस

उन्हाचं सारखं सारखं असं टोचून बोलणं पावसाला आवडत नसे. पाऊस आळशासारखा झोपलेला होताच.

ऊन आणि पाऊस ही दोन भावंडं आकाशाच्या कुशीत गुण्यागोविंदाने नांदतात. दोन्ही भावंडं आपापल्या कामात तरबेज आणि हुशार! एकमेकांच्या हुशारीवरून दोघांची आभाळाकडे नेहमी भांडणं व्हायची. आभाळ आपल्या परीनं या भावंडांची समजूत घालायचं. पण कधी कधी दोघं अगदी इरेला पेटायची. त्यात ‘ऊन’ काहीसं आभाळाचं लाडकं होतं. ऊन वर्षांतले आठ महिने पूर्ण दिवस काम करीत राहतं. न थकता.. न दमता.. अगदी पहाटे पहाटे पूर्व दिशेला डोंगरराजीतून सूर्य-किरणांचे दूत पृथ्वीतलावर ओसंडतात. जणू डोंगरांच्या भाळावरून कुंकवाचा करंडा उपडी होतो अणि दशदिशा उजळून जातात.
याच पिवळ्या-सोनेरी किरणांचं दुपारी ऊन होतं. नंतर ऊन कलू लागतं. सायंकाळ होऊ लागते. पश्चिम दिशा लालीलाल होते. हळूहळू ऊन विश्रांती घेते. आभाळाला म्हणूनच ऊन जास्त आवडायचं. उन्हाची दिवसभराची कामगिरी आवडायची. साहजिकच उन्हाला याचा अभिमान वाटायचा. मे महिन्याच्या अखेपर्यंत ऊन प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत राहायचं. म्हणून मग ऊन आपल्या धकटय़ा भावाला अद्वातद्वा बोलू लागायचं. ‘‘तू आहेसच मुळी हट्टी! तू म्हणजे मुलखाचाच आळशी.’’ तुला कोणाचीच कदर नाही.. कोणाची फिकीर नाही. खरं तर तुला कोणाचाच धाक उरला नाही. तुझे आभाळाने खूप खूप लाड केलेत. वर्षांतले इनमिन चार महिने एवढेच तुझे कामाचे दिवस. तेही इमानानं काम करायला नको. जिकडे जायचं तिकडे राहायचं.. वाट्टेल तिथे पडायचं.. वाट्टेल तिथे थांबायचं.. शिस्त नाहीच मुळी! नुसता धांदरटपणा आणि फुकटचा बडेजाव..’’
उन्हाचं सारखं सारखं असं टोचून बोलणं पावसाला आवडत नसे. पाऊस आळशासारखा झोपलेला होताच. पण उन्हानं टोचून कानउघडणी केल्यामुळे तो खडबडून उठला. डोळे चोळू लागला. त्यानं लालभडक डोळ्यांचा एक कटाक्ष उन्हाकडे टाकला. आणि अपमानाचा सूड घेण्यासाठी सारी शक्ती एकवटून कामाला लागला. आभाळाला हलवलं. वाऱ्याला गरागरा फिरवलं. वादळ घुमवलं. विजेला नाचवलं. आणि थयथयाट करत रागारागाने रानोमाळ कोसळत राहिला. दोन तास..चार तास.. अर्धा दिवस.. पूर्ण दिवस..दुसरा.. तिसरा दिवस रागारागाने पाऊस कोसळत राहिला. उन्हानं शांतपणे झोपेचं सोंग घेतलं. बघू या, याची हिम्मत. बघू या याची शक्ती आणि चिकाटी!
तिसऱ्या दिवशी पावसाचं अंग दुखू लागलं. हात-पाय दुखायला लागले. तो थकला आणि निमूटपणे गप्प बसला. तेवढय़ात झोपेचं सोंग घेतलेलं ऊन जागं झालं- ‘‘का रे, दमलास? दोन- तीन दिवस काम केलंस तर थकलास? पाय दुखायला लागले?’’ ऊन खो-खो हसू लागलं. आधीच थकलेला पाऊस उन्हाच्या डिवचण्यानं लाल झाला. उन्हाबरोबर भांडू लागला. ‘‘तुला जरा म्हणून दयामाया नाही. मी तुझ्यापेक्षा लहान आहे. लहान भावंडाचे लाड करायचे सोडून ऊठसूट माझ्याबरोबर भांडायचं? आता मी सतत काम करत होतो ना.. थोडं थांबलो तर काय झालं?’’
ऊन-पावसाचं भांडण आणि बाचाबाची आभाळानं ऐकली. आभाळानं दोघांनाही बोलावलं. दोघांचं ऐकून घेतलं आणि समजावून सांगितलं- ‘‘बाळांनो, तुम्ही दोघेही खूप खूप चांगले आहात. तुम्हा दोघा भावंडांचं खरं रूप एकच आहे. अरे, ऊन आहे म्हणून पाऊस.. पाऊस आहे म्हणून सजीव सृष्टी आहे. प्राणिमात्रांचं जीवन आहे. किती किती गुणाची भावंडं बरे तुम्ही! गुणी भावंडं कधी भांडतात का?’’ मग दोघांचे गैरसमज दूर झाले. दोघेही आनंदले.
आषाढ संपला. पावसाचे आकांडतांडव आणि रौद्ररूप कमी झाले. हळूहळू श्रावणाला सुरुवात झाली. पाऊस रिमझिम बरसू लागला. आता ऊन- पाऊस हातात हात घालून लपंडाव खेळू लागले. आनंदाने नाचू लागले. त्यांच्या आनंदाचं इंद्रधनू सप्तरंगात दऱ्याडोंगरावर उमटू लागलं.
 अशोक लोटणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:30 am

Web Title: moral story for kids 3
Next Stories
1 पुस्तकांशी मैत्री : माझा सॉक्रेटिस
2 डोकॅलिटी
3 शान न इस की जाने पावे
Just Now!
X