सातवीच्या वर्गात चित्रकलेचा तास सुरू होता. एका मागोमाग एक लागून असे दोन तास होते. पहिला तास संपून आता दुसरा सुरू होता. होनावरबाईंनी वर्गाला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर चित्र काढण्यासाठी सांगितलं होतं. शाळेच्या चित्रकलेच्या वहीऐवजी चित्र काढायला त्यांनी आज प्रत्येकीला वेगळा चित्रकलेचा कागदही दिला होता.

सगळ्या मुली आपापली चित्रं काढण्यात अगदी गुंग होत्या. बाई थोडय़ा थोडय़ा वेळाने वर्गामध्ये फेरी मारत होत्या. मुलींची चित्रं निरखून पाहात होत्या. कुणी नदी-डोंगर-शेत काढलं होतं, कुणी गणपती आणि पूजा करणारा पुजारी काढला होता, तर कुणी सर्कस-जोकर वगैरे काढलं होतं. बाईंना सगळ्यांची कल्पनाशक्ती पाहून खूप गंमत वाटत होती.

फिरता फिरता त्या आर्याच्या बाकापाशी आल्या आणि एकदम थांबल्या. आर्याने रावण दहनाचं सुरेख चित्र काढलं होतं. ते रंगवून जवळजवळ पूर्ण होत आलं होतं. चित्रामध्ये तिने रावणाला बाण मारणारे प्रभू श्रीराम आणि त्यांना पाहताना लक्ष्मण आणि हनुमानही काढले होते. दहन करतानाच्या ज्वाळांच्या लाल, केशरी, पिवळ्या छटा आणि तिन्हीसांजेच्या वेळेच्या आकाशामधल्या विविधरंगी छटा आर्याने अगदी सुंदर रंगवल्या होत्या. चित्रं इतकं सजीव दिसत होतं की जणू तो रावण दहनाचा प्रसंग आपल्यासमोरच घडत असावा. अर्थात, आर्याचं प्रत्येक चित्रं नेहमीच छान असायचं. पण हे चित्रं अप्रतिम होतं, कदाचित आतापर्यंतचं तिने काढलेलं सगळ्यांत सरस.

‘‘आर्या, सुरेख!’’ बाई तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. आर्या एकदम दचकली. ती चित्र काढण्यात इतकी रंगून गेली होती की, बाई तिच्या बाकाजवळ येऊन उभ्या आहेत हे तिच्या लक्षातच आलं नाही. ती पटकन उठून उभी राहिली.

‘‘बस, बस. लगेच अशी उभी राहू नकोस.’’ बाई म्हणाल्या.

‘‘थँक यू बाई.’’ म्हणत ती पुन्हा बाकावर बसली.

‘‘सध्या नवरात्र सुरू आहे म्हणून काढलंस का हे चित्रं?’’ बाईंनी विचारलं.

‘‘हो बाई. आमच्या घरी बसतं नं नवरात्र- घट, गव्हाचं शेत, झेंडूच्या माळा-एकदम मस्त दिसतं. दसऱ्याला आम्ही दरवर्षी रावण दहन पाहायला चौपाटीवर जातो. ते आठवूनच काढलं हे चित्र.’’ आर्या म्हणाली.

‘‘छान! आता असं कर, चित्रं रंगवून पूर्ण झालं की स्टाफ-रूममध्ये घेऊन ये. मी तिथेच आहे. आपण ते शाळेच्या नोटीस बोर्डावर लावू या. अनायसे नवरात्र सुरू आहेच आणि दसराही येतोय. या सणाला अगदी अनुरूप असं चित्रं आहे तुझं.’’ बाईंनी सुचवलं.

‘‘नक्की बाई.’’ आर्या आनंदाने म्हणाली.

इतक्यात तास संपल्याची घंटा झाली. आता मोठी सुट्टी झाल्यानंतर पुढच्या विषयांचे तास होते. बाई वर्गातून गेल्यावर वर्गातल्या मुलींनी आर्याभोवती तिचं चित्रं पाहायला गर्दी केली. सगळ्यांनीच तिच्या चित्रकलेचं भरभरून कौतुक केलं. मग सगळ्या जणी पटापट आपापले डबे खाऊन मैदानावर खेळायला पळाल्या. आर्याही थोडा वेळ बाहेर खेळायला गेली. पण तिला चित्र पूर्ण करून बाईंना द्यायचं होतं, म्हणून ती लगेचच वर्गावर आली.

आल्यावर पाहते तर तिच्या चित्रावर कुणीतरी काळ्या रंगाने ब्रशचा एक मोठा फराटा मारला होता. तिचं सगळं चित्र खराब करून टाकलं होतं. ती नेमकं तिचं चित्र बाकावरच उघडय़ावर ठेवून खेळायला गेली होती. वजन म्हणून त्याच्यावर फक्त एक कंपास बॉक्स तिने ठेवला होता. रंग आणि ब्रशही तिने चित्राच्या शेजारीच ठेवलेले होते.

खराब झालेलं चित्र पाहून आर्या हमसून हमसून रडायला लागली. एवढय़ात काही मुली वर्गात आल्या. आर्याला एकटीच रडताना पाहून त्या तिच्याजवळ गेल्या. तिचं खराब झालेलं चित्र पाहून त्यांनाही खूप वाईट वाटलं. इतकं सुरेख चित्र असं कोणी खराब केलं असेल, याची चर्चा त्या आपापसात करू लागल्या. एका बाजूला त्या आर्याला शांतही करत होत्या. त्यांच्यापैकी दोघीजणी घडलेला प्रकार होनावरबाईंना सांगायला स्टाफ रूममध्ये धावत गेल्या. झालेला प्रकार ऐकून बाईंनाही धक्का बसला.

‘‘पुढचा तास कुठला आहे तुमचा?’’ त्यांनी मुलींना विचारलं.

‘‘सायन्सचा.’’ एक मुलगी म्हणाली.

‘‘ठीक आहे. तुम्ही पुढे व्हा, मी येतेच वर्गावर. घडल्या प्रकाराचा छडा लावायलाच हवा.’’ बाई म्हणाल्या.

मुली वर्गावर परतल्या. मागोमाग होनावरबाई सुद्धा आल्या. मोठी सुटी संपल्यामुळे आता वर्ग भरला होता. आर्या अजून रडतच होती. बाई तिच्या जवळ जाऊन तिला हलकं थोपटू लागल्या. ती हळूहळू शांत होऊ  लागली.

‘‘आर्याचं चित्र कोणी खराब केलंय? हे बघा, ज्या कुणी हे केलंय ती मुलगी जर आत्ताच खरं बोलली नाही, तर मला नाईलाजाने प्रिन्सिपॉल मॅडमकडे तुमच्या वर्गाची तक्रार करावी लागेल.’’ बाई जरा ठणकावूनच सगळ्या मुलींना म्हणाल्या. त्यांनी मग एक नजर संपूर्ण वर्गावर फिरवली. हे काम कुणी केलं असावं याचा त्यांना आता साधारण अंदाज आला होता.

तितक्यात सायन्सच्या देशमुखबाई वर्गावर आल्या. होनावरबाई आणि त्यांच्यात थोडी चर्चा झाली आणि मग देशमुखबाईंनी आर्याच्या पुढच्या बाकावर बसणाऱ्या सानियाला स्टाफ रूममध्ये होनावरबाईंना भेटायला जायला सांगितलं. ती घाबरतच स्टाफ रूममध्ये आली. होनावरबाई तिथे एकटय़ाच होत्या.

‘‘बाई, आत येऊ ?’’ सानियाने विचारलं.

‘‘हो, ये.’’ बाई म्हणाल्या.

‘‘तुम्ही मला बोलावलंत?’’ सानिया आतमध्ये येत म्हणाली. ती जरा थरथरत होती. बाईंच्या ते बरोबर लक्षात आलं.

‘‘खरं सांग सानिया, तूच आर्याचं चित्र खराब केलंस नं?’’ बाई लगेच मुद्दय़ावरच आल्या.

‘‘बाई, मी ना..’’ सानियाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बाईंनी तिला थांबवलं.

‘‘हे बघ सानिया, मी खूप र्वष या शाळेत शिकवते आहे. आमच्या हाताखालून दरवर्षी इतकी मुलं जातात की कोण कसं आहे हे आम्हांला पक्कं ठाऊक असतं. लहानातली लहान गोष्ट देखील आमच्या नजरेतून सुटत नाही. मगाशी मी जेव्हा वर्गात सगळ्यांना विचारलं, तेव्हा फक्त तुझी नजर खाली झालेली होती. मला तेव्हाच समजलं. त्यामुळे आता उगाच वेळ वाया घालवू नकोस. खरं काय ते पटकन सांगून टाक. आणि नशीब समज की मी सगळ्या वर्गासमोर तुला हे विचारलं नाही त्याचं.’’ बाईंच्या कणखर आवाजाने सानिया अजूनच घाबरली.

‘‘हो बाई, मीच आर्याचं चित्र खराब केलं.’’ सानियाने कबुली दिली. ती रडायला लागली.

‘‘पण का? कुठून आला गं एवढा दुष्टपणा तुझ्यात?’’ बाईंनी चिडून विचारलं.

‘‘तुम्ही तिचं इतकं कौतुक केलंत म्हणून मला खूप राग आला होता तिचा.’’ सानिया चिडून म्हणाली.

‘‘अगं, तू काय किंवा इतर कुठल्याही मुलीने एखादी चांगली गोष्ट केलीत तर तुमचंही तितकंच कौतुक करते नं मी? दरवर्षी तू पहिली येतेस

तेव्हा अख्ख्या शाळेत तुझंच तर कौतुक होतं, तेव्हा? मग आज आर्याचं थोडं कौतुक झालं तर तिचा इतका राग का आला?’’ सानियाने सांगितलेलं कारण ऐकून बाई आश्चर्याने म्हणाल्या.

‘‘बाई, माझी चित्रकला तिच्याइतकी चांगली नाहीये त्याचा राग आला मला.’’ – इति सानिया.

‘‘म्हणून तिचं चित्र खराब करायचं की आपली चित्रकला सुधारण्याचा प्रयत्न करायचा? या हिशेबाने तर सगळ्यांनी तुझाही रागरागच करायला हवा, नाही का? तू तर दर वर्षी पहिली येतेस.’’ बाई रागावून म्हणाल्या.

‘‘बाई, आर्या याच वर्षी आली आहे आपल्या शाळेत. पण लगेचच तिची सगळ्यांशी खूप चांगली मैत्री झाली. सगळ्या अगदी तिला आवर्जून अभ्यास करायला, डबा खायला, खेळायला बोलावतात. माझ्या ग्रुपमधल्या मैत्रिणींशीही तिचं खूप चांगलं जमतं. याचा मला खूप राग येतो. त्या माझ्या मैत्रिणी आहेत नं?’’ सानिया पुन्हा रडवेली होऊन म्हणाली.

‘‘कोणी कुणाशी मैत्री करायची हे आता तू ठरवणार का सानिया? आणि एकाच वर्गात कसले ग्रुप वगैरे? किती लहान आहात तुम्ही अजून! सगळ्या मिळून राहा की छान! आर्या सगळ्यांशी चांगलं वागते, सगळ्यांना खूप मदत करते. आपण तसं चांगलं बनण्याचा प्रयत्न करायचा की तिच्याबद्दल मनात राग साठवून ठेयायचा?’’ बाईंनी हताशपणे विचारलं. यावर सानिया काहीच बोलली नाही.

‘‘सानिया, मला सांग, गेल्या गॅदरिंगला तू एक कथ्थक नृत्य सादर केलं होतंस नं? कुठल्या गाण्यावर बसवलं होतं गं ते?’’ बाईंनी पुढे विचारलं. बाईंचा हा प्रश्न सानियाला एकदमच अनपेक्षित होता.

‘‘पल पल है भारी.. गाण्यावर, स्वदेस सिनेमामधलं..’’ सानिया स्वत:ला सावरत म्हणाली.

‘‘त्यात काय दाखवायचा प्रयत्न केला होता तुम्ही मुलींनी?’’ बाईंनी विचारलं.

‘‘रावणाने कैद केलेल्या सीतेला राम वाचवायला येतो आणि शेवटी रावण दहन होतं.’’ सानिया म्हणाली.

‘‘म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय! बरोबर? आणि त्यांमध्ये तू कोणाचं पात्र सादर केलं होतंस?’’ बाईंनी मुद्दाम विचारलं.

‘‘रामाचं.’’ सानिया हळू आवाजात म्हणाली.

‘‘त्या गाण्याचं शेवटचं कडवं काय आहे गं?’’ – इति बाई.

‘‘राम ही तो करुणा में है..’’ सानिया गद्यात म्हणू लागली.

‘‘आणि त्या कडव्यातलं शेवटचं वाक्य काय आहे?’’ बाईंनी सानियाला म्हणायला लावलं.

‘‘मनसे रावण जो निकाले, राम उसके मन में है..’’ असं म्हणताना सानियाने बाईंकडे एकदम चमकून बघितलं.

‘‘सानिया, तू सुरेख डान्स केलास म्हणून तेव्हा तुझं खूप कौतुक झालं होतं, आठवतंय? गाणं काय नुसतं डान्सपुरतं पाठ करायचं असतं की त्याचा अर्थही आपण लक्षात घ्यायचा?’’ बाईंनी विचारलं. सानिया मान खाली घालून उभी होती.

‘‘आपल्या मनातले राग, लोभ, गर्व, द्वेष, मत्सर, तुलना वगैरे या भावना असतात नं, त्यांचा आपल्याला काहीही उपयोग नसतो. त्यांनी आपल्या जवळची माणसं फक्त दुरावतात आणि आपण एकटे पडतो. आपल्या मनातले हे जे सगळे ‘रावण’ असतात नं, त्यांचं शक्य तितक्या लवकर दहन करून टाकावं. मग बघ सगळं कसं तुला सुंदर आणि निर्मळ दिसायला लागेल. एक माणूस म्हणून तू खूप समृद्ध होशील. याचा शांतपणे एकदा विचार कर.’’ बाईंनी सानियाला समजावलं.

सानियाला आता तिच्या वाईट वागण्याची खूप लाज वाटू लागली होती. तिने बाईंची माफी मागितली आणि पुन्हा असं कधी करणार नाही असं त्यांना ‘प्रॉमीस’ केलं. स्टाफ रूममधून ती तडक तिच्या वर्गात गेली. सायन्सचा तास संपला होता. गणिताच्या तासाच्या बाई अजून वर्गावर यायच्या होत्या. सानियाने आर्याजवळ जाऊन तिची अगदी मनापासून माफी मागितली. आर्यानेही तिच्या स्वभावाप्रमाणे सगळं लगेच विसरून तिला माफ केलं.

दुसऱ्या दिवशी आर्याने मोरावर आरूढ झालेल्या सरस्वतीचं, हातामध्ये वीणा घेतलेलं, एक नवीन चित्र घरून काढून आणलं आणि होनावरबाईंना नेऊन दाखवलं. तिच्या चिकाटीचं बाईंना खूप कौतुक वाटलं. बाईंनी लागलीच ते चित्र तिला नोटीस बोर्डावर लावायला सांगितलं. या वेळेस तिला मदत करायला सानिया देखील होती.

प्राची मोकाशी – mokashiprachi@gmail.com