गावातून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक छान गुलमोहोराचं झाड होतं. ते उन्हाळ्यातही छोटय़ा छोटय़ा हिरव्यागार पानांनी बहरलेलं असायचं. आजूबाजूला आंब्या-वडाचीही झाडं होती. तीही वाटसरूंना सावली देत असत. पण गुलमोहोराची छोटी छोटी पानं वाटसरूंना खूप आवडत, म्हणून ते त्याच्याच सावलीत बसत. हळूहळू गुलमोहोराच्या झाडाला वाटू लागलं, की सगळ्या झाडांत आपणच श्रेष्ठ आहोत आणि त्याला त्याच्या सावलीचा गर्व वाटायला लागला. त्याच्या सावलीत बसणाऱ्यांना तो त्रास देऊ लागला. कोणी विसाव्यासाठी बसलं की तो त्याच्या अंगावर जोरजोरात पानं मारीत असे. जेवायला बसलं की त्यांच्या अन्नात पालापाचोळा टाकून त्यांचं अन्न खराब करी. झोपलं तर त्याच्या कानात पानं घालून त्याला गुदगुल्या करून त्रास देत असे.
बिचारे लोक गुलमोहोराच्या या त्रासाने वैतागून जात आणि म्हणत, ‘काय द्वाड आहे हे झाड! एवढी छान सावली आहे, पण बसू काही देत नाही सावलीत.’
आंब्या-वडाच्या झाडांनाही गुलमोहोराच्या या वागण्याचा राग येई. ते त्याला समजवत, ‘अरे वाटसरूंना सावली देण्यासाठीच तर देवेंद्राने आपल्याला सावली दिलीय. तिचा इतरांसाठी उपयोग कर. असा वेडय़ासारखा वागू नकोस. देवेंद्राला तुझं हे वागणं कळलं तर तो तुला शिक्षा करील.’
त्यावर गुलमोहोर उद्धटपणे म्हणत असे, ‘माझी सावलीय, मी काय पाहिजे ते करीन. जा, तुमचं तुमचं काम करा, मला शहाणपण शिकवू नका.’
दिवसेंदिवस गुलमोहोर अधिकच उद्धट होत गेला आणि लोकांना जास्तच त्रास देऊ लागला. एकदा असं झालं, की देवेंद्र स्वत:च वेश बदलून या रस्त्याने जात होता. आपले पशू-पक्षी, झाडं-झुडपं, पानं-फुलं सगळं नीट काम करतायत ना, हेच तो बघत होता. खूप चालून तोही दमला होता. गुलमोहोराची हिरवीगार सावली बघून तो त्याच्याखाली विसावला आणि मनात म्हणाला, ‘काय छान सावली देतंय हे झाड. उन्हातान्हात चालून दमून आल्यावर इथं बसताना लोकांना किती बरं वाटत असेल!’ असं त्याच्या मनात येतंय तोवरच गुलमोहोर देवेंद्राच्या अंगावर जोराजोरात पानं टाकू लागला. पानांचे फटके लगावू लागला. पानांच्या त्या माऱ्याने देवेंद्रसुद्धा घाबरून गेला. देवेंद्राला घाबरलेलं पाहून गुलमोहोर मोठय़ामोठय़ाने हसू लागला.
 ते बघून देवेंद्राला इतका राग आला की, तो लगेचच स्वत:च्या खऱ्या रूपात आला आणि चिडून गुलमोहोराला म्हणाला, ‘अरे उद्धट गुलमोहोरा, लोकांच्या विसाव्यासाठी मी तुला इतकी छान सावली दिली आणि तू त्याचा असा लोकांना त्रास देण्यासाठी उपयोग करतोस. थांब, मी तुला शिक्षाच करतो. आत्तापासून उन्हाळ्यात तुझी सगळी पान झडतील. तू एकाकी उन्हात तापत राहशील. कोणीही तुझ्याजवळ येणार नाही,’ असं म्हणून देवेंद्र अदृश्य झाला आणि गुलमोहोराची सगळी पानं झडून गेली.
बिचारा गुलमोहोर रणरणत्या उन्हात अगदी एकाकी झाला. उन्हाच्या झळा त्याला चटके देऊ लागल्या. आपल्या चुकीचा त्याला खूप पश्चात्ताप झाला.
तो देवेंद्राकडे जाऊन दु:खी मनाने म्हणाला, ‘हे देवा, मला माफ कर. माझी चूक माझ्या लक्षात आलीय, मी पुन्हा कधीच लोकांना त्रास देणार नाही, मला माझी हिरवीगार सावली परत दे,’ असे म्हणून तो रडू लागला. देवेंद्राच्या लक्षात आलं, की गुलमोहोराला खरंच पश्चात्ताप झालाय.  तो गुलमोहोराला म्हणाला, ‘हे बघ बाळा, तुझी चूक तुझ्या लक्षात आली ते बरंच झालं, पण तू तुझ्या वाईट वागण्यामुळे तुझी हिरवीगार पानं गमावून बसलायस, मी ती तुला परत देऊ शकणार नाही. इथून पुढे तू उन्हाळ्यात लोकांना सावली देऊ शकणार नाहीस, पण उन्हाळ्यातच तुला लाललाल फुलं येतील; जी पानांसारखी वाटतील आणि लोकांना खूप आनंद देतील. लोक तुझ्याजवळ येतील, तुला डोळे भरून पाहतील आणि त्यांची मनं आनंदाने भरून जातील.’
आपल्या वाईट वागण्याने आपण आपली सावली कायमची गमावलीय, हे ऐकून गुलमोहोराला थोडंसं वाईट वाटलं. त्याला रडूही येऊ लागलं, पण त्याने स्वत:ला समजावलं. रणरणत्या उन्हातही आपण लोकांना आनंद देऊ शकू, हे ऐकून तो समाधानाने हसला. पुन्हा कधीही वाईट वागणार नाही, असं त्याने मनोमन ठरवलं; आणि तेव्हापासून गुलमोहोर उन्हाळ्यात लालचुटूक फुलांनी बहरू लागला. लोकांच्या डोळ्यांना सुखावू लागला.