|| नील ऋधील जंगले

पक्ष्यांच्या वेडाची पहिली सकाळ मला आठवते. मी आमच्याकडे असलेला डिजिटल कॅमेरा सहजच आई-बाबांकडून घेतला व कोणाचे फोटो काढायचे हे न ठरवताच घरातून निघालो. आमच्या घराच्या बाजूला एक माळरान आहे, पण अगदी छोटंसंच. मी तिथे गेलो. एक धोबी पक्षी (Forest wagtail) मला दिसला. त्याचे फोटो काढण्यात मी गुंतलो. बघतो तर काय? चिमण्यांपेक्षा जरा मोठय़ा असलेल्या पाकोळ्या मला दिसल्या. त्या जमिनीवर होत्या. खरं तर पाकोळ्या तारेवर बसतात; पण आज जमिनीवर! मला आश्चर्य वाटलं; पण जास्त विचार न करता मी त्यांचे फोटो काढले. घरी परतलो. संध्याकाळी ४ वाजता  पुन्हा पक्ष्यांचे फोटो काढायला निघालो. मला निळ्या रंगाचा खंडय़ा, काळा-पांढरा दयाळ असे बरेच पक्षी दिसले. मी त्यांचे फोटोही काढले. हळूहळू सूर्य डोंगराआड येऊ लागला. वारा घुमू लागला. गवत डुलायला लागले. संध्याकाळचे ६ वाजले होते. मी घरी गेलो. अंघोळ केली. जेवण केले व झोपी गेलो. आश्चर्य म्हणजे, माझ्या स्वप्नातही पक्षी येत होते. अशा प्रकारे मला या सुंदर पक्ष्यांच्या निरीक्षणाचा छंद लागला. पण त्या पक्ष्यांची नावे मला कशी कळली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ती गोष्ट अशी आहे की, माझी आई डॉ. विनया जंगले काही वर्षांपूर्वी मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कची पशुवैद्यकीय अधिकारी होती. तिथे तिजप झिशान व राजेश या दोन मोठय़ा मुलांची भेट झाली. ते कीटक, पाली यांचा अभ्यास करत होते. हे माझ्या आईला आवडले व तिने त्यांच्याशी मैत्री केली. त्यांनी तिला The Book of Indian Birds हे डॉ. सलीम अलींचे पुस्तक भेट दिले. या पुस्तकामुळेच मी हे पक्षी शोधू शकलो. ती संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये चार वर्षे कामाला होती व नंतर बदलीच्या कारणाने खेडला आली. आली म्हणजे, ती एकटीच नव्हे तर माझे बाबा ऋधिल जंगले व मी खेडला आलो. मी इकडे येऊन हा छंद जोपासला.

पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासल्यावर खेडमध्ये अनेक पक्षी मला दिसू लागले. पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, डोक्यावर काळा तुरा असलेला शिपाई बुलबुल, फुलचुख्या.. असे अनेक पक्षी मला सहजच दिसू लागले. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, मला पक्षीनिरीक्षणाचा छंद कोणी लावला असेल बरं? ती म्हणजे माझी आई. कारण पक्षी निरीक्षणाच्या क्षेत्रात आईला खूप ज्ञान आहे. मी फोटो काढलेले पक्षी आईला दाखवतो, तेव्हा आई मला त्या पक्ष्यांची नावे सांगते; पण तिलाही माहीत नसलेले पक्षी आम्हा दोघांना The Book of Indian Birds च्या पुस्तकात शोधावे लागतात. हे काम फार त्रासाचे असते, पण मजाही तेवढीच येते. मी रोज कधी वेळ मिळाला तर पक्ष्यांचे फोटो काढतो; पण रविवारी जास्त काढतो.

एका रविवारी सकाळी उठून मी बाहेर गेलो. बघतो तर काय, पिंपळाच्या झाडावर दोन हळद्या बसले होते. पिवळेधम्मक हळद्या बघून मला खूप आनंद झाला. मी त्यांचे फोटो काढले. आठवडाभर त्या हळद्यांच्या पाठी धावण्याच्या मेहनतीला फळ आलं होतं. अजून उत्सुकता वाढली. दर रविवारी मला एक किंवा दोनच नवीन पक्षी दिसायचे. एक रविवार तर वेगळाच होता. त्या दिवशी मला खूप पक्षी दिसले. त्या दिवशी मी हातात कॅमेरा घेऊन माझ्या शाळेजवळच्या रस्त्यावर चालत होतो. अर्थातच आई माझ्या सोबत होती. आम्ही चालत चालत शाळेच्या मागच्या बाजूला गेलो. जरा पुढे गेल्यावर एक चिमणीसारखा पक्षी आईला दिसला. ती म्हणाली, ‘‘तो बघ वेगळाच पक्षी.’’ मी तिकडे बघितलं तर मला ती चिमणीच वाटली; पण जरा डोळे मोठे करून बघितलं तर मला कळलं, ती चिमणी नाही, तर ती सुगरण पक्ष्याची मादी होती. तिच्या जोडीला एक सुगरण नर होता. डोक्याला आणि छातीला पिवळारंग, परंतु बाकी शरीर करडय़ा रंगाचे. मी अंदाजे आईला सांगितलं की ही त्या नर सुगरण पक्ष्याची मादी असावी. आईलाही ते पटलं.

नंतर आम्ही वीसेक मीटर पुढे गेलो तर एका पक्ष्याचा आवाज आला. मी आईला म्हटलं, ‘‘हा घारीचा आवाज असावा.’’ जरा पुढे गेल्यावर कळलं की, ती घार नसून धनेश पक्षी (hornbill’’) होता. मी थक्क झालो.

एक दिवस असाच मी एकटा पक्षी निरीक्षणासाठी घराबाहेर पडलो. त्या दिवशी मला एक सुंदर पक्षी दिसला. मी माझ्या रोजच्या रस्त्याने म्हणजे शाळेच्या मागच्या रस्त्याने निघालो. ओळखीची सारी पक्षी मंडळी होती. वेगळा कोणता पक्षी दिसतोय का ते मी शोधत होतो. संध्याकाळचे ५ वाजले होते. आता काही नवीन कोणता पक्षी दिसणार नाही असं वाटत होतं; पण तेवढय़ात धनेश पक्ष्याच्या आकाराएवढा बगळा उडताना दिसला. उडत उडत तो पुन्हा खाली येताना दिसला. माझ्यापासून ४० ते ५० मीटर अंतरावर तो पक्षी खाली उतरला. मी पळत गेलो; पण जरा हळू, नाही तर तो उडाला असता. पुढे गेल्यावर तो साधा बगळा नसून वेगळाच पक्षी असावा असे मला वाटले. मी कॅमेरा घेतला. आता तो माझ्यापासून अवघा १२-१३ मीटर दूर होता. मी त्याचा पहिलाच फोटो आणि रोखलेला श्वास सोडला. मनात आलं, ‘बरं झालं, एक तरी चांगला फोटो आला.’ मग म्हटलं, ‘चला, आणखी फोटो काढू.’ आणखी चार-पाच फोटो काढले. तो पक्षी मोरापेक्षा थोडा कमी उंचीचा होता. पंख पांढरे व पाठीमागून काळे होते. मान लांब होती. त्याची चोच बाकदार होती; परंतु दोन चोचींच्या मध्यभागी मोठी फट होती. मनात या पक्ष्याविषयी कुतूहल निर्माण झालं. धावत धावत घरी आलो. पहिल्यांदा पुस्तकात बघितलं कोणता पक्षी आहे ते. तो Open Billed Stork म्हणजेच उघडय़ा चोचीचा करकोचा होता. नंतर पुढे तो शेतकऱ्यांनी नांगरलेल्या शेतात खूप वेळा दिसायचा. नंतर काही महिन्यांनी मला आमच्या खेडच्या जगबुडी नदीच्या बाजूच्या झुडपात असलेल्या या पक्ष्यांचे वसतिस्थानच सापडले; परंतु पहिल्यांदा जेव्हा मी हा पक्षी पाहिला तो क्षण मला अजूनही आठवतो. त्या क्षणी मी जणू काही स्वर्गात असल्यासारखंच मला वाटत होतं.

पावसाला बोलवणारा पावश्या

जून अर्धाअधिक संपला होता. जूनच्या सुरुवातीला पडून नंतर पाऊस गुडूप झाला होता. ऊन रखरखत होतं. पाऊस पडण्याची आशा आम्ही सोडली होती. मी आणि आई संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास पक्षी निरीक्षणासाठी निघालो. बरोबर दुर्बीण, कॅमेरा, पाण्याची बाटली होती. चालत चालत आम्ही माझ्या शाळेच्या मागे आलो. रस्त्यापासून जरा पुढे गेलो- म्हणजे पन्नासेक मीटर असेल. पुढे गेल्यावर मला हिरवीगार शेते दिसली. आम्ही तिकडे जायचे ठरवले. मला तिकडे जायची एक वाट दिसली. मी ती आईला दाखवली. आम्ही तिकडून आत गेलो. थोडंसंच पुढे गेल्यावर अचानक ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ असा एका पक्ष्याचा आवाज आला. तो पक्षी आमच्या समोरून उडत गेला आणि एका झाडावर बसला. आकाराने कावळ्यापेक्षा मोठा होता. त्याच्या राखाडी रंगावर मध्ये मध्ये पांढरे ठिपके दिसत होते. आई हळूच म्हणाली, ‘‘हा तर पावश्या.’’ मी हातातल्या कॅमेऱ्याने त्या पक्ष्याचे फोटो काढले. फोटो काढल्यावर मी त्या पक्ष्याकडे बघतच राहिलो; पण जास्त वेळ तो एका झाडावर बसत नव्हता. या झाडावरून त्या झाडावर असा तो उडत होता. आईने मला एक कल्पना सुचवली, ‘‘तू याचा आवाज रेकॉर्ड करून घे.’’ मी तो आवाज रेकॉर्ड करून घेतला. बाजूला एक शेतकरीकाका आले आणि चिंतेच्या स्वरात म्हणाले, ‘‘कधी हा पाऊस पडणार?’’ नंतर आम्ही घरी आलो. पावश्या ओरडल्याच्या दुसऱ्याच दिवसापासूनच धो धो पाऊस पडू लागला. अशा प्रकारे पावश्या आपल्याला पावसाची पूर्वसूचना देतो.

बरं का मित्रांनो, पावश्याचा आवाज ऐकलात तर शेतकऱ्यांना सांगा ‘लवकरच पाऊस पडणार आहे काका!’

(रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, रत्नागिरी)