21 March 2019

News Flash

सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

ऑनलाइन जगतात वावरताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण नियमित बोलतो आहोतच.

मुक्ता चैतन्य

हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

जब भी खुलेगी चमकेगा तारा

कभी ना ढले जो, वो ही सितारा

दिशा जिस से पहचाने संसार सारा।

हथेली पे रेखाएँ हैं सब अधूरी

किस ने लिखी हैं, नहीं जानना हैं

सुलझाने उन को न आएगा कोई

समझना हैं उनको ये अपना करम हैं

अपने करम से दिखाना हैं सबको

खुद का पनपना, उभरना हैं खुदको

अंधेरा मिटाए जो नन्हा शरारा

दिशा जिस से पहचाने संसार सारा।

हे गाणं तुम्हाला माहीत आहे? गुगलवर पहिली ओळ टाकलीत की गाण्याचे शब्द आणि युटय़ुबवर गाणं दोन्ही तुम्ही वाचू, बघू शकता. मला हे गाणं फार आवडतं, कारण अगदीच साधं आहे. मला वाटतं, आपली एक छोटी कृतीसुद्धा समाज बदलायला उपयोगी पडू शकते. मुलांना अनेकदा वाटतं, ‘आम्ही लहान आहोत, आम्ही काय बदल घडवून आणू शकतो? आमचं कोण ऐकणार?’

रिचर्ड तुरेरेलासुद्धा असंच वाटायचं. तो असा काय बदल घडवून आणू शकतो? पण ज्या दिवशी त्याने प्रयत्न केला, त्याच्या गावासाठी एक मोठा बदल त्याने घडवून आणला!

रिचर्डने असं केलं तरी काय?

सांगते! रिचर्ड केनियात राहतो. नैरोबी नॅशनल पार्कच्या दक्षिणेकडे त्याचं गाव आहे, जंगलाला लागून. त्यामुळे वन्यजीवांचा नियमित वावर असतो. स्थलांतरित झेब्रे तिकडे मुक्त फिरत असतात. शिकारीचा माग काढत सिंहही येतात. मग काय, त्यांच्या तावडीत पाळीव गाईगुरं येतात. त्यांची सर्रास शिकार होते. रिचर्ड मसाई जमातीचा आहे. गुरांची शिकार ही त्याच्या कुटुंबाची आणि आजूबाजूच्या सगळ्याच घरांची मूलभूत समस्या आहे. एके रात्री त्याच्याही गुरांवर हल्ला झाला. सकाळी तो जागा झाल्यावर त्याला समजलं की त्याच्या घरी असलेला एकुलता एक बैल मारला गेला होता. त्याला फार वाईट वाटलं. सिंहाच्या या लुडबुडीवर काहीतरी उपाय शोधायचा असं त्याने स्वत:शीच ठरवून टाकलं. त्याने आधी मशालींचा विचार केला, पण त्याच्या लक्षात आलं, सिंहांना मशालींच्या उजेडात गाव अगदीच व्यवस्थित दिसतं. माणसाचा फायदा होण्या ऐवजी सिंहांचाच त्यात फायदा आहे. मग त्याने ‘बुजगावणं’ लावलं. पहिल्या दिवशी सिंह पळून गेले. पण दुसऱ्या दिवशी ते बुजगावणं जागचं हलत नाही हे लक्षात आल्यावर त्यावर उडी मारून ते गावात शिरलेच. प्राणी असला तरी तो हुशार असतोच. आता काय करायचं, असा प्रश्न रिचर्डला पडला. उत्तर तर शोधायला हवं होतं. एके दिवशी रात्री हातात टॉर्च घेऊन तो घराभोवती फिरत असताना त्याच्या लक्षात आलं की सिंह परतले आहेत. हलणारा उजेड सिंहांना घाबरवतो हे त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं होतं. पण हलणारा टॉर्च किंवा सातत्याने आपला आपण उघड-बंद होणारा टॉर्च तयार करायचा कसा? मग त्याने काही वस्तू गोळा केल्या आणि त्यापासून ‘लायन लाइट’ बनवला. त्या दिवसापासून रात्रीच्या वेळी शिकारीसाठी सिंहांचं गुरांवर हल्ले करणं बंद झालं. त्याच्या घराजवळच राहणाऱ्या एक आजी त्याला म्हणाल्या, ‘मलाही बनवून दे रे!’ मग काय, रिचर्डने त्यांनाही ‘लायन लाइट’ बनवून दिला. रिचर्डच्या एका छोटय़ा प्रयत्नामुळे आज त्याच्या गावाची समस्या दूर झाली आहे. गुरांची शिकार बंद झाली आहे. रिचर्ड सांगतो, ‘‘मला सिंहांचा फार राग यायचा. मला ते अजिबात आवडायचे नाहीत. आमची माणसं गुरं वाचवण्यासाठी सिंहांना मारून टाकायचे. पण माझ्या एका छोटय़ा प्रयत्नांमुळे मी माझ्या वडिलांची गुरं वाचवू शकलो. आज आमच्याजवळ आमची गुरं आहेत आणि सिंहांना मारणंही बंद झालंय. आम्ही, आमची गुरं आणि सिंह सगळे आनंदाने राहतोय. कुणाला कुणाचा त्रास नाही.’’

तुम्हा मुलांमध्ये बदल घडवून आणण्याची प्रचंड ताकद असते. पाण्याची, विजेची बचत, रस्त्यावर रहदारीचे नियम पाळले जावेत याबद्दल तुम्ही सहज आग्रह धरू शकता. बदल घडवून आणू शकता. रिचर्डने केला तसा बदल घडवून आणू शकता. रिचर्डची संपूर्ण गोष्ट वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी या लिंकचा वापर करा. https://www.ted.com/talks/richard_turere_a_peace_treaty_with_the_lions/transcript?referrer=playlist-ted_under_20

रेड अलर्ट

  • ऑनलाइन जगतात वावरताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण नियमित बोलतो आहोतच. आता काही तांत्रिक मुद्दे लक्षात ठेवा.
  • तुम्ही जो लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट फोन, टॅब वापरत असाल ती सिस्टीम सिक्युअर आहे ना, हे पालकांना विचारून घ्या. नसेल तर सिस्टीम सिक्युअर करा.
  • शंका उपस्थित करणाऱ्या मेल्स, मेसेजेस अजिबात उघडू नका. त्यावर क्लिक करू नका. नेहमीपेक्षा वेगळं काही असेल तर त्याबद्दल पालकांना सांगा.
  • सोशल मिडिया, ई-मेल पासवर्ड सातत्याने बदलत राहा.
  • कंटाळा आला की ऑनलाइन जाण्याची अनेक मुलांना सवय असते. या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका. कंटाळा आला तर करण्यासारख्या इतरही अनेक गोष्टी आहेत. ऑनलाइन जाणं नियमित असण्याची गरज नाही.
  • तुम्ही काढलेले सेल्फी कुठेही अपलोड करण्याआधी एकदा आई-बाबांशी बोला. त्यांना सांगून अपलोड करण्यात काहीही कमीपणा नसतो. उलट तुम्ही चुकीच्या पद्धतीने काही अपलोड करत असाल तर ते तुम्हाला सावध करू शकतात.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

First Published on June 3, 2018 12:28 am

Web Title: mukta chaitanya article for kids in loksatta