‘‘आई, मला जरा मोबाइल दे गं.’’

‘‘कशाला?’’

‘‘मला वेब सीरिअल बघायची आहे.’’

दहा वर्षांच्या माझ्या लेकीच्या तोंडून वेब सीरिज वगैरे शब्द ऐकून मला उगाच गांगरायला झालं. पण मनीचे भाव चेहऱ्यावर न येऊ  देता मी तिला विचारलं, ‘‘कुठली वेब सीरिज?’’

त्यावर ती मिश्कीलपणे हसत म्हणाली, ‘‘डोन्ट वरी आई, असं तसं काही बघत नाहीये,आणि तुमच्या मोठय़ांच्या सीरिज तर मुळीच नाही. त्या बोअर असतात. मला ‘सिस वर्सेस ब्रो’ बघायची आहे.’’

माझा जीव उगीचच भांडय़ात पडला.

तुमच्यात आणि तुमच्या आई-बाबांमध्येही कधीतरी असा संवाद झालाच असेल ना! तुम्ही सगळे आई-बाबांचे स्मार्टफोन्स, टॅब्स, लॅपटॉप आणि हल्ली अमेझॉन फायर स्टिक वापरत असणार. कदाचित तुमच्यापैकी काही जणांकडे स्वत:ची गॅजेट्सही असतील. किंवा आई-बाबांनी ती घेऊन द्यावीत अशी इच्छा असेल. हो ना?

इंटरनेटवर गेल्यावर गूगलमध्ये सर्च कसं करायचं, अ‍ॅप्स कशी डाउनलोड करायची, नवीन नवीन ऑनलाइन गेम्स, गूगल प्ले कसं वापरायचं, या सगळ्याची मूलभूत माहिती तुम्हाला आहेच. ते काही तुम्हाला शिकवायची गरज नाहीये. कारण तुमच्या हातात तुम्ही अगदी चिमुरडे होतात तेव्हापासून ही गॅजेट्स आहेतच. पण त्याचबरोबर तुम्ही जरा जास्त वेळ यूटय़ूबवर काहीतरी बघत असाल तर आई-बाबा लगेच काय बघताय याची विचारपूस करतात. कारण त्यांना तुमची काळजी असते. या प्रचंड मोठय़ा आभासी जगात जशा मुलांसाठी खूप चांगल्या साइट्स आणि अ‍ॅप्स आहेत, तशाच धोकादायक गोष्टीही आहेत. मेंदूला चालना देणारे गेम्स आहेत तसेच निराशेची, रागाची भावना अप्रत्यक्षपणे वाढणारे गेम्सही आहेत. पोकेमॉन गो आठवतंय ना? त्याच्या दुष्परिणामांची जाणीव झाल्यावर आपल्याकडे या गेमवर बंदी आणावी लागली. आई-बाबा सारखं ‘हे बघू नकोस, ते बघू नकोस’ असं करायला लागले की ‘मोठे कित्ती बोअर असतात’ असं मनात येऊन जातंच ना! मग प्रश्न येतो- जर तुमच्याकडे इतकं जबरदस्त माध्यम आहे, ते वापरायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे, तर तुमच्या या वापराला जरा दिशा दिली तर तुम्हाला आवडेल ना!

आता एक गोष्ट करू या, ‘हे बघू नकोस’, ‘ते बघू नकोस’ ऐवजी काय बघायचं याबद्दल गप्पा मारूया? कशी वाटतेय कल्पना? इंटरनेटमुळे मुलं कशी बिघडत चालली आहेत याची चर्चा आम्ही मोठे फार करत असतो ना? आता याच इंटरनेटच्या फायद्यांची, इथल्या भटकंतीत काय काय बघता, वाचता, ऐकता येईल याची माहिती घेऊ या.

आता तुम्ही म्हणाल, ‘ती कशी?’

तर याच लेखमालेतून.. इंटरनेटच्या जगात तुम्हा मुलांसाठी असलेल्या भन्नाट साइट्सची, माहिती देणाऱ्या विविध व्हिडीओजची, उपयुक्त अ‍ॅप्सची माहिती या लेखमालेतून मी तुम्हाला देणार आहे. आपल्या हातात जबरदस्त माध्यम आहेच तर मग ते जरा स्मार्टली वापरू या ना! काय म्हणता?

मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)