बेल वाजली. दारात सोसायटीचा वॉचमन सक्र्युलर्सची थप्पी घेऊन उभा होता. मिंकूच्या बाबांनी सही केली आणि सक्र्युलर घेतलं. ते सक्र्युलर सोसायटीच्या कल्चरल कमिटीचं होतं.
‘‘काय रे हे मिंकू, यावर्षी धुळवड साजरी करायची नाही, असं म्हणतंय हे सक्र्युलर!’’ मिंकू कल्चरल कमिटीचा सदस्य होता.
‘‘होय बाबा.’’
‘‘का रे?’’
‘‘बाबा, गेल्या वर्षीचं आठवतंय नं, काणे आजोबांचं? मी मारलेला फुगा आजोबांच्या डोळ्यावर जोरात बसला असता ना, तर भलतंच होऊन बसलं असतं. तरी पुढचे आठेक दिवस आजोबांना त्या डोळ्याने कमीच दिसत होतं. याआधी आजोबा कित्ती खेळायचे आमच्या ग्रुपशी! आम्हाला अभिनय शिकवायचे, आमची छोटी छोटी स्कीट्स बसवायचे. आम्हाला खूपच मज्जा यायची त्यांच्याबरोबर.’’
काणे आजोबा नाटककार होते. त्यांनी सोसायटीतल्या बऱ्याच मुलांचे अभिनयाचे  विनामूल्य वर्कशॉप्स घेतलेले होते. मिंकूही त्या ग्रुपमध्ये होता. त्याचा दादाही कॉलेजच्या नाटकांसाठी त्यांच्याकडून टिप्स घ्यायचा.
‘‘पण हा प्रकार झाल्यानंतर मात्र काणे आजोबा बोलेनासेच झाले आमच्याशी. आपल्या आजोबांनीही कित्ती सांगून पाहिलं त्यांना.. पण काहीच उपयोग नाही झाला. नंतर ते सहा महिने इथे नव्हतेच. परत आल्यावर वाटलं होतं, की सगळं विसरले असतील. पण अजून रागावलेलेच आहेत ते. आम्हाला खूप गिल्टी वाटतंय बाबा!’’
‘‘अरे, पण त्यांचं काय चुकलं सांग? त्यांच्या डोळ्याला कायमची इजा झाली असती तर?’’
‘‘पण आम्ही मुद्दाम तर नव्हतं केलं नं?’’
‘‘हो, पण खेळताना भान नको का? पूर्वी होळी खेळताना पारंपरिक अबीर आणि गुलाल वापरायचे. हल्ली  रंगांमध्ये किती केमिकल्स असतात, सांगतात नं टीव्हीवर! तुमच्या टीचरही सांगतात ना शाळेत..?’’
‘‘होळी खेळायची तुलाच दांडगी हौस असते मिंकू. कुणी समजवायला गेलं तर तू रुसून बसणार! त्यामुळे तुझं तुलाच कळलं ते बरं झालं!’’ दादा म्हणाला. त्याला रंग लावणं, भिजणं वगैरे अज्जिबात आवडत नसे.
‘‘आणि पाण्याची किती नासधूस!’’ आई स्वयंपाकघरातून म्हणाली.
‘‘तर काय! इथे आपल्या ताराबाई रोज हंडे वाहून पाणी नेतायत.. आणि आपण ते कसंही वाया घालवतोय!’’ आजी जरा चिडूनच म्हणाली.
‘‘म्हणूनच कानाला खडा! फुगेपण नकोत आणि रंगपण!’’ मिंकू वैतागून म्हणाला.
‘‘ठीक आहे बाळा. देर आये, दुरुस्त आये!’’ आजोबा म्हणाले.
‘‘आजोबा, सगळ्यांनाच ते जाणवलंय हो. म्हणूनच आम्ही ठरवलंय- धुळवड नाही साजरी करायची. म्हणूनच हे सक्र्युलर काढलंय आणि सगळ्या मेम्बर्सच्या सह्या घेतोय. म्हणजे कोणीच खेळणार नाहीत.’’
‘‘होळी कशी साजरी करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मिंकू. तुम्ही सक्ती का करताय?’’ आई म्हणाली.
‘‘किंवा वेगळं काहीतरी करा नं, की ज्याने कुणाला त्रास होणार नाही.’’ बाबांनी सुचवलं.
‘‘वेगळं म्हणजे काय करू?’’
‘‘मी सांगतो. यावर्षी होळीनिमित्त एक वेगळा कार्यक्रम करू या.. होलिकादहन.’’ आजोबा म्हणाले. मिंकू आणि दादाच्या प्रश्नार्थक नजरा पाहून आजोबा हसले.
‘‘अरे, जसं आपण दसऱ्याला रावणदहन करतो ना, तसंच होलिकादहन करायचं. आणि तेही नाटक स्वरूपात. आपण नाशिकला गेलो होतो तेव्हा रामलीला पाहिली होती- आठवतंय?’’
‘‘हो! पण त्याचं इथे काय?’’ मिंकूनं विचारलं.
‘‘हे बघा, होळी पौर्णिमेला जेव्हा आपण होळी पेटवतो नं, त्याआधी होलिकादहनाची कथा नाटय़रूपात सादर करायची आणि नंतर होळी पेटवायची. अनायासे तुम्ही काण्यांकडून अभिनय शिकतच होतात; तर करा एक पंधरा-वीस मिनिटांचं स्कीट! कशी वाटली आयडिया?’’
‘‘सही! पण काणे आजोबा नाही यायचे नाटक बसवायला!’’
‘‘अरे, तुम्ही सुरुवात तर करा! एक नाटककार नाटकापासून फार लांब नाही राहू शकणार! मिंकू, मला सांग, मी गेल्या वर्षी सांगितलेली होलिकादहनाची कथा आठवतेय तुला?’’
‘‘हो! हिरण्यकश्यपू नावाचा एक बलाढय़ राक्षस होता. त्याच्यामध्ये खूप पॉवर्स होत्या. इतक्या, की तो स्वत:ला देव समजायला लागला होता. त्याला एक मुलगा होता- प्रल्हाद. तो श्रीविष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपूला प्रल्हादचं विष्णूची पूजा करणं मान्य नव्हतं. म्हणून त्याने प्रल्हादला मारण्यासाठी अनेक कारस्थानं केली; पण प्रल्हाद नेहमीच त्यातून वाचला. एकदा हिरण्यकश्यपूच्या धाकटय़ा बहिणीने- होलिकाने प्रल्हादला मारण्यासाठी प्लान केला. होलिकाकडे एक शाल होती. ती जर तिने पांघरली तर आग तिचं काहीही बिघडवू शकत नसे. तिला ब्रह्मदेवाने दिलेलं ते वरदान होतं. तिने हिरण्यकश्यपूला आगीची व्यवस्था करायला सांगितली. हिरण्यकश्यपूने लाकडांचा एक ढीग रचून तो पेटवला. होलिकाने शाल पांघरली आणि प्रल्हादाला घेऊन तिने आगीत उडी मारली. पण प्रल्हादाच्या विष्णुभक्तीमुळे होलिकेची शाल प्रल्हादाच्या अंगावर उडाली. त्यामुळे प्रल्हादाच्या ऐवजी होलिकाच त्या आगीत जळून गेली. म्हणून या होळी फेस्टिवलला ‘होलिकादहन’ असंही म्हणतात. बरोबर नं, आजोबा!’’
‘‘पर्फेक्ट! आता या गोष्टीचं मॉरल काय?,’’ आजोबांनी विचारलं.
‘‘चांगल्याचा वाईटावर विजय!’’
‘‘करेक्ट. आपण पेटवतो ती होळी याचंच तर प्रतीक आहे!’’
‘‘काय दादा, करायचं हे नाटक? मदत करशील आम्हाला?’’
‘‘ओक्के. आय अ‍ॅम इन.’’ दादा म्हणाला.
‘‘बेस्ट! मी उद्याच कमिटी मेंबर्सना विचारतो.’’ मिंकू म्हणाला.
‘‘पण अभ्यासाचं काय? परीक्षा जवळ आल्या आहेत!’’ आईने मुद्दय़ावर बोट ठेवलं.
‘‘आई, खेळण्याच्या वेळेतच करू आम्ही तालमी! वेगळा वेळ नाही द्यावा लागणार!’’  मिंकू म्हणाला.
दुसऱ्या दिवशी रात्री सगळे जेवायला बसलेले असताना मिंकू म्हणाला, ‘‘आजोबा, कमिटीला तुमची आयडिया जाम आवडलीये. सोसायटीच्या नवीन स्टेजवर नाटक करायचं ठरलंय.’’
‘‘मस्तच! वर्गणी काढून एवढं स्टेज बांधलंय, पण त्याचा अजून काहीच उपयोग केला नाहीये आपण.’’ दादा म्हणाला.
मिंकूच्या बिल्डिंगच्या गच्चीवर नाटकाची तयारी सुरू झाली. मिंकूच्या दादाने डायलॉग्ज लिहिण्याची आणि डिरेक्शनची जबाबदारी घेतली. मिंकू सर्वानुमते प्रल्हाद बनला. मिंकूचा मित्र निलय जरा अंगकाठीने उंच व धिप्पाड होता. तो हिरण्यकश्यपूच्या रोलसाठी तयार झाला. मिंकूची मैत्रीण वैशाली उंच होती आणि तिचे केसही लांब होते. ती होलिका झाली. ब्रह्मदेव आणि विष्णूच्या भूमिका मिंकूच्या अभिनय ग्रुपमधल्याच दोन मुलांना वाटून दिल्या. खरं तर सगळ्यांना काणे आजोबा नाटक बसवायला हवे होते; पण त्यांना बोलवायची हिंमत कुणाच्यात नव्हती. तरी पुढच्या पंधरा दिवसांत सगळ्यांनी मिळून नाटक बसवलं.. तालमी झाल्या.
होळी पौर्णिमेच्या दिवशी स्टेजच्या बरोब्बर समोर काही अंतरावर ग्राऊंडवर खोल खड्डा खणून होळी बांधून तयार होती. मधे प्रेक्षकांसाठी सतरंज्या आणि खुच्र्या मांडल्या होत्या. सगळे कलाकार तयार होते. मंडळी जमल्यावर नाटक सुरू झालं. प्रेक्षकांमध्ये कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर काणे आजोबाही बसले होते. जेव्हा होलिकादहनाचा सीन आला तेव्हा त्यांच्याकडे होळी पेटवण्याचा आग्रह सर्वानीच केला. त्यांनीही मग वर्षभराचं सगळं मागे टाकून होळी पेटवली. सर्वानी टाळ्या वाजवल्या. आजोबांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. नाटक संपल्यावर ते मुलांना म्हणाले, ‘‘मुलांनो, तुम्ही खूपच छान नाटक केलंत. मिंकू, तुझ्या आजोबांनी मला आधीच याची कल्पना दिली होती आणि नाटकपण बसवायला बोलावलं होतं. पण मला बघायचं होतं, की मी दिलेली शिकवण तुम्ही कसे उपयोगात आणताय ते! आणि खरं सांगू, तुम्ही माझ्या या परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाला आहात!’’
‘‘य्येऽऽऽऽऽ’’ सगळी मुलं जोशात एकत्र ओरडली.
काणे आजोबा पुढे म्हणाले, ‘‘मुलांनो, जशी दिवाळी आतषबाजीशिवाय अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे होळीचा सण हा रंगांशिवाय अपुरा आहे. गेल्या वर्षी मला झालेल्या दुखापतीमुळे तुम्ही धुळवड साजरी करायची नाही हे ठरवताय ना? तसं नका करू. अरे, धुळवड ही राधा-कृष्णाच्या मैत्रीचं प्रतीक आहे. ती साजरी करण्यामागे एक मोठी परंपरा आहे. लाल, हिरवा, निळा, पिवळा हे रंग पावित्र्य, चेतना, शांतता, आनंद यांचं प्रतीक आहेत. फक्त हा रंगांचा सण साजरा करताना कुणाला त्याचा त्रास तर होत नाहीये ना, याचं भान ठेवा, इतकंच.’’
‘‘आमचं चुकलं. आम्हाला माफ करा..’’ मिंकू सर्वाच्या वतीने म्हणाला.
‘‘अरे, जेव्हा मी ते सक्र्युलर वाचलं, तेव्हाच माझा राग गेला होता. आणि मीही खूपच ताणून धरलं. सॉरी. तुम्ही नाटकात सांगितलं त्याप्रमाणे होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा तर सण आहेच; पण त्याचबरोबर जुनी भांडणं, वैर, हेवेदावे सारं काही विसरून नव्याने मैत्री करायचादेखील सण आहे. त्यामुळे आजपासून आपण सगळे परत एकदा फ्रेंड्स!’’
मुलं एकदम खूश झाली आणि त्यांनी
काणे आजोबा आणि होळीभोवती फेर धरला.. पौर्णिमेचा चंद्रही ही आगळीवेगळी होळी पाहून गालातल्या गालात हसला..
प्राची मोकाशी – mokashiprachi@gmail.com