News Flash

नवे वर्ष.. नवा शब्द-संकल्प

आईची ही हाक ऐकली आणि त्याने लगेच उठून आईला अगदी लडिवाळपणे मिठी मारली.

(संग्रहित छायाचित्र)

रूपाली ठोंबरे

rupali.d21@gmail.com

ओम बऱ्याच वेळापासून एकटाच विचार करत त्याच्या खोलीत बसला होता. इतक्यात त्याला शोधत त्याची आई आत आली.

‘‘अरे ओम, तू इथे आहेस होय. घरभर शोधते आहे मी तुला कधीपासून आणि तू हा इथे. हे घे, आधी दूध पिऊन घे. आणि हे काय, इतका कोणत्या विचारात गुंग झाला आहेस?’’

आईची ही हाक ऐकली आणि त्याने लगेच उठून आईला अगदी लडिवाळपणे मिठी मारली. अगदी शहाण्या मुलासारखं तिनं आणलेलं दूध गट्टम् केलं. ओठांवर उगवलेली पांढरी मिशी पुसत तो आईला सांगू लागला.

‘‘आई, मी ना एका नव्या संकल्पाचा विचार करतो आहे.’’

‘‘संकल्प? तो कशाला बरं?’’

आईनं अगदीच न समजल्यासारखं छोटय़ा ओमला असा प्रश्न विचारला आणि त्याच्या बालवाचेला वाट फुटली.

‘‘अगं आई, आता डिसेंबर महिना संपला ना. १ जानेवारीला नवं वर्ष उजाडलं आणि या नवीन वर्षांत आम्ही सर्व बालमित्रांनी काही तरी संकल्प करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे मी एखादी वाईट असलेली सवय या नवीन वर्षांत सोडून देईन. किंवा एखादा नवा उपक्रम या नवीन वर्षांत सुरू करेन. आमच्यातल्या अनेकांनी आपापले संकल्प सांगितलेदेखील. तो रोहित या नव्या वर्षांत अजिबात खोटं बोलणार नाही. ती सायली स्वत:च्या वस्तू योग्य ठिकाणी स्वत:च ठेवणार. आणि तो मनित आहे ना, तो तर या वर्षी वेगवेगळ्या प्रकारची तिकिटं गोळा करणार आहे.. कोणी तबला शिकणार, तर कोणी नृत्य.’’

‘‘अरे व्वा! ही कल्पना तर खूपच सुंदर आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की, एकदा का एखादा निश्चय केला की काही झालं तरी अजिबात मागे हटायचं नाही. वाटल्यास अगदी सोपा उपक्रम घ्यायचा, पण तो नियमितपणे चालू ठेवायचा. पण तू तर सांगितलंच नाहीस की तू काय करणार आहेस?’’

‘‘अगं, तेच तर कळत नाही ना की मी काय करू शकतो ते? मला ना काहीतरी खूप खास आणि सर्वापेक्षा खूप वेगळं करायचं आहे. तू मला मदत करशील का ठरवायला? तूही विचार करून बघ की काही सुचतं का नवीन.’’ असं म्हणत कुशीत शिरणाऱ्या ओमला थोपटत आई पुढं सांगू लागली..

‘‘हो हो. नक्कीच. माझ्याकडे एक सुंदर कल्पना आहे. बघ तुला पटते का ती. मी तर सांगेन, तू या नव्या वर्षांत तुझा मित्रपरिवार खूप वाढवायचा आणि त्यासाठी रोज पाच नवे शब्दमित्र मिळवायचे..’’

‘‘शब्दमित्र? हे काय गं नवीन?’’

बोलत असणाऱ्या आईला असं मधेच थांबवत चकित झालेल्या ओमने आपली शंका विचारली. तशी आई गोड हसली आणि आपल्या ओमच्या शंकेचं निरसन करत ती पुढे बोलू लागली. ‘‘ओम, लहानपणी ‘बा, बा, मा, पा’पासून सुरू होते आपली सर्वाचीच या जगातल्या सर्वात सुंदर अशा ‘शब्द’ या देणगीशी ओळख. अगदी सुरुवातीला हे एकाक्षरी बोलच आपले संवादाचे साधन आणि तुमच्या या बोबडय़ा बोलांचा आम्हा वडीलधाऱ्यांना वाटणारा केवढा तो आनंद. थोडे मोठे झालो की, अ, आ, इ, ई, क, ख, ग या मुळाक्षरांपासून सुरू होत पुढे या अक्षरांना योग्य काना, मात्रा, वेलांटीने सजवत शब्दांची सुंदर रचना शिकत जातो, तेव्हा नवीन शब्द शिकणे, त्याचा अर्थ समजून घेणे, योग्य ठिकाणी वापरून सर्वाना अचंबित करणे हा जणू छंदच. रोजच्या व्यवहारातील असे खूप शब्द बालपणीच्या मित्रांप्रमाणे आपल्या मेंदूत जमू लागतात. मग शाळा, कॉलेज जसजसे पुढे शिकत राहू, तसे रोज नवनवीन शब्दमित्र भेटत राहतात आणि अशा प्रकारे हा मित्रपरिवार वर्षांनुवर्षे पुढे वाढत राहतो. जितक्या भाषा जास्त तितका विविध शब्दसंचय आपल्या ठायी. एखाद्या खऱ्याखुऱ्या मित्राप्रमाणे जेव्हाही गरज पडेल, हे शब्द लगेच साहाय्य करण्यासाठी धावून येतील. कधी समजावण्यासाठी, कधी सल्ला देण्यासाठी, तर कधी कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी नेहमीच हे शब्द आपली साथ देतात. आपण जितके नवीन वाचू, ऐकू तितका हा अमूल्य मित्रपरिवार वाढत जातो.

रोज रात्री आकाशात असंख्य दिवे लागतात आणि त्यासोबतच पृथ्वीवरचे दिवे मालवतात आणि शांतपणे निजणाऱ्या या जगासोबत आपणही झोपेची वाट पाहत पडून राहतो क्षणभर; पण अशा वेळी कधी असा विचार मनात आला आहे का, की आजच्या दिवसात आपण नक्की काय शिकलो?’’

‘‘ओम, ऐकतो आहेस ना तू की कंटाळलास इतक्यात?’’ आईने मध्येच ओम ऐकत असल्याची पडताळणी केली.

‘‘अगं, नाही गं आई. तू सांग ना. मी आतापर्यंत कधीच विचार केला नाही गेलेल्या दिवसांत घडलेल्या घटनांचा, पण आता वाटतं आहे करायला हवा. तू बोल ना. अजून सांग असेच छान काहीतरी.’’

आईने गालातल्या गालात हसत ओमच्या गालाचा मुका घेतला आणि ती पुढे बोलू लागली. ‘‘तर बरं का ओम, असे प्रश्न कधी तरी स्वत:ला नक्कीच विचारून पाहावे. बहुतेक वेळा आपल्या या प्रश्नाला खूप उत्तरे असतीलही, पण कधीकधी आपण निरुत्तर असतो, कारण तो दिवस काहीही न शिकवताच गेलेला असतो. खरे तर शिक्षण सुरू असताना रोज नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो; पण एकदा का नोकरीच्या रहाटगाडय़ाला आपले जीवन बांधले गेले की मग मात्र कित्येक दिवस तेच तेच काम करत असताना नवे काही शिकण्याचेच विसरून जातो आणि मग बुद्धीला गंज चढावा असे आपले होऊन जाते.

‘‘माझ्या मते, जीवन म्हणजे एक अखंड शाळा- जिथे कायम काही तरी शिकत राहिले पाहिजे; पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण वाचन, नवे शिकणे विसरून जातो आणि या संचयाची वाढ जणू खुंटून जाते. काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका शिक्षकांनी एक छान गुरुकिल्ली दिली होती, ती आज तुला सांगावीशी वाटते. रोज जास्त नाही फक्त ५ नवे शब्द अर्थासहित शिकावे. तुझ्या मित्रांनाही सांग. खरं तर प्रत्येकाने हे करून पाहायला काहीच हरकत नाही. झाला तर कधी तरी फायदाच होईल, यात तिळमात्रही शंका नाही. ओम, तू आता रोज थोडाफार का होईना, पण रोज वर्तमानपत्र वाचतोस, नवीन पुस्तके वाचतोस. बरेच काही ऐकतोस तेव्हा असे अपरिचित सापडलेले शब्द दुर्लक्षित करून पुढे जाण्याऐवजी त्यांना थोडे गोंजारावे, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मागे कधी काही ओळख होती का हे पडताळून पाहावे, आणि नाहीच आपल्या सान्निध्यातला वाटला तर इतर कुणाला सांगून पाहावा. कुठे तरी शोधून पाहावा. मला खात्री आहे या नवीन मित्राचं नाव, गाव, अर्थ,

नाते सर्व नक्कीच कधीतरी गवसेल. मग त्याला घेऊन त्याच्या भाऊ-बहिणींशी दोस्ती करून पाहावी. कधीकधी त्याचेच प्रतिबिंब दिसणारे, म्हणजे समान अर्थाचे नवे शब्दसुद्धा शोधून पाहावे. मग आपोआपच त्याच्या अर्थाला विरोध करणारासुद्धा एखादा शब्द समोर येईल. या सर्वाना एकत्र आणून पाहावे. अव्यये, क्रियापदे, विशेषणे आदींच्या धाग्यांमध्ये त्यांना गुंफून अर्थपूर्ण वाक्ये निर्माण होतील. अशा वाक्यावाक्यांना एकमेकांना जोडून किती काही करता येईल. गंमत असते रे तीपण!

‘‘विचार करून बघ, असे रोज फक्त पाच शब्द जरी तुझ्या मित्रपरिवारात मिळवलेत तरी कित्ती शब्द साठतील वर्षभरात?’’

मघापासून शांतपणे आईचं बोलणं ऐकणारा ओम टुणकन् उडी मारून आईसमोर बसला आणि हाताच्या बोटांवर बरीच गणिते मांडून मिळालेल्या उत्तराने मिळालेल्या आनंदात उद्गारला, ‘‘आई, मज्जाच आहे गं ही तर.. रोज पाच शब्द म्हणजे आठवडय़ाला ३५, एक महिन्यात १५० आणि एका वर्षांत १८२५ नवीन शब्द. डिक्शनरी घेऊन बसलो ना तरी एवढे शब्द शिकायचे म्हणजे अंगावर काटाच उभा राहील आणि हे अशक्यच असे मानून एखाद्या वेळी ते झटकून टाकण्याचे मन होईल.’’

ओमच्या डोळ्यांसमोर ती जाडजूड डिक्शनरी आणि त्यातील लाखोंच्या वर शब्दांची गर्दी झाली. तो जरा स्तब्ध झाला. तसे त्याला पुन्हा जवळ घेत आई त्याला समजावू लागली. ‘‘पण ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे रोज फक्त ५ असे शब्दज्ञान मिळवले तर आयुष्यात आपण भाषेत बरेच प्रवीण होऊ, नाही का? मग ती भाषा कोणतीही असो. शब्दसंचय मुबलक असेल तर कोणत्याही भाषेवर व्याकरणाची योग्य साथ घेऊन त्यात प्रावीण्य मिळवू शकतो.आपले मत योग्य प्रकारे मांडणे ही माणसाची नेहमीच एक खूप मोठी गरज आहे; वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातदेखील आणि हे या शब्दरूपी मित्रांच्या साथीनेच शक्य आहे. तुझ्या रोजच्या वापरात जरी एखादा नवा शब्द आला तरी त्याला जवळ घे. शिवाय, पुस्तकांतूनसुद्धा तुला ते भेटतीलच आणि मग त्यानंतर त्या नव्या पाहुण्याची ओळख पटवून घेण्यासाठी त्या जाडजूड डिक्शनरीचा वापर करायचा. मग बघ, हळूहळू तीसुद्धा तुला आवडू लागेल आणि एक दिवस तीसुद्धा तुझी एक खास मत्रीण बनून नेहमी सोबत राहील.’’

‘‘मग तू काय ठरवलंस ओम? या नव्या वर्षांत करायची ना ही नवी सुरुवात? दिवसातून ५ मिनिटे काढायची या ५ नव्या मित्रांना शोधण्यासाठी.’’

ओमने ‘हो’ असा मोठय़ाने होकार देत पुन्हा आईला घट्ट मिठी मारली.

‘‘आई, मला तर हा छंद अगदी आयुष्यभर जोपासायला आवडेल. जगात कित्ती भाषा आहेत आणि त्यात विचारही करू शकणार नाहीत इतके शब्द. या सर्वाना मित्र बनवून आपल्या शब्दपरिवारात जोडायला तर कोणालाही आवडेल. तू सुचवलेला हा संकल्प खूप सुंदर आहे.. एकदम सोपा आणि खूप उपयोगाचा. थँक यू आई.’’

मनाजोगा संकल्प मनाशी धरल्याचे समाधान, तो पूर्णत्वास नेण्याचा निश्चय आणि काहीतरी नवे गवसल्याचा आनंद या तिन्ही भावनांचा मेळ त्या बालमुखावर अगदी उठून दिसत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 4:04 am

Web Title: new year new word resolution balmaifal article abn 97
Next Stories
1 चित्रांगण : चित्रांसंगे मनमुक्त होऊ या
2 झाकली मूठ
3 गजाली विज्ञानाच्या : वर झगझग आत भगभग
Just Now!
X