11 August 2020

News Flash

फळांत फुले

बालमित्रांनो, आपण मागील आठवडय़ात अळूच्या झाडाविषयी मनोरंजक माहिती पाहिली. यावेळी आपण अशाच एका आपल्याला सहज माहिती असलेल्या झाडाची माहिती घेणार आहोत.

| February 8, 2015 01:48 am

बालमित्रांनो, आपण मागील आठवडय़ात अळूच्या झाडाविषयी मनोरंजक माहिती पाहिली. यावेळी आपण अशाच एका  आपल्याला सहज माहिती असलेल्या झाडाची माहिती घेणार आहोत. तुम्हा सर्वानाच अंजीर आवडते ना! मग या अंजिराच्या फुलांबाबत माहिती घेऊया.
bal06आपल्याकडे वड, पिंपळ, उंबर ही झाडे सर्वसामान्यपणे सर्वच ठिकाणी असतात. आपल्यापकी कित्येकांनी तर उंबराची फळेही खाल्ली असतील. खरं तर अंजीर, वड, िपपळ, उंबर ही सर्व झाडे एकाच कुलातील आहेत. अर्थात, आपण यापकी फक्त काहीच झाडांची फळे खातो; परंतु पक्षी मात्र वड-िपपळाच्या झाडांची फळे मोठय़ा प्रमाणात आवडीने खातात. हे असे असताना मात्र आपल्यापकी कित्येक जणांना या झाडांची फुले पाहायला मिळत नाहीत. आपल्याकडी एका म्हणीतही ‘उंबराच्या फुलासारखी दुर्मीळ गोष्ट,’ असा संदर्भ आहे. आज आपण या दुर्मीळ गोष्टीचा शोध घेणार आहोत. वास्तविक पाहता ही फुले कशी पाहायची हे माहीत नसल्याने अनेकांना ही फुले कुठे शोधयाची हे कळतच नाही. फुले म्हटल्याबरोबर आपण कल्पना करतो, की एखादे छोटे किंवा मोठय़ा आकाराचे फूल. किंवा पांढरे वा अत्यंत मनमोहक रंगामध्ये आणि त्याला विशिष्ट वास असेल. या कल्पनेप्रमाणे जर वरीलपकी  कोणतेही एक झाड पाहिले तर आपल्याला फक्त फळेच लागलेली दिसतात, फुले कधीच दिसत नाहीत. म्हणूनच ही फुले दुर्मीळ असल्याची कल्पना केलेली आहे. पण खरी गंमत या छोटय़ा फळांमध्येच आहे. या सर्व फळांची अंतर्गत रचना फार सुंदर असते. जर आपण वड, िपपळ, उंबर किंवा अंजीर यांपकी कोणतेही फळ उघडून पाहिले तर शेजारी दिलेल्या चित्रांनुसार भाग दिसून येतील. या गोलसर फळामध्ये अगदी छोटी छोटी फुले फळाच्या आतल्या बाजूला तोंड करून उभी असतात. ही फुले अगदीच छोटी असतात व अत्यंत दाटीवाटीने वाढतात. ही सर्व फुले फळांच्या आतल्या भागात असल्याने बाहेरून कधीच दिसत नाहीत. अर्थात, त्यामुळेच प्रश्न पडतो की यामध्ये परागीभवन कसे होते? किंवा मग फळ कधी तयार होते? खरे तर या प्रकारच्या झाडांमध्ये सर्व फुलांचा गुच्छ तयार झालेला असतो व हा गुच्छ फळाच्या आकाराचा असतो व या सर्व फुलांचा देठाकडील भाग हा फळाची जी मऊसर साल असते त्यात परिवíतत झालेला असतो. म्हणूनच आपल्याला सर्व फुले ही आतल्या बाजूस गोलाकार पद्धतीने असलेली दिसतात. खरे तर यातही मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे फुलांची रचना वैशिष्टय़पूर्ण असते. यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात. आपण नेहमी उंबर खायला घेतले की त्यात अत्यंत छोटे छोटे किडे दिसतात. हे किडेच या फुलांमधील परागीभावन घडवून आणतात व ते किडे फळाच्या अग्रभागात असलेल्या छोटय़ा रंध्रातून बाहेर पडतात. परागीभवन पूर्ण झाले की फळ पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. जे फळ सुरुवातीला हिरव्या रंगाचे व एकदम कडक असते; त्याचा रंग बदलून लालसर होतो व फळ मऊसर होते. विशेषत: अंजीर, उंबर व वडाच्या फळांमध्ये हे प्रकर्षांने दिसून येते.
या फळांच्या निरीक्षणाकरिता एक छोटासा प्रयोग करून बघा. आपल्या सभोवताली असणाऱ्या उंबराच्या झाडाचे एक कच्चे व एक पिकलेले फळ घ्या. ही दोन्ही फळे मोठय़ांच्या मार्गदर्शनाखाली ब्लेडच्या साहाय्याने काळजीपूर्वक मधोमध कापून घ्या. देठाकडील व फळाच्या अग्रभागाकडील काही फुले काढून घ्या व प्रयोगशाळेत जी काचपट्टी वापरतात त्यावर ठेवा. त्यातील एक एक फूल स्वतंत्र करा व शक्य असल्यास या फुलांचे शाळेतील साध्या सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. बघा बरे, या चारही प्रकारच्या फुलांमधे काय काय फरक दिसतात. हे सर्व केल्यावर मला लिहून कळवायला मात्र विसरू नका!     
डॉ. राहुल मुंगीकर (वनस्पतीतज्ज्ञ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2015 1:48 am

Web Title: novelty of nature
Next Stories
1 डोकॅलिटी
2 नक्राश्रूंची कहाणी
3 डोकॅलिटी
Just Now!
X