तुम्ही बरेचदा ‘बघा हं’ अशीही सुरुवात करत नाही आणि ‘ऐका’ अशीही नाही, मग तुमचा भर असतो काही करण्यावर. तुमची भुणभुण म्हणजे हे करू, ते करू वगरेसारखी. सतत शरीराची हालचाल करत राहणे हा तुमचा स्थायीभाव. पुस्तक वाचतानाही तुम्ही पुढे-मागे झुकाल, रांगेत उभे असाल तर हातापायांची चाळवाचाळव कराल, उगाचच पुढे-मागे व्हाल. स्तब्धता तुम्हाला काहीशी अस वाटू शकते.

सिरियलचं टायटल साँग किंवा एखादं गाणं सुरू झालं की तुम्ही नकळत हाता किंवा पायाने ठेका धराल किंवा तुमचे पाय डान्ससाठी थिरकतील. किंवा त्यासारखा अभिनय करायचा मोह तुम्हाला होईल. वर्गापेक्षा मदान, प्रयोगशाळा, जिम यामध्ये तुम्हाला जास्त रमायला होतं का? हे करून पाहू, ते करून पाहू अशा नवनव्या कल्पना तुम्हाला सुचतात का? फोनवर बोलत असताना हातवारे न करता बोलणं तुम्हाला अशक्य होतं का, अगदी कुणी रागावलं तरीही! एखादा पत्ता डोळ्यासमोर आणण्यापेक्षा किंवा त्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण स्वत:च जाऊन तो का पाहू नये, असा सरळसोट विचार करून बेधडक तुम्ही तो शोधायला निघता का? नव्याने ओळख झालेली एखादी व्यक्ती चेहऱ्याने अगर नावाने लक्षात राहण्यापेक्षा ती काय बोलली होती हे जास्त लक्षात राहतं का पाहा बरं! आणि असंही पाहा बरं का, एखाद्या रांगेत तुम्ही उभे असाल तर शांत उभे न राहता आजूबाजूच्या वस्तूंना हात तरी लावता, अगर पुढे मागे अशी चुळबुळ तरी करता. प्रश्नाचं उत्तर लिहिताना विचार करताना पेनशी, पॅडशी सतत चाळा करणं तुमच्यासाठी खूप स्वाभाविक आहे का? एखादी गोष्ट एकदा करून योग्य प्रकारे साध्य झाली नाही तर परत ती वेगळ्या प्रकारे करून पाहण्यासाठी तुम्ही विचार करता किंवा तसा प्रयत्न करता, असं जास्त वेळा घडतं का हे पडताळा तर..

joshimeghana.23@gmail.com