आपल्या नभांगणात नुसते तारेच नाहीत,  तर तेजोमेघ दीíघका यांच्याखेरीज थोडय़ा जागेत खच्चून भरलेल्या ताऱ्यांच्या वसाहती आहेत. या तारकांच्या गटाला एकत्रितपणे ‘गुच्छ’ असा शब्द वापरला जातो. जसा फुलांचा गुच्छ तसा तारकांचा गुच्छ. तारकांचे गुच्छ दोन प्रकारचे असतात. खुले तारकागुच्छ (Open Clusters) आणि बंदिस्त तारकागुच्छ (Globular Clusters) दक्षिण आकाशातील अतीव सुंदर अशा तारकागुच्छांचा परिचय आपण करून घेणार आहोत. या बंदिस्त तारकागुच्छाचे खगोलशास्त्रीय नाव आहे ‘ओमेगा सेंटॉरी’ यातील सेंटॉरी हा शब्द सेंटॉरस वरून आला आहे. हा तारकागुच्छ सेंटॉरस म्हणजे नरतुरंग तारकापुंजात आहे हे या शब्दावरून सुचित होते. एप्रिल-मे महिन्यात या तारकागुच्छाचे बराच वेळ निरीक्षण करता येते. एप्रिल महिन्यात अखेरीस रात्री ९ ते पहाटे ४ पर्यंत हा तारकागुच्छ आकाशात नीट पाहता येईल. रात्री साडेअकरा ते १२ च्या सुमारास थेट दक्षिणेकडे मध्यमंडलाजवळ तो पाहता येईल. क्षितिजावर त्याची उंची जास्तीत जास्त २३ ते २४ अंश असते. तो मध्यमंडली नसेल तर त्याची उंची याहीपेक्षा कमी असते. निरभ्र रात्री नुसत्या डोळ्यांनाही हा गवसतो. मात्र योग्य वेळी योग्य ठिकाणी तो न्याहाळायला हवा. हा गुच्छ असला तरी याचे मोठेपण ऐकून तुम्ही थक्कच व्हाल आणि त्याचे निरीक्षण करण्याची इच्छा तुम्हाला खात्रीने होईल. तुमच्याजवळ द्विनेत्री (Binocular) असली तरी पुरेसे आहे. दुर्बणिच (telescope) पाहिजे असे नाही. असेल तर उत्तम. चित्रा म्हणजे (Spica) तारका तुम्हाला ओळखता आली तर तुमचे काम झालेच म्हणून समजा. या तारकेच्या थेट दक्षिणेस सुमारे ३५ ते ३६ अंशावर हा तारकागुच्छ तुम्हाला निश्चित दिसेल.
अक्षरश: लक्षावधी तारकांचे संमेलन इथे भरले आहे. सर्वसाधारणपणे गुच्छात सर्व प्रकारचे तारे असतात. मेन सिक्वेन्स, जायंटस्, सुपर जायंटस्, रूपविकारी असे सर्व प्रकारचे तारे गुच्छाने आपल्या पोटात सामावलेले असतात. एखाद्या जातीबांधवांच्या संमेलनाप्रमाणे हे विशिष्ठ ताऱ्यांचे संमेलन नसते. रूपविकारी ताऱ्यांपकी फफ लायरी या प्रकारचे तारे या गुच्छात प्रामुख्याने आहेत. या तारकागुच्छातील तारकांचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचायला सुमारे १७ हजार वर्षांचा काळ गेला आहे. या गुच्छाच्या केंद्रभागी विस्तार १०० ते १५० प्रकाशवर्षांचा आहे. या तारकागुच्छातील हजारो तारकांची व्यवस्थित माहिती शास्त्रज्ञांजवळ आहे.
या गुच्छाचे सांगोपांग निरीक्षण १६७७ मध्ये हॅले ने केले. हा तारकागुच्छ नुसत्या डोळ्यांनी एखाद्या ताऱ्यासारखा दिसतो. म्हणून बेयरने १६०३ मध्ये जेव्हा तारकांचे नकाशे तयार केले तेव्हा या गुच्छाला ‘ओमेगा’ ग्रीक अक्षर बहाल केले. दुर्बीण पूर्व काळात या गुच्छातील तारकांचे सुटे दर्शन अशक्यच होते. तुम्ही मात्र या तारकागुच्छाचे निरीक्षण करायला विसरू नका. नभांगणाचे वैभव लुटायचे तर निरीक्षण करायला हवेच, नाही का ?