लहानपणी मला गोष्टी सांगायला माझ्या घरी खूप माणसं होती. आजी खूप छान गोष्टी सांगायची. रामायण, महाभारत, इसापनीती, संतकाव्य किंवा अगदी तिच्या लहानपणीच्या घटनादेखील ती इतक्या रंगवून सांगायची की त्या ऐकण्यातही मी गुंगून जायचो. दिनूचं बिल, आईचा कान चावणाऱ्या चोराची गोष्ट या बोधकथा आई मला सांगायची. बाबा सांगायचा त्या गोष्टी तर भन्नाट असायच्या. आटपाट नगरापासून सुरू झालेली गोष्ट, राजा शिकारीला जायच्या निमित्ताने वाघ-सिंहांवर जात सर्कशीच्या तंबूत शिरायची आणि त्या दिवशी वृत्तपत्रात वाचलेल्या इंदिरा गांधी किंवा तसल्याच कसल्या अगम्य बातमीवर येता येता बाबाच गाढ झोपी जायचा!
आजीकडून छान गोष्टी फक्त शाळेच्या मोठय़ा सुट्टय़ांमध्येच ऐकायला मिळायच्या आणि आई-बाबांच्या गोष्टींचा मला हळूहळू कंटाळा यायला लागला होता. तेव्हाच आई-बाबांनी माझ्या दहाव्या वाढदिवशी दहा पुस्तकांचा संच मला भेट म्हणून दिला. छोटेखानी अशा या दहा पुस्तकांना रंगीत चित्रांची मुखपृष्ठ होती. त्या सुंदर चित्रांनीच मला भुरळ घातली आणि मी या पुस्तकांच्या प्रेमात पडलो. एकेक पुस्तक उघडून चाळायला लागलो तर प्रत्येक पुस्तकात पाच-सहा गोष्टी होत्या. मोठी टपोरी अक्षरं. प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीच्या पानावर गोष्टीचं नाव नक्षीदार पट्टीने सजवलेलं, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा प्रसंग चितारणारं एक मोहक चित्र अशी खूपच सुबक, सुरेख अशी ही दहाही पुस्तकं होती. आत सारा मामला काळ्या शाईतच असला तरी मला ही पुस्तकं विलक्षण आवडली होती.
एकामागून एक दिवस जात होते आणि भान हारपून मी ही पुस्तकं वाचत होतो. गोष्टीमागून गोष्ट वाचत होतो आणि जसजसा वाचत गेलो तसतसा या गोड गोष्टींच्या जगात बुडून जात होतो. अगदी मला आवडतील अशा गोष्टी यात होत्या, राजा-राणीच्या. देखणा राजकुमार आणि त्याच्या प्रेमळ आईवडिलांच्या. आवडती आणि नावडतीच्या. सावत्र आईच्या. कुणा पक्षी-प्राण्यांत जीव असणाऱ्या राक्षसांच्या. शापित राजकुमारींच्या. प्रेमाच्या. मैत्रीच्या. एक ना अनेक, असंख्य विषय आणि निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टीच गोष्टी होत्या. सगळ्यात कमाल म्हणजे, या गोष्टी वाचताना माझ्या स्वप्नविश्वात त्यातल्या व्यक्तिरेखा आणि पात्रांची कल्पना मला करता येत होती. या गोष्टींनी माझ्यावर जादू केली होती.
हे साने गुरुजी, या पुस्तकांचे लेखक मला फारच आवडले. अगदी माझ्या आजी सांगायची तशा रंगवून, दंग करून टाकणाऱ्या गोष्टी त्यांनी माझ्या हाती दिल्या होत्या. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘या गोष्टी खेडय़ापाडय़ांतून पसरलेल्या आहेत. जगातील हे लोककथांचे वाङ्मय तोंडातोंडी प्राचीन काळी पसरे. दळणवळणासोबत हे वाङ्मयही प्रवास करी.’’ पुढे त्यांनी या पुस्तकातील गोष्टींचं रहस्य सांगितलं आहे, ‘‘बंगाली लोककथांचे इंग्रजी पुस्तक पुष्कळ वर्षांपूर्वी मी वाचले होते. त्यातील गोष्टी शेकडो मुलांना फार आवडत. त्या गोष्टी मी जशा सांगे तशा लिहून काढल्या आहेत.’’
खूप वर्षांनी पुढे साने गुरुजींचं चरित्र, त्यांनी लिहिलेलं इतर साहित्य, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचार्य अत्रेंनी बनवलेला श्यामची आई पाहिला आणि या गोष्टीवेल्हाळ माणसाशी माझी दोस्ती झाली.
त्या लहानग्या वयात माझ्या कल्पनाशक्तीला अचाट, अफाट, स्वप्नमयी दुनियेत नेण्याचं काम या गोष्टींनी केलं. त्या स्वप्नरंजनातून हळूच संस्कारांचं बीजारोपण झालं. अगदी नकळत, खूप छान करमणूक करतानाच या गोष्टींनी मला खूप काही शिकवलं. सगळ्यात गंमत म्हणजे, या गोष्टी वाचलेल्या असल्याने माझ्याकडच्या गोष्टींचा साठा भरपूरच वाढला. साहजिकच, शाळेत मोकळ्या तासाला आमचे शिक्षक वर्गातल्या इतर मुलांना गोष्टी सांगायचं काम मला द्यायचे. माझ्या आवडीच्या या गोष्टी सांगताना मी माझ्या वर्गमित्रांना गुंगवून ठेवायचो. या गोष्टी सांगताना नकळत माझ्याकडल्या दोन कल्पना त्यात घालू लागलो. गोष्ट अधिक खुलवू लागलो. याच गोष्टींपासून सुरुवात झाली. आभाळातली चंद्रकोर माझ्याकडे पाहून हसू लागली. कुणा राजकुमाराला त्याच्या आवडत्या पोपटाच्या मनातलं कळावं तसं मला घरी येणाऱ्या चिऊताईच्या चिवचिवाटाची भाषा कळायला लागली. यातूनच माझ्यातला सर्जनशील, गोष्टीवेल्हाळ ‘मी’ मला गवसलो.
आजच्या संगणक युगातल्या तुम्हा मुलांना या गोष्टी का आवडाव्या? त्या तुम्हाला आवडतील का? माझ्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलं होतं. तेव्हा मी या गोष्टी माझ्या छोटय़ा दोस्तांना सांगितल्या. त्यांना या गोष्टी माझ्याइतक्याच आवडल्या. त्यांनी प्रश्न विचारले, पण त्यांनाही या गोष्टीतलं स्वप्नरंजन, अद्भूत, जादू, आणि बोध हे सारं भावलं. ‘काळी बायकोच नेहमी का नावडती असते रे दादा?’ हा सवाल एका चिमण्या मैत्रिणीकडून आला, मात्र आवडती-नावडतीच्या गोष्टीत ती छान रमली. तसाच ‘छे, असा काही सर्पमणी वगैरे काही नसतो हं दादा,’ असं मला सांगणारा चिंटुकला मित्रदेखील त्याच सर्पमण्याच्या जादूने नटलेली, मात्र दोन घनिष्ठ मित्रांची अशी गोष्ट ऐकताना मोठय़ा डोळ्यांनी माझ्याकडे पहात होता. गोष्टी ऐकताना माझ्या या चिमुकल्या दोस्तांच्या डोळ्यांत मी लहानपणी पाहिलेली अद्भूत, स्वप्नवत दुनिया उभी राहताना दिसत होती. अभ्यास, परीक्षा, शाळा, गृहपाठ, पाठांतर अशा सगळ्या गोष्टी मागे टाकून हे माझे मित्र आपल्या कल्पनेत काही घडवत होते. स्वप्न पहात होते. तेव्हाच ठरवलं, साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. माझी खात्री आहे, तुम्हालाही या गोष्टी खूप आवडतील.
हे पुस्तक कुणासाठी? १० वर्षांपुढल्या छोटय़ांसाठी, आणि त्यापेक्षा चिमुकल्यांच्या आईबाबांसाठी.
पुस्तक : साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी, दहा पुस्तकांचा संच.
लेखक : साने गुरुजी
ideas@ascharya.co.in

प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे