|| श्रीपाद

आजची पाककृती मला चक्क कार्टून पाहताना सुचली बच्चेहो.. आहात कुठे? पॉपाय पाहत होतो कितीतरी दिवसांनी आणि एकदम टय़ूब पेटली. अहं, पुढे वाचायचं थांबू नका बरं. पाककृती पालकचीच आहे; पण मला खात्री आहे की तुम्हाला न फसवता, पालक न दडवतादेखील तुम्ही पालक अगदी आवडीने खाल.

आता या पाककृतीमागची गंमत सांगतो तुम्हाला. मी शाळेत असताना माझ्या वर्गात कितीतरी मुलं-मुलींना पालक आवडत नसे. डब्यामध्ये कोणत्याही प्रकारे पालक आला म्हणजे ही मुलं नाकं मुरडत. आणि कधी कधी तर अन्न वायादेखील घालवत. पण त्यांच्याबाबतीत चमत्कारिक गोष्ट म्हणजे एखाद्या रेस्तरॉंमध्ये गेल्यावर मात्र ही मुलं अगदी आवडीने पालक पनीर, लसूणी पालक खाल्ल्याचं वर्गात येऊन अगदी आवर्जून सांगत. आणि रेस्तराँमध्ये मिळणारा पालक पनीर घरी करून डब्यामध्ये आणता येत नसल्याची त्यांना मोठी खंत वाटे. मला भारीच नवल वाटे या मुलांचं.

मला पालक खूप आवडतो. मात्र त्याचा विशिष्ट असा उग्र, कशाय स्वाद मात्र आवडत नाही. रेस्तराँमधल्या पाककृतीमध्ये पालक उकडून घेतात. त्यामुळे हा स्वाद निघून जातो. मात्र त्यासोबत अनेक जीवनसत्त्वेदेखील नष्ट होतात. तेव्हा माझी पाककृती तुम्हाला पालक पनीरची मजा देईलच; तीदेखील अगदी नव्या सुटसुटीत स्वरूपात. शिवाय डब्यातही हा पालक पनीर नेता येईल आणि चवीने खाता येईल, ते वेगळंच!

चार जणांकरिता साहित्य : एक मोठी जुडी निवडलेला पालक. कोवळे देठ टाकू नका बरं! साधारण १००-२०० ग्रॅम पनीर, २-३ लसणाच्या कुडय़ा. अर्धा चमचा लाल तिखट, छोटा १/४ चमचा प्रत्येकी हिंग, हळद, धणे-जिरे पूड आणि गरम मसाला पूड, ३-४ मोठे चमचे किंवा गरजेनुसार मदा, चवीनुसार मीठ, गरजेपुरतं तेल किंवा लोणी. सजावटीकरिता लिंबाची फोड आणि पुदिन्याची पानं.

उपकरणं : भाज्या चिरण्याकरिता सुरी, पाट किंवा विळी वा फूड प्रोसेसर. मिश्रण तयार करण्याकरिता साजेशा आकाराचं भांडं. गॅस किंवा इंडक्शन शेगडी. जाड बुडाचं नॉनस्टिक पॅन किंवा जाड बुडाचा बीडाचा तवा. त्यावर बसेल असं झाकण. उलथणं.

बाजारातून आणलेल्या पालकाची जुडी सोडा. ती एखाद्या मोठय़ा कागदावर पसरून घ्या म्हणजे त्यातील कचरा जमिनीवर सांडून घरभर होणार नाही. आता एकेक-दोन दोन पानांना हातात घेऊन मुळांकडचा भाग बोटांनी तोडा. निबर देठ तोडून मऊ, रसरशीत देठ ठेवून द्या. आता ही निवडलेली पानं वेगळी ठेवा. शक्यतो एका मोठय़ा पातेल्यामध्ये ठेवलीत तर मागाहून त्यातच स्वच्छ धुता येतील. सगळी जुडी निवडून झाली म्हणजे ही पानं पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन, थोडी कोरडी करून घ्या. पानांमधलं पाणी पूर्ण निथळलं पाहिजे. पंख्याखाली ठेवा किंवा मोठय़ा टॉवेलने टिपून घ्या.

पालकाची पानं आणि लसणीच्या कुडय़ा बारीक चिरून घ्या किंवा सरळ फूड प्रोसेसरमधून दोन-चार वेळा फिरवून बारीक तुकडे करून घ्या. फूड प्रोसेसर, सुरी वगरे वापरताना घरच्या मोठय़ांच्या देखरेखीखाली करा, नाही तर विसरून जाल. आता मिश्रण बनवायच्या पातेल्यामध्ये पनीर घेऊन ते हातानेच मोडा, त्याचे बारीक कणांसारखे तुकडे होतील. फ्रिजमधून काढून लगेचच गारेगार वापरत असाल तर चक्क किसून घ्या. किंवा काही वेळाने ते साधारण तापमानाला येऊन मऊ झालं म्हणजे हातानेच त्याचे तुकडे करा. पनीरमध्ये बारीक चिरलेला पालक आणि लसणीचं मिश्रण घाला. त्यावर मीठ, तिखट आणि मसाला घाला आणि हातानेच छान एकजीव होईतोवर मिसळून घ्या. मिश्रण मिसळत असतानाच मिठामुळे त्याला पाणी सुटेल. आता या मिश्रणामध्ये हळूहळू अंदाज घेत घेत मदा मिसळा. पहिला चमचा टाका, मिश्रण मिसळून एकजीव करा. दुसरा चमचा घाला, मिश्रण एकजीव करा. मिश्रण लाडूच्या मिश्रणाइतकं किंवा त्याच्या टिक्क्या पाडता येतील एवढंच घट्ट करा, फार घट्ट करू नका.

आता शेगडीपाशी काम करायचं आहे तेव्हा घरातल्या वयस्कर सदस्याला मदतीला घ्या. बीडाचा तवा मोठय़ा आचेवर चांगला तापवून त्यावर हलकासा लोण्याचा किंवा तेलाचा थर द्या. फार तेलकट करू नकाच. आच मध्यम किंवा मंद करा. एका हाताने टिक्क्या तयार करून त्या तव्यावर मांडत जा. सर्वप्रथम बाहेरच्या बाजूस लावून घ्या आणि मग मधोमध असलेली टिक्की ठेवा किंवा सरळ चारच टिक्क्या ठेवा. आता सगळ्या टिक्क्या मांडून झाल्या म्हणजे त्यावर झाकण ठेवून एका बाजून छान खरपूस भाजेतोवर वाट पाहा. साधारण २-५ मिनिटं लागतील. सारखं झाकण उघडून पाहू नका, मिश्रणातला मदा वाफेवरच शिजणार हे लक्षात घ्या. सारखं झाकण काढून पाहात राहिलात तर मदा शिजणार नाही, आपलं पालक-पनीर पिठूळ लागेल. खालच्या बाजूने उलथणं लावलं आणि ते सहज टिक्कीखाली सरकलं तर समजा, छान खरपूस भाजली गेली आहे टिक्की. ती हलकेच पलटून खरपूस भाजायला ठेवा. सगळ्या टिक्क्या पलटल्या म्हणजे पुन्हा झाकण ठेवून दोन-तीन मिनिटं खरपूस भाजू द्या. टिक्की भाजण्याकरिता लागणारा वेळ तुम्हालाच अंदाजाने ठरवावा लागेल बरं का! कारण टिक्क्या कमी जाड असतील तर पटकन् शिजतील आणि अधिक जाड असतील तर थोडय़ा वेळाने शिजतील; तेव्हा अंदाज घेत घेतच भाजा. छान खमंग, खरपूस वास येईलच तुम्हाला.

दोन्ही बाजूंनी खरपूस भाजली म्हणजे टिक्की एका ताटामध्ये काढून घ्या आणि त्यावर पुदिन्याची छोटी छोटी पानं सजवा. खायला देताना त्यावर लिंबाच्या रसाचे काही थेंब पिळा म्हणजे छान खुसखुशीत आणि आतून मऊ मुलायम अशी पालक-पनीरची अस्सल चव जिभेवर रेंगाळेल ते तुमचं तुम्हीच चाखून पाहा. असा सॉल्लिड पालक-पनीर डब्यात करून नेलात तर तुमच्या वर्गातले सवंगडीच का, अगदी शिक्षकही तुमच्या पाककलेवर आणि या धम्माल आश्चर्यचकित करणाऱ्या पदार्थावर फिदा होतील हा माझा शब्द! आत्ता पावसाळ्यामध्ये पालक मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे, तेव्हा ही अनोखी पाककृती करून आणि चाखून पाहा. तुम्हीच मला पत्रं लिहून कळवाल की पॉपायसारखा तुम्हाला, तुमच्या घरच्यांनाही पालक आवडायला लागला.

contact@ascharya.co.in