रुपाली ठोंबरे

‘‘समीक्षा, आता पुरे झाले बरे का या एका कोडय़ापाशी घुटमळत राहून? मी आता थकलो, आणि खरे तर कंटाळलो. काय कठीण कोडं आहे हे? आपण कित्ती गणिते मांडून पाहिली, पण उत्तर काही सापडत नाही. सोड, जाऊ दे. यापुढे आणखी प्रयत्न नाही करू शकत याच्यासाठी. चल, आपण आता दुसऱ्या कोडय़ाकडे वळू या.’’असे म्हणत प्रथम त्या छोटय़ाशा पुस्तकाचे पुढचे पान उलटण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याच्याच वयाची समीक्षा त्याला पुढच्या पानावर जाण्यापासून रोखत होती.

‘‘असे काय करतोस, प्रथम. फक्त एकदा शेवटचे करून पाहू. जर नाही जमले तर पुढच्या कोडय़ावर उडी घेऊ. पण माझ्या डोक्यात एक नवीन कल्पना सुचली आहे. त्या पद्धतीने एकदा हेच गणित मांडून पाहू आणि मग बघू या कोडे सुटते का ते!’’

प्रथमने नाइलाजाने समीक्षाच्या प्रस्तावाला होकार दिला आणि मागचे पान पुन्हा समोर आले आणि त्यासोबत ते न सुटणारे कोडेसुद्धा. समीक्षाने ठरल्याप्रमाणे तिच्या नव्या युक्तीने गणिते कागदावर मांडली. थोडा प्रयत्न केला आणि तिचासुद्धा हिरमोड झाला. आता तिने स्वत:च पुढचे पान उघडले. प्रथमसुद्धा खूश झाला.

‘‘बघ, हे कठीण आहे की नाही? मी म्हणालो होतो तुला आधीच. चल, आता हे नवे फुग्याफुग्यांचे कोडे सोडवू या. बघून जरा सोपे वाटते आहे ना!’’

दोघांनी अगदी उत्साहाने सुरुवात केली, पण जसजशी मांडलेली सारी गणिते, सोडवण्याच्या पद्धती आणि त्यामुळे मिळणारी उत्तरे चुकू लागली, तसा दोघांचाही आत्मविश्वास ढळू लागला. आणि यावेळी अगदी सहज पुढचे पान उलटले गेले. समीक्षानेसुद्धा अजिबात विरोध दर्शवला नाही. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि लगेच पुढच्या पानावर उडी टाकली.

शेजारी आपला अभ्यास करत बसलेल्या ताईने हे पाहिले आणि तिने लगेच दोघा भावंडांची शाळा घ्यायचे ठरवले. तिने तिची पुस्तके मिटून बाजूला ठेवली आणि ती जराशी सरकून दोघांपाशी बसली. ताईसुद्धा उत्सुकता दाखवत मांडलेली गणिते पाहू लागली. ‘‘बघू बघू, तुम्हा दोघांचे मघापासून काय सुरू आहे ते. अरे वा! पुस्तकातल्या आठव्या कोडय़ापर्यंत मजल मारली तर! खूप छान! सात कोडी बिनचूक सोडवून आठव्यापर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही दोघे फारच हुशार.’’

ताईचा आपल्यावरचा विश्वास आणि आपण घेतलेला शॉर्टकट समीक्षा आणि प्रथम या दोघांच्याही लक्षात आला आणि दोघांचीही मान शरमेने खाली झुकली.

‘‘अरे बाळांनो, काय झाले रे?’’

‘‘अगं ताई, आम्ही तरी काय करणार? हे तू दिलेले पुस्तक भारी कठीण आहे. कितीदा प्रयत्न केले तरी कोडी सुटतच नाहीत. मग कंटाळा येतो आणि पुढे जावेसे वाटत नाही.’’

प्रथमने लगेच तक्रार केली आणि ताईच्या समोर दोघांनी मागची पाने उलटवून दाखवली. त्यात अनेक कोडी अशी अर्ध्यावर सोडलेली होती. ते पाहून ताई गालातच हसली. तिच्या गालावर एक छान खळी पडली हे त्या क्षणीही सुखावणारे वाटत होते. ताईने दोघांना जवळ घेतले आणि ती समजावू लागली.

‘‘हे पाहा, हे पुस्तक मी काही फक्त आजसाठीच नाही आणले आहे. ते तुमच्या ज्ञानासाठीची शिदोरी आहे. म्हणून १-२ दिवसात त्यातली सर्व कोडी सोडवण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका. एका वेळी एकच कोडे घ्या आणि ते सुटेपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही, समजलं?’’

‘‘ अगं, पण किती प्रयत्न केले तरी ही गणिते सुटतच नाहीत.’’ समीक्षा त्रासावलेल्या सुरात म्हणाली.

‘‘ बरं. चला, तुमचे हे मागचेच उदाहरण घेऊ.’’

ताई पुस्तक हातात घेत पुढे बोलू लागली.

‘‘अरे वा, किती छान कोडे आहे हे! खूप सोप्पे तर नाहीच, पण अशक्य तर अजिबातच नाही.’’

‘‘ताई, हे कोडे अशक्यच आहे. बघ पाचदा तरी आम्ही हे वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून पाहिले तरी जमले नाही.’’

प्रथमच्या या बोलण्यावर ताईने लगेच अगदी अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘‘काय? फक्त पाच वेळा? या गणिताच्या उत्तरापाशी जाण्याचे जवळपण दोन बरोबर आणि निदान १०-१२ तरी चुकीचे मार्ग आहेत. तुम्ही या १८ मार्गापैकी फक्त पाच मार्गावरून चाललात आणि इतक्यात हरलासुद्धा. का?’’

‘‘सगळे मार्ग चुकतात, इतके करूनही काही हाती लागत नाही. हे बघून कंटाळा आला. आणि इतका वेळ जातो आहे असे वाटू लागले म्हणून आम्ही पुढे गेलो लगेच.’’

समीक्षा हे पटकन बोलून गेली आणि ताईने नेमके हेच पकडले.

‘‘अगं समीक्षा, हाती काहीच लागलं नाही असं कसं बोलू शकतेस तू? आणि वरून त्यामुळे निराश होऊन पुढचे पाऊलसुद्धा उचलले? त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचे पाच चुकीचे मार्ग तर शोधले ना तुम्ही. म्हणजे पुढच्या वेळी असाच प्रश्न आला तर उत्तरासाठी त्या पाच मार्गावरून चालायचे नाही ही शिकवण मिळाली की नाही? शोधत राहायचं, आपण प्रयत्न करत राहायचं.. शोधलं की सापडतंच.’’

हे ऐकून समीक्षाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला आणि तिची मान आता ताईच्या प्रत्येक बोलण्याकडे होकारार्थी डुलू लागली. पण प्रथमला अजूनही हे सर्व पटत नव्हते. ते पाहून ताईला एक नवी युक्ती सुचली.

प्रथमकडे पाहत ताईने त्याला विचारले, ‘‘प्रथम, लहानपणी तुला आठवते का, एक कोडे असायचे. या पिटुकल्या सशाला पाण्याचे तळे दाखवा किंवा त्या गर्दीत हरवलेल्या मुलीला तिचे घर दाखवा. आणि त्या कोडय़ात खूप सारे रस्ते, अगदी रस्त्यांचे जाळेच असायचे नाही का?’’

‘‘हो हो, आठवते ना! मला फार फार आवडायचे ते कोडे. एकच रस्ता असायचा. तो शोधण्यासाठी कितीदा काढावे आणि खोडावे लागायचे. माझा खोडरबर एकदा अशा कोडय़ाच्या पुस्तकामुळे संपूनच गेला होता आणि आई रागावली होती.’’

प्रथमचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसायलाच लागले, पण ताईने पुन्हा सर्वाना मूळ मुद्दय़ावर आणले.

‘‘अरे, पण दोन तीनदा प्रयत्न करून सोडून द्यायचे ना! किती कंटाळा येत असेल तुला.’’

ताईचे हे बोलणे ऐकले आणि प्रथमला त्याची चूक कळली. तो लगेच म्हणाला, ‘‘हो ताई, तू अगदी बरोबर बोलतेस. ही कोडी सोडवतानादेखील मी तोच धीर आणि आणि जिद्द ठेवली तर नक्कीच उत्तर मिळेल मला. आता मी उत्तर मिळेपर्यंत प्रयत्न करत राहीन म्हणजे पुढच्या कोडय़ांसाठी नवा हुरूप येईल.’’

‘‘हो ना, आता या कोडय़ांतून खूप काही शिकायला मिळेल.. उत्तर शोधण्यासाठी काय करायला हवे ते आणि काय नको करायला हवे तेसुद्धा. हो ना गं ताई?’’

लाडात आलेल्या समीक्षाच्या गालाला गोंजारत ताई छान हसली. यावेळची तिची गालावरची खळी अधिक गोड दिसत होती. आणि मग ती तासाभरापूर्वी मिटलेल्या तिच्या पुस्तकांत डोकावून अभ्यासाला लागली.  दोघे बहीणभाऊ पुन्हा पहिल्या पानावरच्या न सुटलेल्या कोडय़ासाठी गणिते मांडण्यात मग्न झाली.

rupali.d21@gmail.com