आज आपण अशी जीवचित्रे बघणार आहोत, जी अर्धवट असणारेत! म्हणजे ही चित्रे नुसती बघायची नसून, सोबत गाणं-वाद्यसंगीतासह ऐकली, पाहिली जातात. (असाच चित्रप्रकार आपण चित्रकथीत व चामडी शॅडो पपेट्स, पट्टचित्रमध्येसुद्धा पाहिला आहे. आठवतोय ना!) भारतात पारंपरिक कला या अशा एकमेकांत गुंफलेल्या असतात आणि म्हणूनच त्या आपल्याला आवडतात. आजही नुसत्या चित्रप्रदर्शनापेक्षा आपल्याला सिनेमा किंवा कार्टूनमध्ये जास्त मजा येते. कारण त्यात ‘गाणं + चित्रफीत’ असं एकत्र येतं.
ही आहेत फड चित्रं!
राजस्थानातील शाहापुरा (भिलवाडा) हे फड चित्रकलेचे प्रमुख ठिकाण. तथापि भारतात सर्वच ठिकाणी फड चित्रकलेच्या जवळपास जाणारे अनेक कलाप्रकार विकसित झाले.
विषय अर्थात देव-देवता यांच्या जन्म, मृत्यू, युद्धकथा. आधुनिक फड चित्रांमध्ये कृष्णकथा, रामायण वगैरे आढळते!
या चित्रातील प्राणी पाहिले की कार्टूनमधील प्राणी पाहतोय असंच वाटतं. तेही भारतीय स्टाईल कार्टून! म्हणजे ‘छोटा भीम’ वगैरेत दिसतात तशी साधी 2ऊ कार्टून्स!
कार्टून वाटण्याचे मुख्य कारण हे की, या प्राण्यांचे डोळे, त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, चटकदार रंग, त्यांचे आकार आणि त्यांची उभी राहण्याची पद्धत! म्हणजे चित्रात समोरासमोर उभे असणारे हत्ती व घोडे हे समान आकाराचे कसे, असा प्रश्न आपल्याला पडतो.
या चित्रांत डोळे माणसांच्या डोळ्यासारखे दाखवले आहेत. चित्रातील घोडे, उंट तर असे उभे आहेत, की जणू शर्यत जिंकून फोटोसाठी पोझ दिलेय! पण त्यासोबतच चित्रकारांनी प्राण्यांच्या शरीररचनेचा नीट अभ्यास केलाय, हेही जाणवतं. हा अभ्यास त्यांनी किती केलाय, हे जाणून घेण्यासाठी अशाच पद्धतीने एका प्राण्याचे चित्र काढून पाहता येईल. खांबातून निघालेला नरसिंह आणि मांडीवर हरण एकाच बाजूला बघताहेत.. कारण समोरून प्राण्यांचा चेहरा काढणे पुन्हा कठीण काम! असो.
पूर्वी फड चित्रांचे सादरीकरण हे पाच मीटर लांब आणि दीड-दोन फूट रुंद अशा गुंडाळलेल्या सुती कापडी पटावर व्हायचे. आता हे कापडी आकार छोटे झालेत. आणि ते विक्रीसाठीदेखील बरं पडतं.
फड चित्रे ही काही विशिष्ट जातीद्वारेच दाखवली जायची. अमिताभ, देवनारायण, पाबूजी, रामदेव, रामदल, कृष्णदल, भैसासुर ही फड चित्रं दाखविणाऱ्या प्रसिद्ध ग्रुपची नावे आहेत. पार्वती जोशी या फड सादरीकरण करणाऱ्या पहिल्या महिला होत. प्रत्येक ठिकाणची कला ही त्या- त्या समाजाचे, मानसिकतेचे प्रतिबिंबच असते.
श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 2:35 am