मल्हारच्या वर्गात बाईंनी वेशभूषा स्पर्धेची सूचना सांगितली तेव्हा नेहमीप्रमाणे मल्हारची शेजारच्या बाकावरच्या जयबरोबर कुजबूज चालली होती. शेजारची अनन्या त्याला गप्प करत होती तरीही त्यानं उलट तिलाच गप्प केलं. त्या गडबडीत त्यानं सूचना नीट लक्ष देऊन ऐकलीच नाही. घरी येऊन आईला त्यानं शुक्रवारी स्पर्धा असल्याचं आणि त्याला त्यात भाग घ्यायचाय एवढं मात्र आठवणीनं सांगितलं

‘आई.. स्पर्धेत मी कोण होऊ  गं?.. शिवाजी महाराज होऊ  की स्वामी विवेकानंद होऊ? की बाबा रामदेव?’ त्या प्रत्येकाची विशिष्ट पोझ घेऊन मल्हार आईसमोर उभा राहून विचारू लागला.

‘अरे, तू ठरव नक्की काय बनायचं ते, मग आपण तशी तयारी करू.’ -आई

‘नको आई.. यावेळी ना मी कुणी माणूस वगैरे नाही बनणार.. म्हणजे असे स्वामी किंवा राजा वगैरे नाही होणार.’ मल्हारने फर्मान सोडलं.

‘मग रे?’ आईनं गोंधळून विचारलं.

‘अगं, गेल्या वेळी ना बाजूच्या वर्गातली वीरजा मोबाईल झाली होती, तसंच मीपण काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनलो तर चालेल?’ – मल्हार.

‘अरे, तुला आधीच म्हटलं ना, तू भाग घेणारेस तेव्हा तू काय ते नक्की ठरव.’ – आई

‘चालेल, मग मी लॅपटॉप झालो तर?.. नाही.. नाही.. ठरलं, मी लॅपटॉपच होणार. आई तू मला मदत करशील ना?’ मल्हारची आईला विनवणी. आईने हसून मान डोलावली.

दुसऱ्या दिवसापासून आईच्या मदतीनं मल्हारचे लॅपटॉप बनवण्याचे उद्योग सुरू झाले. पुठ्ठा कापून उघडलेल्या लॅपटॉपचे चित्र त्यावर की-बोर्डवरची अक्षरे, आकडे वगैरे बरोब्बर लिहिण्याचं काम त्यानं मन लावून केलं. अखेर त्या तयार झालेल्या लॅपटॉपला आईनं मागच्या बाजूनं छानशी सॅटीनची रिबन बांधली आणि मल्हारनं तो गळ्यात अडकवून स्वत:ला आरशात बघितलं. आणि तो जामच खूश झाला. रात्रभर स्वप्नात त्याला लॅपटॉपच दिसत होता. शुक्रवारच्या सकाळी आईला मल्हारला उठवायची गरजच पडली नाही, कारण तो आपल्याआपणच लवकर उठून बसला होता, कारण वेषभूषा स्पर्धेसाठी तयारी करायची होती ना.. एरवी  त्यानं लवकर आटपावं म्हणून आईला सारखं त्याच्या मागे लागावं लागायचं, पण आजचा त्याचा उत्साह बघून तिला लेकाचं अगदी कौतुक वाटलं. झटपट आटपून गळ्यात तो लॅपटॉप अडकवून त्यानं पुन्हा एकदा आरशात स्वत:ची छबी निरखून पाहिली. सगळं ठीकठाक आहे हे बघून लॅपटॉप सांभाळून जायचे म्हणून बाबाच्या बाईकवरून तो शाळेत पोचला. बाबाला टाटा करून तो गेटमधून आत जाताना मोठय़ा वर्गातील १-२ मुलं त्याच्याकडे बघून काहीतरी आपसात बोलल्याचं त्यानं बघितलं. आणखीसुद्धा शेजारच्या वर्गातली त्याला नेहमी शिष्ठ वाटणारी वीरजा त्याच्याकडे टक लावून बघतेय असं वाटलं.

‘सगळ्यांना माझा लॅपटॉप जाम आवडलेला दिसतोय. बरं झालं मी लॅपटॉपच व्हायचं ठरवलं ते.’ मल्हार मनातल्या मनात म्हणाला. तो शाळेच्या जिन्याशी पोचला तोच समोरून नेमक्या त्याच्या प्राची बाईच आल्या आणि ‘अरे, मल्हार, हे काय, तू फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार होऊन आलास का?’

‘ हो.’ मल्हारनं मोठय़ा अभिमानानं मान हलवून होकार दिला.

‘अरे पण.. ती स्पर्धा आजच्या शुक्रवारी नाहीये. पुढच्या शुक्रवारी आहे, त्या दिवशी मी वर्गात सांगितलं तेव्हा तू होतास ना? तेव्हा तुझं लक्ष नव्हतं का? की विसरलास.’ – बाई

इतक्या वेळची मल्हारची ऐट एकदम फुस्स झाली. बाई बोलत असताना समोरून जाणाऱ्या मुलांनी ऐकलंय आणि ती आपली फजिती झालेली ऐकून काही मुलं आपल्याला हसतायत असं वाटून त्याला त्यांचा खूप राग आला. तेव्हढय़ात ‘आपण एक काम करूया, हा तुझा मस्त लॅपटॉप आहे ना, तो मी आमच्या स्टाफरूमच्या कपाटात ठेवते. पुढच्या शुक्रवारी स्पर्धेच्या दिवशी तो तुला घालायला देईन. चालेल ना?’ बाईंनी त्याला टपली मारत विचारलं. मल्हारला नाही म्हणायचं कारणच नव्हतं. आपल्या स्टाफरूममधून तो दप्तर सांभाळत वर्गात पोचला तेव्हा ‘हॅप्पी बर्थडे मल्हार.. हॅप्पी बर्थडे मल्हार’ म्हणत वर्गातल्या त्याच्या सर्व मित्रमैत्रिणींनी त्याला घेराव घातला. प्रत्येकजण त्याला शुभेच्छा द्यायला, त्याच्याशी हात मिळवायचा प्रयत्न करत होता. मल्हार तर पुरता चक्रावूनच गेला.

‘अरे, असे काय?.. आज काही माझा वाढदिवस नाहीये तरी हे सगळे असे काय करतात?’ मल्हार मनातल्या मनात म्हणाला. आणि दुसऱ्या मिनिटाला त्याच्या लक्षात आले की.. लॅपटॉपच्या आत त्याने नेहमीसारखा युनिफॉर्म घातला नव्हता, तर नवीन जीन्स आणि शर्ट घातले होते. त्या नव्या कपडय़ांमुळे सर्वाना त्याचा वाढदिवस आहे असं वाटलं. मल्हारनेही मग ‘थॅंक्यू.. थॅंक्यू’ म्हणायची मस्त अ‍ॅक्टिंग केली. एकीकडे आपली सकाळची फजिती कुणाच्या लक्षात आली नाही यामुळे त्याला खूप बरं वाटलं होतं. शिवाय वरून सगळेजण त्याला बर्थडे बॉय म्हणून विशेष भाव देत होते. एवढय़ात प्राची बाईवर्गात आल्या तेव्हा अनन्या आणि जयने एकदमच ‘बाई,आज ना मल्हारचा बर्थडे आहे.’ त्याबरोबर मल्हार सावध झाला. आता त्या आपली फजिती वर्गात सांगतील की काय अशी भीती त्याला वाटली. पण बाईंनी तसं काहीच दाखवलं नाही. उलट ‘हो का मल्हार? व्वा.. छान.. मग काय?.. आम्ही सगळे आज संध्याकाळी तुझ्याकडे पार्टीला येऊ  का? आणि तुला प्रेझेंट काय बरं द्यायचं?.. लॅपटॉप द्यायचा का खेळण्यातला?’ बाईंनी आपली फजिती कुणाला सांगितली नाही म्हणून त्यानं मनातल्या मनात त्यांना थँक्यू म्हटले. इतक्यात त्याच्याकडे डोळे मिचकावून बाई म्हणाल्या, ‘अरे, मल्हार मी काय म्हणतेय, निदान आता तरी तुझं लक्ष आहे ना माझ्या बोलण्याकडे?’ तेव्हा मात्र मल्हारला खूप लाजल्यासारखं झालं. आपल्या फजितीतूनसुद्धा झालेली मज्जा कधी एकदा आईला सांगतोय, असे वाटून तो शाळा सुटायची वाट बघू लागला.

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com