‘‘ये जुई, बैस. कशी आहेस?’’

‘‘मी बरी आहे, राधिका मावशी. मला आज तुझ्याशी खूप खूप बोलायचंय. तसं ठरवूनच आलेय मी!’’

राधिका मावशी म्हणजे राधिका देशमुख, जुईच्या शाळेमध्ये मुलांची ‘काऊन्सेलर’ होती. मुलांच्या मानसिक-भावनिक समस्या, चिंता, नैराश्य अशा अनेक समस्या समजून घेऊन ती त्यांना मदत करायची. त्या-त्या वयोगटाप्रमाणे मुलांच्या वाढत्या वयांमधील समस्याही त्यांना समजून सांगण्यासाठी ती सेशन्स घ्यायची. ती मुलांसाठी ‘राधिका मावशी’ होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलंही तिच्याशी पटकन मैत्री करायची; मनातलं साठलेलं सगळं मोकळं करून टाकायची. सातवीतली जुई तिच्याकडे सध्या ट्रीटमेंट घेत होती.

‘‘व्हेरी गुड! मी याचीच वाट पाहत होते जुई. पहिल्या सेशनला तू फारसं बोलली नव्हतीस. आज अगदी नि:संकोचपणे बोल. बरं, आई-बाबा आले आहेत बरोबर?’’

‘‘हो! ते बाहेर बसले आहेत,’’ असं म्हणत जुईने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती भरभरून बोलू लागली.

‘‘दर वर्षी गणिताची आंतरशालेय ऑलिम्पियाड असते. मी या वर्षी प्रथमच भाग घेतला होता. माझ्या वर्गातला आदित्य शेटे पाचवीपासूनच या स्पर्धेमध्ये भाग घेत आलाय. गेल्या वर्षी तो या स्पर्धेत सेमी-फायनलपर्यंत पोहोचला होता. मी पहिल्याच वेळेला ऑलिम्पियाडची पहिली लेव्हल क्लीअर करून पुढच्या लेव्हलकरिता सिलेक्ट झाले. पण आदित्य क्लीअर नाही होऊ  शकला. तर तो चिडला माझ्यावर! एरवीसुद्धा एखाद्या विषयामध्ये मला त्याच्यापेक्षा एक-दोन मार्क्‍स जास्त मिळाले तरी तो नेहमी मला टोचून बोलतो. आता यात माझी काय चूक?’’

‘‘हे घरी सांगितलंस?’’

‘‘हो! आई म्हणाली की माझं सिलेक्शन झालं आणि त्याचं नाही म्हणून तो तात्पुरता चिडला असेल. तसाही तो जरा चिडका बिब्बाच आहे. तिला वाटलं, दोन-तीन दिवसांत निवळेल सगळं. पण तो मला आणखीनच त्रास द्यायला लागला. सूड घेतल्यासारखा.’’

‘‘काय केलं त्यानं?’’

‘‘तो मला वर्गातल्या एका मुलाच्या नावाने चिडवतो. यावरून मी पूर्वीही त्याला एक-दोनदा टोकलं होतं. पण त्याने हे मुद्दाम सगळ्या सोसायटीमध्ये पसरवलं. आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो. त्याच्या उद्धट, सगळ्यांवर वर्चस्व राखणाऱ्या स्वभावामुळे बाकी जणही मला सारखे चिडवायला लागले. मला नाही आवडत असं चिडवलेलं कोणावरून. खूप घाण वाटतं! मी आईला सांगितलं. आईला मुलांच्या भांडणामध्ये खरं पडायला आवडत नाही. पण मी रोज रडतच घरी जायचे. नाइलाजाने तिने आदित्यच्या आईकडे हा विषय छेडला. पण झालं उलटंच! आदित्यची आई त्याचा बचाव करत आईशीच मोठमोठय़ाने भांडली. त्यामुळे इतरांचा असा समज झाला की, आमचंच काहीतरी चुकलंय. लोकांसमोर अजून तमाशा होऊ  नये म्हणून मग आई निमूटपणे परत आली.’’

‘‘आणि तेव्हापासून जुईबाई शाळेत जायला, खेळायला जायला टाळाटाळ करू लागल्या. एकदम कोषात गेल्या. आता त्या कुणाशी बोलत नाहीत, हसत नाहीत, सतत एकटय़ा-एकटय़ा राहतात.. बरोबर नं?’’ राधिका मावशी म्हणाली.

‘‘सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघतायत असं मला सारखं वाटतं. आदित्य आसपास जरी दिसला तरी मला धडकी भरते. भीती वाटते. हल्ली बाबा मला रोज शाळेत सोडायला येतात आणि आई आणायला येते.’’ जुई थोडं थांबली आणि समोर ठेवलेल्या ग्लासमधलं घोटभर पाणी प्यायली.

‘‘मी सगळ्यांपासूनच दूर होत गेले. आमचा सोसायटीमध्ये मित्र-मैत्रिणींचा मोठा ग्रुप आहे. अगदी क्रिकेट, फुटबॉलपासून ते लपाछपी, लगोरी, चोर-पोलीसपर्यंत सगळे खेळ आम्ही एकत्र खेळतो. मी पूर्वी खेळण्याच्या वेळेची आतुरतेने वाट बघायचे. पण हल्ली मी शाळासुद्धा कशीबशी उरकते आणि घरी गेल्यावर सगळे खेळताना नुसती खिडकीतून बघत बसते.’’ जुई म्हणाली.

‘‘तुझी आई पहिल्या सेशनमध्ये सांगत होती की, तू नीट खात-पीत नाहीस, शांत झोपत नाहीस. पुस्तकं वाचणंही सोडून दिलंयस!’’

‘‘मला प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रं वाचायला आवडतात म्हणून बाबांनी पाच-सहा पुस्तकंही आणून दिलीयेत.’’

‘‘मग का नाही वाचत? त्यातून तर किती प्रेरणा मिळते प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं उभं राहायचं त्याची!’’

‘‘कसली इच्छाच होत नाही. मला समजतंय, आई-बाबांना माझी खूप काळजी वाटते. ते माझ्याशी याबद्दल सतत बोलत असतात. मला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवण्याचा प्रयत्न करतात. काहीच उपयोग होईना म्हणून ते वर्गशिक्षिका आणि प्रिन्सिपॉल मॅडमशी बोलले. त्यांनीच तुला भेटण्याचा आम्हाला सल्ला दिला.’’

‘‘जुई, मी तुझ्याशी जे बोलतेय, तेच आई-बाबाही तुला सांगत असणार. पण कधी कधी सोनाराने कान टोचलेले बरे असतात.’’ यावर जुई प्रथमच हसली.

‘‘आणि अभ्यास? तुझी ऑलिम्पियाडची पुढची लेव्हल लगेचच असेल नं?’’

‘‘दोन महिन्यांनी. पण माझा आत्मविश्वासच गेल्यासारखा वाटतो. रोजचा अभ्यासही नीट होत नाही माझा!’’

‘‘जुई, तुला असं नाही वाटत, की खरी काऊन्सिलिंगची गरज तुझ्यापेक्षा आदित्यला आहे? स्पर्धा परीक्षेमध्ये जराशी मात खाल्ल्यावर तो बिथरला. तो तुला चुकीच्या पद्धतीने हिणवत राहिला. कारण तू त्याला हरवशील, स्पर्धेमध्ये त्याच्या पुढे निघून जाशील याची त्याला भीती वाटू लागली. फक्त त्याच्या निगरगट्ट स्वभावामुळे आणि तुझ्या हळव्या स्वभावामुळे तो तुझ्यावर कुरघोडी करत राहिला. तू घाबरलीस, दबलीस. दुर्दैवाने शाळा यात फार काही करू शकणार नाही. तूच मनाशी पक्कं ठरव, की आदित्य ही एक अतिशय क्षुल्लक व्यक्ती आहे. त्याचं अस्तित्वच नाकारत जा. बघ सगळं कसं एकदम सोपं होईल!’’

‘‘मी यातून बाहेर पडू शकेन? मला खूप कंटाळा आलाय!’’

‘‘चिडवाचिडवीचे प्रकार तुमच्या या अडनिडय़ा वयात अगदी स्वाभाविक असतात, पण त्याने आपण इतकं का घाबरायचं? लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे! समोरचा माणूस बोलतो बोलतो आणि काही प्रोत्साहन मिळत नाही समजल्यावर आपणहून थांबतो. आदित्यसारखी मुलं वरवर धीटपणा दाखवतात, पण आत्मविश्वासाचा खरा प्रश्न त्यांच्यामध्येच असतो. म्हणून ते दुसऱ्यांना त्रास देतात. आदित्यच्या आईला आत्ता हे समजत नाहीये की त्याच्या चुकांवर पांघरूण घालून ती त्याचं नुकसानच करतेय!’’

‘‘कळतंय मला, मावशी!’’

‘‘आता पुढचा महिनाभर रोज सकाळी एक करायचं. पाच मिनिटं आरशासमोर उभं राहायचं. स्वत:च्या डोळ्यांत बघत म्हणायचं- ‘मी आता मुळीच घाबरणार नाहीये. माझा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.’ स्वत:मधल्या चांगल्या गुणांची उजळणी करायची. चांगले विचार मनात आणायचे. पाहा तुझ्यात नक्की फरक पडेल. जुई, तुझ्या बाबतीत जे घडलं त्यापेक्षाही खूप कठीण परीक्षा आयुष्य घेत असतं आपली, पण त्याने खचायचं नाही. त्या निराशेच्या क्षणांमध्ये स्वत:ला म्हणायचं-  इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना..’’

राधिका मावशीच्या पुढील तीन-चार सेशन्सचा जुईवर सकारात्मक परिणाम होऊ  लागला. महिन्याभरातच ती निराशेच्या गर्तेतून बाहेर पडू लागली. आता आदित्य तिच्यासमोर आला तेव्हा ती मुळीच घाबरली नाही. इतर मित्र-मैत्रिणींशीही खेळू, बोलू लागली. तिने ऑलिम्पियाडचा अभ्यास पुन्हा उत्साहाने सुरू केला.

शेवटच्या सेशनमध्ये राधिका मावशीला आत्मविश्वासाने निग्रही झालेली जुई नव्याने पाहायला मिळाली.

प्राची मोकाशी  mokashiprachi@gmail.com