माझ्या बालवाचकांनो, महासागर असं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी लगेचच आपल्या डोळ्यांसमोर मासे येतात, खरं ना? तर आजच्या लेखात या माशांविषयीच जाणून घेऊ  या. तब्बल ५० करोड वर्षांपूर्वी मासे उत्क्रांत झाले. उत्क्रांतीच्या क्रमामधले ते पहिले पृष्ठवंशी प्राणी. प्रजाती आणि प्राणीसंख्या या दोन्ही निकषांवर मासे सर्वाधिक संख्येने आढळणारे पृष्ठवंशी प्राणी आहेत. सागरी माशांच्या तब्बल १५,३०० प्रजाती आहेत. त्यापैकी २,४५० प्रजाती भारतीय किनाऱ्यावर आढळतात. माशांचं वर्गीकरण तीन मोठय़ा गटांमध्ये केलं जातं- जबडारहित, कास्थिल आणि हाडं असलेले.

जबडारहित किंवा अ‍ॅग्नाथा गटामधले मासे आज आढळणाऱ्या माशांच्या प्रजातींमधले सर्वात आदिम प्रकारचे मासे आहेत. नावाप्रमाणेच या माशांना जबडा नसून गोलाकार, स्नायुयुक्त तोंड आणि त्यामध्ये दातांच्या ओळी असतात. यांचं शरीर साप किंवा ईलसारखं लांब, गोलाकार असतं आणि यांना खऱ्या अर्थाने कणा अथवा कशेरू नसतो.

कास्थिल किंवा कॉन्ड्रिकथीज गटाच्या माशांमध्ये शार्क, रे, स्केट आणि रॅटफिश या प्रकारच्या माशांचा समावेश असतो. कास्थिय ऊतींपासून सापळा बनला असल्याने या माशांच्या गटाला कास्थिल असं नाव मिळालेलं आहे. हाडांपासून बनलेल्या सांगाडय़ापेक्षा कास्थिल सांगाडा हलका आणि अधिक लवचीक असतो. त्वचेवरील पट्टीकाभ किंवा प्लॅकॉइड खवल्यांमुळे या माशांची त्वचा खरकागदासारखी खरखरीत असते. सर्व माशांमध्ये हाडं असलेले मासे किंवा ऑस्तेक्थीज् प्रकारचे मासे तब्बल ९६% असतात. अर्थातच मासेजगतामध्ये हाडं असलेल्या माशांची संख्या सर्वाधिक आहे. या माशांचा सांगाडा हाडांपासून बनलेला असतो. त्वचेवरील खवले पातळ, लवचीक आणि परस्परव्यापी किंवा कौलांसारख्या रचनेमध्ये असतात. कल्लय़ांच्या संरक्षणाकरिता या माशांच्या कल्लय़ांवर हाडाची चकती आणि मांसापासून बनलेलं एक झाकण असतं. बहुतेक हाडं असलेल्या माशांमध्ये पोटाच्या वर एक वाताशय किंवा हवा भरलेली स्नायूंची पिशवी असते.

ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद