रंग अनोखे आनंदाचे
उधळीत आली दिवाळी,
दीपोत्सवाच्या प्रकाशडोही
अवघी धरणी न्हाली

चैतन्याचे सूर बरसती
उत्फुल्ल गात्री-गात्री,
मांगल्याची उन्मुक्त वाहे
तेजोर्मय गंगोत्री

शुभशकुनाची रंगबावरी
रांगोळी अंगणदारी,
आकाशदिव्यांचे प्रकाशपक्षी
रूणुझुणुती त्या अंबरी

फटाकडय़ांची आतषबाजी
फराळ अन् मनमोही,
नवीन वसती, गोपाळांच्या
आनंदा तोटा नाही

रात्र बहरली प्रकाशफुलांनी
लावण्यखणी देखणी,
चंद्र बीजेचा पहा हासतो
ओवाळिता तया भगिनी

सकळां लाभो सुख-समृद्धी
शुभ चिंतनी कामना,
स्नेहबंध तो वृद्धिंगत हो
हीच एक प्रार्थना