16 October 2019

News Flash

फूल

एक फूल हळूच हसलं पानाआड लपून बसलं!

| June 28, 2015 12:18 pm

फूल
एक फूल हळूच हसलं
पानाआड लपून बसलं!

धावत दुरून वारा आला
फुलाला हळूच झोका दिला

आभाळातून आली सर
थेंबांचे मोती पाकळ्यांवर!

गालात हळूच हसलं ऊन
फुलासाठी छेडली उबदार धून!

गाणे छेडत आलाय भुंगा
फुलाभोवती घातला पिंगा

हळूच आलं फुलपाखरू
रंगाची उधळण लागलं करू
आभाळही दुरून हसलं
फुलाला रंग देऊन बसलं

चंद्रही आला ढगाआडून
फुलाची समजूत पाहिली काढून

हसली गाली पिठूर चांदणी
फुलाची केली मनधरणी
बागेत फिरायला चिंगी आली
रुसून बसल्या फुलापाशी गेली

चिंगीस पाहुन नवल घडलं
खुदकन गालात फूल हसलं!

रवींद्र जवादे

********

नटखट पाऊस
ढग फुटला, वारा सुटला
पाऊस आला जोराचा
चला मुलांनो भिजूया सारे
पाऊस आम्हा पोरांचा

पाहतो वरून, आभाळ भरून
पाऊस फार खटय़ाळ
खाली येऊन मस्ती करतो
जसा खोडकर बाळ

पाऊस सरी येतात दारी
झिम्माड पाऊस रानात
टपटप टपटप वाजत बसतो
जणू बोलतो गाण्यात

तळ्यात पाऊस, मळ्यात पाऊस
खुश्शाल डुंबू पाण्यात
इंद्रधनूची कमान पाहून
मोर नाचतो मनात

पाऊस पाणी, फुलती गाणी
पाऊस पाहतो हसून
आनंदाच्या लाटेवरती
चला जाऊया बसून

हिरवा ऋतू, बरवा ऋतू
धरती गेली नटून
चैतन्याचे दान देऊन
पाऊस जाई भेटून
-एकनाथ आव्हाड

First Published on June 28, 2015 12:18 pm

Web Title: poems
टॅग Balmafil,Poems