फुलपाखरा उडू नको रे
इकडुनि तिकडे असा
बैस गडय़ा तू निवांत क्षणभर
पाहू तुला मी कसा?

पंख सानुले तुझे इवले
विविध त्यावर ठसे
पाहुनी माझे मन मोहरते
सांग आवरू कसे?

देवाजीने तुला घडविता
रंग उधळले किती
रूप मनोहर तुझे पाहता
कुंठित होते मती

बैसशील का सांग गडय़ा तू
मम हातावरी एकदा
डोळे भरूनी पाहीन मी रे
तुझी रूपसंपदा..
– भाऊ शिगवण

सहल
बेडकांनी काढली
वर्षां सहल
उडय़ा मारून
केला कहर

रेनकोट, छत्री
पाठीला सॅक
लीडर झाले
जॅक अन् मॅक

रेनडान्सची
केली धमाल
बेडूकरांवांनी
केली कमाल

चिंब भिजले
केली मस्ती
डबे खाऊनी
आली सुस्ती

आता घराची
आठवण झाली
बेडकांनी मारली
डबक्यात दडी
– कलिका महाजन