05 December 2019

News Flash

प्रेमळ मावशी

एक गाव आहे त्याचे नाव तावशी तिथे राहते माझी प्रेमळ अशी मावशी

प्रेमळ मावशी

एक गाव आहे त्याचे नाव तावशी
तिथे राहते माझी प्रेमळ अशी मावशी

मावशी करते माझे खूप असे लाड
तिच्या अंगणात आहे उंचच उंच माड

त्या माडावर आहेत खूप खूप नारळ
माडावरती माकड करतात खूप गावळ

गदागदा गदागदा हलवतात माडाला
नारळ सगळे काढून बोडकं करतात झाडाला

दंगा बघून माकडांचा मावशी देऊ पाहते मार
बघताक्षणीच मावशीला माकडे होतात पसार

तोडलेले नारळ बघून मावशी येते रागाला
तरीपण सगळे नारळ देऊन टाकते मला

– बालाजी मदन इंगळे
खोडकर वारा

खटय़ाळ वारा
मस्ती करतो
उगीच झाडांना
डोलायला लावतो।

समुद्रावर जातो
लाटांशी खेळतो
उंचच उसळी
घ्यायला लावतो।

डोंगरावर पळतो
झाडीत लपतो
मजेत शीळ
घालीत सुटतो।

वरवर धावतो
ढगांना गुदगुल्या
हळूहळू करतो
सैरावैरा पळवतो।

अस्सा खोडकर वारा
सर्वाचा आहे प्यारा
मौजमजा करा
मंत्र त्याचा खरा!

– शैलजा पुरोहित

पेरू गोड, पण..

पोपट बोलतो
गोड गोड
खातो तो
पेरूची फोड॥

पेरूच्या फोडीत
गोडवा फार
म्हणून मला ते
आवडतात फार॥

आईला विचारतो,
‘पेरू खाऊ?’
‘नको, सर्दी होईल’
म्हणते असे आई

पोपट खातो पेरू
त्याला काहीच होत नाही,
आणि आम्हालाच का
पेरू खाण्याची मनाई?

– वसंत खेडेकर

First Published on November 15, 2015 12:10 am

Web Title: poems in balmaifal
टॅग Balmaifal,Poems
Just Now!
X