महासागरातील महामार्गाने आता आपल्याला विषुववृत्ताजवळच्या उष्ण भागामध्ये आणलं आहे. इथे महासागराचं पाणी छान कोमट असतं. क्वचितच या पाण्याचं तापमान २० डिग्री सेल्शिअसपेक्षा खाली जातं. या नितळ, आकाशी-निळ्या पाण्यामध्ये प्रवाळभित्तींचं स्वर्गवत् साम्राज्य दडलेलं असतं. छोटय़ा दोस्तांनो, जमिनीवर जे महत्त्व आणि सौंदर्य सदाहरित पर्जन्यवनांचं, तेच सागरांमध्ये प्रवाळभित्तींचं! समुद्री जीवनापैकी तब्बल एक चतुर्थाशपेक्षा अधिक प्रजाती प्रवाळांमध्ये आढळतात. सहाजिकच, पर्जन्यवनांप्रमाणे प्रवाळभित्तींदेखील महासागराच्या उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रवाळभित्ती समुद्रकिनाऱ्यांकरता नैसर्गिक संरक्षकांची भूमिका पार पाडत असतात, ज्यामुळे सागरकिनारी वावरणाऱ्या अनेक प्राणि आणि मानवी समूहांचं समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होतं. शिवाय, प्रवाळांचं अचंबित करणारं सौंदर्य निसर्गप्रेमी, पर्यटक साऱ्यांनाच आकर्षित करून घेतं.

पॉलिप्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सूक्ष्म प्राणीजीवांपासून प्रवाळ बनलेले असतात. माझ्या छोटय़ा वाचकांनो, हे पॉलिप्स समुद्राच्या पाण्यामधून कॅल्शियम मिळवतात, आणि त्याचं रूपांतर एका स्रावामध्ये करून मोठमोठय़ा आकाराची, कॅल्शियम काबरेनेटपासून बनलेली कठीण बाह्यवरणं बनवतात. चिमुकले, इवलेसे पॉलिप्स स्वसंरक्षणाकरता या बाह्यवरणांमध्ये दडून बसतात. तुलना करायचीच तर- माती आणि आपल्या लाळेच्या मिश्रणापासनू कुंभारमाशी स्वत:ची सुबक घरं बांधतात त्याप्रमाणेच ही पॉलिप्सची बाह्यवरणं असतात.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चिमुकले पॉलिप्स, त्यांच्याहून सूक्ष्मतम्  झूएंथल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जीवांची जोपासना करतात. झूएंथलांनी संश्लेषणाच्या माध्यमातून निर्माण केलेलं अन्न पॉलिप्स थेट शोषून घेतात आणि अंशत: आपली अन्नाची गरज भागवतात. विविध प्रजातींचे पॉलिप्स गटाने एकत्र नांदतात ज्यामुळे प्रवाळी तयार होतात. विविध प्रजातींनुसार या प्रवाळी वैशिष्टय़पूर्ण आकारात घडतात. त्या आकारांनुसार त्यांना ओळखलं जातं, उदाहरणार्थ फ्रिजिंग रीफ, बॅरिअर रीफ, अटॉल रीफ, वगैरे.

प्रचंड प्रमाणात समुद्रात विसर्जित केलं जाणारं सांडपाणी, मासेमारीचा अतिरेक, जागतिक तापमानवाढ या आणि इतर मानवनिर्मित घटकांचे घातक दुष्परिणाम या प्रवाळभित्तींवर प्रामुख्याने होताना दिसताहेत. छोटय़ा दोस्तांनो, यांमुळे प्रवाळभित्तीचं सौंदर्य नष्ट होत चाललंय, त्यांची वाढ खुंटते, किंवा त्यांचा अगदी संपूर्ण विनाशही होतो आहे.

ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org

शब्दांकन: श्रीपाद