16 October 2019

News Flash

पालक खाणार त्याला..

सुट्टी संपली तशी आमची कार्टून मंडळी गावाहून परत आली.

|| श्रीनिवास बाळकृष्णन

सुट्टी संपली तशी आमची कार्टून मंडळी गावाहून परत आली. सुट्टीत कोणी काय काय धमाल केलीये त्याचे फोटोही त्यांनी अपलोड केलेत. तुम्ही त्यांचे फेसबुक मित्र आहात का? नसाल तर व्हा. आपणही इथे सुट्टीत जे शिकलोय ते फेसबुकवर टाकून त्यांना दाखवा.. म्हणजे ते मित्र झाल्यावर दिसेलच.

आज आपल्या भेटीला एक कार्टून समुद्रीमाग्रे आलाय. पाहू या..

१९२९ साली.. म्हणजे बरोब्बर ९० वर्षांपूर्वी एका कार्टून जगतात एका महामानवाचा जन्म झाला. त्याआधीची प्रसिद्ध कार्टून ही जास्त करून प्राण्यापक्ष्यांची होती. या महामानवाकडे अपार शक्ती होती. इतकी, की ज्याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. तो कुठलाही दैवी अवतार नव्हता, ना परग्रहावरील माणसांचा चमत्कार होता. प्युअर मनुष्यगण असलेला माणूस. समुद्रावर भटकंती करणारा नाविक!

पोपॉय त्याचे नाव. ते इंग्रजीत popeye असल्याने पॉपी, पोपेयीं, पोपे असं कसेही उच्चारू शकता. या नावासारखं दुसरं नाव असलेलं कार्टून नसल्याने काहीही बोललात तरी समोरच्याला हाच आठवणार, इतका हा ओळखीचा!

हा लहानांप्रमाणे कॉलेजवयीन तरुणांनाही आवडतो. कारण एकच- हा दिसायला लुकडू असला तरी याच्याकडे असणारी अपार शक्ती! ती शक्ती सामावलेली असते याच्या खेकडय़ासारख्या दोन बाहूंत. बाहू म्हणजे आपण कोपरापासून मुठीपर्यंत! दंडाच्या बेंडकुळ्या साधारणच आहेत. पण हा शक्ती वाढविण्यासाठी चक्क गटागटा पालक भाजी खातो. खातो म्हणजे गिळतोच. तेही पनीरशिवाय. कमालच!

बाहेरच्या देशात भाज्या पत्र्याच्या डब्यातून (टिन) मिळतात. हा डबा खाऊन रिकामा केला की टणटणाटण दंड, बाहू फुगायचे. इन्स्टंट शक्ती. हॉर्लेक्स, बोर्नव्हिटावालेही इतक्या लवकर शक्ती येण्याचा दावा करू शकत नाहीत.

टीव्हीच्या जाहिरातीत दिसणारे नूडल्स, चॉकलेट, जॅम-सॉसच्या जाहिराती आपल्यावर मारल्या जातात! पण हा एकमेव माणूस आहे ज्याने हिरव्या पालेभाजीचे व शक्तीचे महत्त्व समजावले. एकेकाळी याला फॉलो करत अनेकांनी डब्यात पालक आणायला सुरुवात केली. पण आपल्याकडे टिनमधून पालक येत नसल्याने तेवढी पॉवर आपल्याला मिळत नसावी. म्हणून याचे चित्र असणारे टी-शर्ट बाजारात मिळतात. ते घालून किंवा त्याच्या हातावर अँकरचा (बोटीचा नांगर) टॅटू आहे, तसाही काढून घेतात. काही फरक पडतोय का हे प्रयोग कॉलेजची मुले करून पाहत असावीत.

पोपॉय हा वयाने थोराड वाटतो. म्हणजे तरुण वाटत नाही. त्यात दात-केसही नाहीत. सतत तोंडात तंबाखूचा पाइप! या पाइपने तो पालक भाजी खातो किंवा एखादी वस्तूही ओढून घेऊ शकतो. डोक्यावर नाविकाची असते तशी हॅट आणि साधरण तसाच वेश. (हा ड्रेस आपण मागे डोनाल्ड डकच्या अंगावर पाहिला होता.) एका डोळ्याने अधू आहे, पण तरी रुबाबदार! एक नंबर! चालणं पण इतकं रुबाबात, की खांदे प्रत्येक पावलापेक्षाही जास्त पुढे-मागे जायचे. याच्या शक्तीवर भाळून त्याला ऑलिव्ह नावाची मत्रीणही होती. जिच्याशी एकनिष्ठ राहत पुढे त्याने लग्नही केलं. आणि तितकाच पालकभाजी फॅन मुलगाही जन्माला घातला. यांना छळणारा ब्लुटो नावाचा महाविशाल गुंड रानटी म्हणावा असा आहे. त्याची कृत्यंही तशीच! जवळपास सर्व एपिसोड या नायक-खलनायक प्रकारातल्या भांडणाचे आहेत. एकमेकांना पाण्यात पाहत, पाणी पाजत ऑलिव्हचं मन जिंकण्याचे, तिला वाचविण्याचे उद्योग- म्हणजे या विनोदी कार्टून मालिका. थोडय़ाफार आपल्या टॉम अ‍ॅण्ड जेरीसारख्या.

तर याची निर्मिती एल्झी क्लिस्लार सेगर याने केली. आधी थंबल थिएटरमधून हा पहिल्यांदा झळकला. मग १९३३ साली मॅक फ्लिशर स्टुडिओने व त्यानंतर आपल्याला परिचित असणाऱ्या पॅरामाउंट स्टुडिओतून पोपॉयची निर्मिती होत राहिली. मग टर्नर आणि वॉर्नर ब्रदर्सला याच्या निर्मितीचे हक्क मिळाले. त्याद्वारे आपल्याला पोपॉय व्हिडीओ गेम्स, कपडे, दूरदर्शन, शेकडो जाहिराती, चॉकलेट कँडी ते सिगारेटपर्यंतच्या अनेक उत्पादनांवर दिसला. पुढे १९८० मध्ये यावर एक सिनेमा आला. प्रसिद्ध नट रॉबिन विल्यम्स याने यात पोपॉयची भूमिका साकारली आहे. भूमिकेतील फोटोत मेकअपद्वारे त्याचे हात खूप जाड केलेत. सिनेमातील पोपॉय आणि ऑलिव्ह कार्टूनपेक्षा देखणे आहेत. २००२ साली घेतलेल्या टीव्ही गाईडने ५० कायमस्वरूपी महान कार्टूनमध्ये याला २०वे स्थान दिलं. मग काय, आज खाताय पालक?

chitrapatang@gmail.com

First Published on June 8, 2019 4:26 pm

Web Title: popeye the sailor man