News Flash

खिडकीबाहेर..

एका राज्यात एक पोपट होता. तो छान गाणी गायचा, स्वच्छंद उडायचा आणि इथून तिथे आनंदाने बागडायचा.

|| प्राची बोकिल

आशियायी खंडाचे पहिले ‘नोबेल पुरस्कार’ विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे कवी, नाटककार, लेखक तर होतेच, पण प्रामुख्याने ते एक अत्यंत संवेदनशील शिक्षक होते. त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाकरिता नोबेल पुरस्कार त्यांच्याकडे चालत आला. ७ मे १८६१ ला कोलकातामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांची पहिली कविता वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी लिहिली. पण वयाच्या साठाव्या वर्षीदेखील ते एका विद्यार्थ्यांप्रमाणे चित्रकला शिकले. देशातील शिक्षण पद्धतीवर तिखटपणे भाष्य करणारी त्यांची ‘A parrot’s tale’ ही पुढील लघुकथा खूप काही सांगू पाहते..

एका राज्यात एक पोपट होता. तो छान गाणी गायचा, स्वच्छंद उडायचा आणि इथून तिथे आनंदाने बागडायचा. पण त्याला कसलंही ज्ञान नव्हतं. गाण्यामधील राग, सूर, ताल, लय या व्याकरणाचा तर त्याला मुळी गंधच नव्हता. तिथल्या राजाने या पोपटाला शिक्षण देण्याचं फर्मान सोडलं. त्याला ‘ज्ञानी’ बनवण्याचं ठरवलं. लागलीच शिक्षणतज्ज्ञांना, पंडितांना बोलावण्यात आलं. पोपटाच्या अज्ञानाचं कारण हे त्याचा सभोवतालचा परिसर, म्हणजेच तो राहत असलेल्या काठय़ांच्या आणि पाला-पाचोळ्याच्या घरटय़ामुळे आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्याला तिथून काढून एका सोन्याच्या पिंजऱ्यात हलवण्यात आलं. त्या पिंजऱ्याला छान सजवलं, नेटकं ठेवलं आणि पोपटाच्या शिक्षणासाठी लागणारी भरपूर पुस्तकं, विविध मजकूर लिहिला गेला. पुस्तकांचे, कागदांचे रकानेच्या रकाने त्याला ज्ञानी बनवण्यासाठी त्या पोपटाच्या चोचीतून कोंबण्यात आले. पण त्यामुळे झालं असं, की हे शिक्षणतज्ज्ञ, पंडित स्वत: खूप श्रीमंत झाले, पण त्या पोपटाचं नसíगक गाणं मात्र पार संपून गेलं. त्या पोपटाचा विचार कोणालाच नव्हता. तो आता साधं ओरडूही शकत नव्हता. त्या पिंजऱ्यात तो अगदी घुसमटत होता. कधी एखादी प्रकाशाची तिरीप त्याच्या पिंजऱ्यात डोकावलीच तर तो त्याचे पंख फडफडवण्याचा प्रयत्न करायचा; तेव्हा त्याचे पंखही बांधून टाकले गेले. या सगळ्या अत्याचारामुळे शेवटी त्या पोपटाचे मुळी प्राणच गेले.

गुरुदेवांना स्वत:ला पाठांतर करून, घोकमपट्टी करून, बंद वर्गामधून शिक्षण घेणं मुळीच मान्य नव्हतं. याच विचारांतून त्यांनी १९०१ मध्ये शांतीनिकेतन (आजची विश्व-भारती) येथे ‘पाठ भवन’ या एका आगळ्यावेगळ्या शाळेची स्थापना फक्त ५ विद्यार्थ्यांना घेऊन केली. तिथले वर्ग झाडांच्या सावलीत, निसर्गाच्या सान्निध्यात भरत. विद्यार्थ्यांच्या संगीत, नृत्य, नाटय़, चित्रकला या सगळ्याच कलागुणांना अभ्यासाइतकंच तिथे प्रोत्साहन आणि महत्त्व मिळत असे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या शाळांनी काही कारणांमुळे काढून टाकलं होतं, असे अनेक विद्यार्थी शांतीनिकेतनमध्ये शिकत होते. इथे कुणालाही गणवेश नव्हता, बरेचदा मुलं अनवाणीच शाळेत वावरत! गुरुकुल पद्धतीवर आधारित या शाळेमध्ये गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये एक निराळंच नातं प्रस्थापित व्हायचं. विद्यार्थ्यांना प्रतिस्पर्धी बनवण्यापेक्षा एकमेकांचे सहकारी बनवण्याकडे शाळेचा अधिक कल होता. नोबेल पुरस्कार विजेते, अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे याच संस्थेचे माजी विद्यार्थी.

अशीच एक आगळीवेगळी शाळा म्हणजे जपानची ‘तोमोई’ शाळा. साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ही शाळा जपानमध्ये अस्तित्वात होती. तोमोई शाळाही एकदम वेगळीच होती. तिथे आगगाडीच्या डब्यामध्ये वर्ग भरायचे. आजूबाजूला नुसती झाडं आणि विविधरंगी फुलांचे ताटवे होते. शाळा सुटली तरी तिथे मुलांना घरी जायची घाई नसायची आणि रोज सकाळी ते आतुरतेने शाळेत जाण्यासाठी वाट पाहायचे.

तेत्सुको कुरोयानागी ही जपानी टी.व्ही.वरील त्या काळची सुप्रसिद्ध अभिनेत्री याच शाळेत शिकली. पुढे जाऊन तिने तिच्या या अनोख्या शाळेचे वर्णन ‘तोत्तोचान’ या पुस्तकामध्ये केलं आहे. तोत्तोचान हे तिचं लाडाचं नाव. तोत्तोचानला लहानपणी खूप प्रश्न पडायचे. तिच्या पहिल्या शाळेतील शिक्षकांना तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देताना अगदी नाकी नऊ यायचे. त्यांना वाटायचं की, तिच्या अशा सारख्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे वर्गामधील इतर विद्यार्थ्यांना त्रास होतोय. म्हणून तिला त्या शाळेमधून काढून टाकलं होतं. पुढे तिच्या आईने अगदी विचारपूर्वक तिला तोमोई शाळेत घातलं, जिथे तोत्तोचान खऱ्या अर्थाने खुलली, बहरली. याला कारणीभूत होते या शाळेची स्थापना करणारे सोसाकु कोबायाशी हे मुख्याध्यापक. तोत्तोचान म्हणते, ‘तिला जर ही तोमोई शाळा मिळाली नसती तर तिला ‘शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी’ असा आयुष्यभरासाठी शिक्का लागला असता.’ तोमोई शाळेतील गमती-जमती, निरनिराळे उपक्रम आणि त्यांचं वेगळेपण समजून घ्यायचं असेल तर ‘तोत्तोचान’ हे पुस्तक या सुटीमध्ये नक्कीच वाचायला हवं.

दोस्तांनो, आपल्यापकी कुणाला संगीत किंवा चित्रकला या विषयांची आवड असली, त्यात काही करायची इच्छा जरी असली, तरी आजकालच्या मार्क्‍स मिळवण्याच्या मूषक-शर्यतीमध्ये आपण आपल्यातल्या या उपजत कलागुणांना दुय्यम स्थान देतो. इतकं की दुर्दैवाने आपल्याला ही कला कधी काळी येत होती याचाही आपल्याला संपूर्णपणे विसर पडतो. वरील कथेमधील तो ‘पोपट’ याच परिस्थितीला बळी पडला. तसंच तोत्तोचानसारखी वेगळी विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्यांनाही बरेचदा ‘लहरी’ ठरवलं जातं. अल्बर्ट आइनस्टाइन, एडिसन हे असेच काही ‘लहरी’ विद्यार्थी होते, ज्यांनी पुढे जाऊन इतिहास घडवला.

हल्ली अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडे आपल्याला पुरक वाचन करायला वेळही मिळत नाही. किंबहुना गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये झालेल्या इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटरच्या क्रांतीमुळे आपण पुस्तकं, वाचन यांपासूनच दुरावलो आहोत. व्हिडीओ गेम्स, कम्प्युटर, टी.व्ही., स्मार्ट फोन्स यांच्यामधून तर आपल्याला डोकं वर काढायला सवड नसते. कुठेतरी निसर्गाशी आपलं नातंच मुळी तुटत चाललंय. खरं तर आपले डोळे उघडे ठेवून, आजूबाजूचा परिसर न्याहाळून, स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धी वापरून, जे आपण आत्मसात करतो ते खरं शिक्षण – आयुष्याचं. हे शिक्षण कसं मिळवायचं? तर सुटीमध्ये मिळालेल्या वेळेचा उत्तम वापर करून!

आपल्या शाळेच्या वर्गाच्या ‘खिडकीबाहेर’ एक अतिशय मोठ्ठं जग आहे, जे आपल्याला आयुष्याचं शिक्षण देत असतं. ती खरोखरच एक ‘वेगळी शाळा’ आहे. चला तर मग! या सुटीमध्ये आपण या वेगळ्या शाळेचे विद्यार्थी बनूया! अभ्यास, मार्क्‍स, ग्रेड्स यांपलीकडे जाऊन आपल्यातले गुण शोधून तर पाहूया! खरं म्हणजे, आपल्या स्वत:चा शोध घेऊया! कुणास ठाऊक मोठं झाल्यावर आपल्यापकी कुणी आइनस्टाइन, एडिसनही बनेल!

दोस्तांनो, काही वर्षांपूर्वी अशाच विषयावर भाष्य करणारा ‘थ्री इडियट्स’ हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्या चित्रपटामधल्या एका वाक्याचा आशय नेहमी मनात ठेवा- ‘‘बच्चा, काबिल बनो, काबिल. कामयाबी अपनेआप मिल जायेगी..’’

prachibokil@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:05 am

Web Title: prachi bokil story for kids
Next Stories
1 डोकॅलिटी
2 शाळा
3 व्यत्यय
Just Now!
X