आजी घरात आली तेव्हा तिला नील एका कोपऱ्यात गाल फुगवून बसलेला दिसला. ‘स्वारीचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय’, असं म्हणून आजी नीलजवळ गेली. ‘आलास खेळून? चल हात-पाय तोंड धुऊन शुभंकरोती म्हणायला’ आजीने हात धरून नीलला उठविले, पण नील आणखीनच फुरंगटला. ‘मी नाही जा. रोज रोज काय शुभंकरोती? आमची मॅच किती मस्त रंगली होती. मम्मीने सांगितलं की, पुरे आता खेळ. घरी चल. मला राग आलाय मम्मीचा. खेळ अर्धवट सोडला म्हणून विनय आणि निखिल रागावले आणि..’ बोलता बोलता नीलच्या डोळ्यात पाणी आलं. तसं आजीने म्हटलं, ‘हे बघ सोन्या, शहाणा नं तू? डोळे पूस बरं. आधी हात-पाय धुऊन घे. मग मी तुला एक गंमत देणार आहे, पण माझं ऐकलंस तरच हं!’
नीलला आजी खूप आवडते. त्याने आजीचं ऐकलं. हातपाय धुऊन तो देवघरात आला तेव्हा आजीने निरांजन उजळलं होतं. धूपकांडीचा सुगंध घरभर दरवळत होता. आजी देवांसमोर उभी राहून हळू आवाजात प्रार्थना म्हणत होती. मग नीलनेही देवांना नमस्कार करून शुभंकरोती झाल्यावर परवचा म्हटली. आजी लक्षपूर्वक ऐकत होती. परवचा झाल्यावर नीलने आजीला म्हटलं, ‘आज्जी ग, मला तू गंमत देणार आहेस ना? कसली आहे ग गंमत? लवकर दाखव.’
आजी हसली. म्हणाली, ‘तुला भूक लागली असेल ना? मम्मीने तुझ्यासाठी तुला आवडतो ना तसा शिरा केलाय बदाम घालून.’ ‘पण आजी मी मम्मीशी कट्टी केलीय. मला नको जा शिराबिरा काहीच. मला खेळूच देत नाही ती..’ आजीचं बोलणं मध्येच तोडत नील म्हणाला, ‘तूच तर सांगतेस शरीराला व्यायाम हवा. टीचर पण तसंच सांगतात. खेळामुळे शरीर मजबूत होतं म्हणून’
‘हे बघ नील खेळामुळे शरीर मजबूत होतं. तशी आपली बुद्धीपण चांगली आणि बळकट व्हायला हवी किनई? शुभंकरोतीच्या वेळी श्लोक म्हणतोस, रामरक्षा म्हणतोस, त्यामुळे आपले उच्चार शुद्ध होतात. स्मरणशक्तीच्या सरावांसाठी पाढे म्हणायचे म्हणजे मेंदूलाही व्यायाम होतो. स्मरणशक्ती वाढते हे माहीत आहे का तुला? परीक्षेत चांगले गुण मिळायला हवेत ना? मग? हा मेंदूचाही व्यायाम करायला हवा की नको? सांग बघू तूच.’ ‘म्हणून रोज शुभंकरोती आणि पाढे म्हणायचे असतात आजी?’ नील म्हणाला. आजीने मान डोलावली. ती म्हणाली, ‘मोठी माणसं चुकीचं सांगत नाहीत सोन्या. असं रागवायचं नसतं एकसारखं लहानसहान गोष्टीवरून. आता तुला गंमत देते, पण आधी मम्मीशी बट्टी घेतलीस तरच. जा लवकर. मम्मीला सांगून ये. तरच गंमत.’ नील मम्मीकडे जाऊन म्हणाला, ‘सॉरी मम्मी. आता बट्टी’ मग पळतच तो बाहेर आला. चांदीच्या वाटीत एक छोटा लाडू ठेवून आजीने म्हटलं, ‘हीच ती गंमत. हा लाडू कसला आहे ओळख’ नीलने एक तुकडा खाऊन म्हटलं, ‘आजी, या तर बिया आहेत भोपळ्याच्या. हे गऽऽ काय.’
आजी म्हणाली, ‘शरीराला आणि मेंदूला जसा व्यायाम हवा ना, तसं पौष्टिक खाणंही हवं. भोपळ्याच्या बिया सोलून ठेवल्या होत्या मी परवा. गुळाच्या पाकात भोपळ्याच्या बिया आणि थोडे सुक्या खोबऱ्याचे काप घातले आणि त्याचे दोन-तीन छोटे लाडू केले. भोपळ्याच्या बियांत कॅल्शियम आणि झिंक असतं, गुळात असतं आयर्न म्हणजे लोह. खोबऱ्यात स्निग्ध पदार्थ. हे सगळे आपल्या शरीराला गरज असणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हाडं बळकट होतात. गेल्या आठवडय़ात तुझ्या टीचरनी शिकवलं ना तुला, अन्नपदार्थात शरीराला काय काय हवं असतं ते? म्हणून तुझ्यासाठी मुद्दाम केले लाडू. हे पदार्थ प्रमाणात खायचे असतात, त्यामुळे शरीराला शक्ती मिळते. कळलं?’
लाडू खाता-खाता नील मध्येच थांबून ऐकत होता. ‘पण आजी, आज छान आणि वेगळी गोष्ट सांगायचीस हं तू मला.’ तेव्हा आजी हसून म्हणाली, ‘आज मी तुला माझ्या आजीचीच गोष्ट सांगते, आत्ताच. मीही एकदा अशीच तुझ्यासारखी रागावले होते. आजोळी सुट्टीत गेलो होतो आम्ही सगळे. तर माझी मामेबहीण मला झोपाळ्यावर बसूच देईना. मग मी चिडले, रागावले. नाही जेवणार म्हटलं. तेव्हा माझ्या आजीने मला असाच भोपळ्याच्या बियांचा छानदार लाडू दिला. आपल्या पदराने माझे डोळे पुसले..’
‘म्हंजे आजी, तू लहानपणी रडायचीस?’ नीलने डोळे मोठ्ठे करून म्हटले. आजी म्हणाली, ‘हो रे. रागावले की मला रडू यायचंच. माझी आजी आजारी असायची. तिला किनई बोटांचा व्यायाम करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. मग ती बसल्या बसल्या गवारीच्या शेंगा मोडायची, बिया सोलायची आणि आम्हा भावंडांना आळीपाळीने भोपळ्याच्या बियांचा लाडू द्यायची. मामाकडे भोपळ्याचे वेल होते. शिवाय घरात खूप माणसं असायची तेव्हा. म्हणून भोपळ्याची भाजी केली की आजी आपली भोपळ्याच्या बिया सोलायची. व्यायामही आणि आमच्यासाठी लाडूपण. नेहमीच्या खाऊपेक्षा हा खाऊ किती पौष्टिक! आवडला का तुला, सांग बघू.’
नील म्हणाला, ‘खूप आवडला. आजी मम्मीला पण शिकव ना!’ तेवढय़ात मम्मीच स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, ‘शहाणा आहे आमचा नील. आता शिरा जेवताना खा हं. थोडा वेळ आजोबांशी गप्पा मार, नाहीतर चित्रं काढत बस.’
नीलला वाटलं, ‘किती छान आहे मम्मीपण.’  मम्मीला लाडीगोडी लावत त्याने म्हटलं, ‘उद्या खेळून येईन तेव्हा भेळ नाहीतर पिझ्झा करशील?’ मम्मी म्हणाली, ‘आठवडय़ात फक्त एकदाच करीन. जंकफूड आणि फास्टफूड खायचं नसतं हे तुला सांगितलंय किनई?’
यावर नील म्हणाला, ‘पण मम्मी कधीतरी एकदा चालतं असं आजी म्हणत होती. करशील नं?’ मम्मी हसून ‘हो’ म्हणाली. तसा नील उडय़ा मारीत आजोबांशी गप्पा मारायला गेला.