रुद्र सकाळपासूनच कॉम्प्युटर ऑन करून बसला होता. त्याच्या मीराताईने आज स्काइपवर ऑनलाइन यायचं त्याला प्रॉमिस केलं होतं. ती अमेरिकेत होती.. बारा तास मागे. गेल्याच आठवडय़ात गेली होती महिन्याभराकरिता ऑफिसच्या कामानिमित्ताने. पण त्यांचा दरवर्षीचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसाच व्हायला हवा, म्हणून जाण्याआधीच ती स्वत: बनवलेली राखी रुद्रला देऊन गेली होती. आज ऑनलाइन आल्यावर रुद्र ती राखी तिच्या समोर आईकडून बांधून घेणार होता. त्यांचं हे आधीपासूनच ठरलं होतं.
‘‘आई, लवकर ये. मीराताई आली ऑनलाइन.’’ आई तिची कामं सोडून आली. आज बाबांना सुट्टी नव्हती. पण ते ऑफिसमधून लवकर येणार होते, कारण दरवर्षीप्रमाणे रुद्रच्या धाकटय़ा आत्याच्या घरी संध्याकाळी रक्षाबंधनासाठी सगळ्यांना जायचं होतं.
‘‘हाय रुद्र!’’ मीराताई दिसू लागली.
‘‘हाय मीराताई!’’ रुद्रने तिला हात केला.
‘‘वाट बघत होतास नं?’’
‘‘खूप. तू कधी येणार परत?’’
‘‘अरे, आठवडा झाला की! अजून थोडेच दिवस. सांग, इथून काय आणू तुला रक्षाबंधनानिमित्त?’’
‘‘ए, बहिणीला भावाने गिफ्ट द्यायचं असतं. मी देणार तुला, तू आल्यावर.’’
‘‘ओक्के बाबा. डन. काकू, कशा आहात?’’ मीराने शेजारी बसलेल्या रुद्रच्या आईला विचारलं.
‘‘मी बरी आहे. तुझं कसं चाललंय?’’
‘‘छान! काकू, तुमच्यामुळेच आज मी इथे आहे.’’
‘‘काहीतरीच तुझं. बरं, कशी वाटतेय अमेरिका?’’
‘‘म्हणाल तर स्वर्ग, पण अपना घर फिर अपना घर है! तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करतेय!’’
‘‘रद्र, मीराताईचा जास्त वेळ घ्यायला नको. तिकडे रात्र आहे. तिला झोपायचं असेल नं?’’ आई रुद्रला म्हणाली. रुद्रने मान डोलावली.
‘‘मीरा, तुझी राखी बांधते गं रुद्रला. ओवाळायचं ताटही तयार आहे. दिसतंय नं तुला?’’ असं म्हणत आईने मीराला कॉम्प्युटरवर दिसेल असं रुद्रला बसवलं आणि ती वाकून उभी राहिली.
‘‘हो काकू!’’ आईने मग रुद्रला ओवाळलं आणि मीराने बनवलेली राखी त्याच्या मनगटावर बांधली.
‘‘ताई, तुझं गिफ्ट तू आल्यावर देईन. माझी गेल्या वर्षीची स्काउटमधली खरी कमाई होती नं ती मी जपून ठेवली आहे. त्यातूनच मी माझ्या आवडीचं गिफ्ट तुला घेणार आहे. मी मोठा झालोय आता.’’
‘‘हो तर! सातवीत गेलात म्हणजे शिंगंच फुटली नाही का आपल्याला?’’ आईने रुद्रच्या डोक्यात टपली मारली.
‘‘मीरा, अगं तू गप्प का?’’ आईने विचारलं.
‘‘काकू, रुद्रने मला आयुष्यभराचं गिफ्ट दिलंय! आणखी काय मागू? ते आचार्य अत्र्यांच्या श्यामची आई सिनेमामधलं गाणं आहे नं ‘भरजरी गं पितांबर..’ आमचं नातं मला तसंच वाटतं नेहमी.’’ आईने होकारार्थी मान डोलवली. मात्र, रुद्रला काही संदर्भ लागेना.
‘‘म्हणजे काय गं मीराताई?’’
‘‘रुद्र, आत्ता नको. ताईला झोपू दे. बघ, ती डोळे ताणून बोलतेय आपल्याशी. मीरा, झोप आता बाळा. आपण पुन्हा बोलू.’’ मीराने दोघांना ‘बाय’ म्हटलं आणि ती ऑफलाइन झाली.
‘‘आई, सांग नं मीराताई काय म्हणत होती ते!’’ रुद्र काही विषय सोडायला तयार नव्हता. आईला थोडा वेळ होता, त्यामुळे तीही सांगायला बसली.
‘भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण..’ या गाण्यामध्ये श्रीकृष्ण आणि द्रौपदी या भावा-बहिणीच्या नात्याचं वर्णन केलं आहे. कृष्ण हा द्रौपदीचा सखा होता. एकदा कृष्ण, सुभद्रा आणि द्रौपदी राजमहालात बसले होते. सुभद्रा ही कृष्णाची सख्खी धाकटी बहीण. नारदमुनीही तिथे होते. सगळ्यांचा फलाहार चालला होता. फळं कापत असताना कृष्णाचं बोट कापलं गेलं आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. नारदमुनींनी सुभद्रेकडे कृष्णाचे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीची चिंधी फाडून मागितली. पण तिची साडी भरजरी होती. ती साडी फाडायला काही तयार होईना आणि दास-दासींना बोलावण्यासाठी उठून गेली. द्रौपदीने मात्र एका क्षणाचाही वेळ न करता, तिच्या भरजरी साडीचा पदर या टोकापासून त्या टोकापर्यंत फाडला आणि कृष्णाच्या जखमेवर बांधला. त्यामुळे रक्त वाहणे लगेचच बंद झाले. आणि अशा प्रकारे कृष्ण-द्रौपदीमध्ये बहीण-भावाचा बंध निर्माण झाला. कालांतराने जेव्हा पांडवांनी द्यूतामध्ये अखेरीस द्रौपदीला पणाला लावलं आणि द्यूत हरले, तेव्हा दु:शासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगी श्रीकृष्ण तिच्या हाकेला धावून गेला आणि तिला सगळ्यांसमोर लज्जित होण्यापासून वाचवलं. आपल्या बहिणीचं असं संरक्षण करून त्याने एका भावाची जबाबदारी पार पाडली. म्हणूनच हे नातं रक्षाबंधनाचं महत्त्व दर्शवतं. असं काहीसं या गोष्टीचं वर्णन करणारं, हे सुंदर गाणं आहे.’’
‘‘आई, खरंच अनोखं नातं आहेत हे.’’ रुद्रने मग हे गाणं यूटय़ूबवर ऐकलं.
‘‘आई, गाणंपण मस्त आहे गं!’’ आई हसली.
‘‘आता आर्या, ईरा, जयू आणि सुलू आत्याच्या मुली या माझ्या आते बहिणी! तशी मग मीराताई माझी कोण?’’ रुद्रने विचारलं.
‘‘जशी कृष्णाची मानलेली बहीण द्रौपदी, तशीच तुझ्यासाठी तुझी मीराताई! नातं हे रक्ताचंच असलं पाहिजे, असं कुणी सांगितलं? मनं जुळली की जे बंध निर्माण होतात, ते कायमचेच राहतात. मानलेली नाती कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षाही श्रेष्ठ ठरतात. बघ, गेली काही र्वष मीराताई न चुकता आपल्या घरी येऊन या दिवशी तुला राखी बांधते आणि तूही तिच्या येण्याची खूप आतुरतेने वाट बघत असतोस. आज ती अमेरिकेत आहे, तरीही तिने तुझ्यासाठी आधीच राखी देऊन ठेवली आणि आज आठवणीने तुझ्याशी बोललीही. आठवण ठेवणं, जाणीव असणं, हेच शेवटी महत्त्वाचं असतं.’’
‘‘पण मीराताई म्हणाली त्याप्रमाणे, आमचा काय संदर्भ या गाण्याशी?’’
‘‘रुद्र, मीराताई कोण आहे सांग?’’
‘‘आपल्याकडे पोळ्या करणाऱ्या शोभना मावशींची मुलगी!’’
‘‘हो. आठवतंय? तू साधारण पहिलीत असशील. तेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती. बी.सी.ए.च्या पहिल्या वर्षांला होती. आपल्या मावशी खूप धीराच्या. त्यांनी एकटय़ांनी खूप कष्ट करून, चार घरचा स्वयंपाक करून तिला एवढं शिकवलंय. मीरालासुद्धा त्याची चांगलीच जाणीव होती. तिचं कॉलेज सांभाळून, त्यांच्या इथल्या झोपडवस्तीतील मुलांच्या ती शिकवण्या घेऊन घराला हातभार लावायची. तिने खूप कष्ट करून एम.सी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केलंय.’’ आई कौतुकाने सांगत होती. रुद्रही मन लावून ऐकत होता.
आई पुढे म्हणाली, ‘‘मावशींनी कधीही तिला त्यांची कामं करायला सांगितलं नाही. पण एकदा त्या खूप आजारी होत्या. त्यांचं ऑपरेशन झालं होतं. आईची कामं जाऊ नयेत म्हणून मीरा आपल्याकडे यायची महिनाभर कामाला. तिला तुझा खूप लळा लागला होता. काम झाल्यावर ती रोज तुझ्याशी थोडा वेळ खेळायची. त्या दरम्यान रक्षाबंधन होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी मीराचं काम आटपलं आणि निघताना तुला काहीतरी खाऊ द्यायचा म्हणून तिने तिची पिशवी उघडली. तेव्हा एक सुंदर राखी तिच्या पिशवीतून पडली. इतकी सुंदर राखी म्हणून मी ती पाहायला घेतली. तेव्हा मीरा म्हणाली की, ती स्वत: राख्या बनवते आणि त्याच्या ऑर्डर्सही घेते. ती राखी पाहून तू तिच्याकडे एकदम तुला राखी बांधण्याचा हट्ट धरलास. तिला काय करावं काहीच समजेना. पण मी ‘हो’ म्हटल्यावर तिने अगदी आनंदाने तुला राखी बांधली आणि तुमचं भावा-बहिणीचं नातं निर्माण झालं. तुझ्या तेव्हा ते लक्षात नाही आलं, पण फारसे कुणी नातेवाईक नसलेल्या मीराला त्या दिवशी एक भाऊ  मिळाला.’’
‘‘मी तेव्हा तिला गिफ्ट काय दिलं होतं?’’
‘‘तिच्या आईच्या ऑपरेशनचा बराच खर्च झाल्यामुळे तिला काही अभ्यासाची पुस्तकं घ्यायला पैसे कमी पडत होते. तसं ती कामात असताना एकदा ओझरतं माझ्यापाशी बोलली होती. पण हात पसरेल ती मीरा कसली? माझ्या हे लक्षात होतं. म्हणून मग तुझ्याकरवी आपण तिला ते पैसे ओवाळणी म्हणून दिले. तसं पाहायला गेलं तर ही खूप मोठी गोष्ट नव्हती, पण तेव्हा ते तिच्यासाठी फार उपयोगाचे होते. पुढे तिचं शिक्षण झालं, तिला छान नोकरी मिळाली आणि आता बघ ती अमेरिकेत आहे. फेअरी टेल वाटते की नाही?’’
‘‘पण मी कृष्णासारखं तिचं रक्षण कुठे केलंय?’’ हे ऐकून आई हसली. रुद्रची कृष्ण-द्रौपदीच्या गोष्टीवरून काही सुई हलत नव्हती.
‘‘अरे, रक्षण म्हणजे सिनेमासारखं लगेच फायटिंग वगैरे नसतं करायचं. वेळेवर मदतीला धावून जाणं, एवढाच उद्देश असतो. ते तू केलंस!’’
‘‘पण ते माझे पैसे कुठे होते?’’
‘‘हो रे बाबा! पण आता देणार आहेस नं, तुझ्या खऱ्या कमाईमधून काहीतरी? झालं तर!’’
‘‘मग मी काय देऊ  तिला या वर्षी ओवाळणी?’’
‘‘तू सांग नं!’’ रुद्रने जरा वेळ विचार केला.
‘‘नाही सुचत. तूच सांग नं, आई!’’
‘‘एक भरजरी साडी घ्यायची? नाहीतरी तिचं लग्नही ठरलंय. भावाकडून बहिणीला भेट!’’
‘‘अरेव्वा! मस्त आयडिया आहे! आज्जी-आजोबांनी दिलेले पैसेही मी माझ्या पिगीबँकमध्ये साठवले आहेत. तेही वापरेन!’’ रुद्र एकदम खूश झाला आणि पुन्हा ते गाणं ऐकायला कॉम्प्युटरकडे वळला.
प्राची मोकाशी -mokashiprachi@gmail.com