News Flash

रवा उत्तप्पम्.. चटकन्, पौष्टिक, पोटभर

दक्षिण भारतात मिळणाऱ्या उत्तप्पम्ची ही अतिशय सोपी पाककृती आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

माझ्या छोटय़ा दोस्तांनो, मागच्या लेखामधला झटपट वरणभात तुम्हाला खूपच आवडलेला दिसतोय. तेव्हा यावेळीदेखील अशीच एखादी सोप्पी, पण चविष्ट आणि पोटभर होईल अशी पाककृती मी तुम्हाला सांगणार आहे. याला लागणाऱ्या जिन्नसांपैकी मोजके दोन जिन्नस सोडले तर बाकी सगळेच जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, लहरीप्रमाणे बदलू शकता आणि तरी हा पदार्थ उत्तमच होतो.

दक्षिण भारतात मिळणाऱ्या उत्तप्पम्ची ही अतिशय सोपी पाककृती आहे. रवा उत्तप्पम् हा पदार्थ मला आवडतो. कारण तो करायला फारसे कष्ट पडत नाहीत. नाश्त्याला चटणीसोबत, दुपारच्या जेवणामध्ये कधी चपाती-भाकरीऐवजी बदल म्हणून भाजी-आमटीसोबत आणि रात्रीच्या जेवणाकरता काहीतरी हलकंफुलकं असावं असं वाटत असताना साध्या दह्यसोबतही रवा उत्तप्पम् जमून जातो. एखाद्या हरहुन्नरी, तरीही अतिशय नम्र कलाकाराप्रमाणे रवा उत्तप्पम् जेवणाच्या कोणत्याही प्रहरी साथ करतो. त्याची लज्जत वाढवतो.

चार जणांकरता साहित्य : एक वाटी बारीक रवा, अर्धा ते पाऊण वाटी आंबटसर दही, तीन पोपटी मिरच्या, कांदा, टोमॅटो- प्रत्येकी एक, चवीनुसार मीठ, जास्तीत जास्त एक वाटी पाणी, तव्याला लावण्याकरता दोन-तीन चमचे तेल.

उपकरणं : मापाकरता एक वाटी, उत्तप्पम्चं मिश्रण बनवण्याकरता मोठं पातेलं आणि ते ढवळण्याकरता मोठा डाव, गॅस किंवा इंडक्शन शेगडी, जाड बुडाचा बिडाचा किंवा नॉनस्टिक तवा, तव्याच्या मापाचं झाकण आणि तव्याला तेल लावण्याकरता अर्धा चिरलेला कांदा किंवा साधा चमचा.

सर्वप्रथम मिश्रण तयार करायच्या मोठय़ा भांडय़ामध्ये रवा, चवीनुसार मीठ आणि आंबट दही एकत्र करायला घ्या. हे मिश्रण डावाने किंवा एग-बीटरने चांगलं एकजीव करून घ्या. दह्यमध्ये भिजवलेला रवा फुलायला थोडा वेळ द्यावा लागतो. तेव्हा बाकी काही करण्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करा. आता धुतलेल्या मिरच्यांचे बारीक तुकडे करा. कांदा बारीक चिरा. टोमॅटो बारीक चिरून घ्या आणि एकेक करत हे जिन्नस रवा-दह्यच्या मिश्रणामध्ये घालून एकजीव करा. शेवटी या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालत ढवळत राहा. हे मिश्रण आपल्याला साधारण केकचं, भजी करण्याकरता डाळीचं पीठ किंवा बाजारात तयार मिळणारं डोशाचं पीठ असतं तेवढंच पातळ करायचं आहे. हे मिश्रण पाण्यासारखं पातळ नको. मात्र अगदी घट्टदेखील नको. तव्यावर टाकल्यावर ते पसरवता आलं पाहिजे. मात्र, तव्यावर ओतताच ते पातळ वरणासारखं तवाभर धावायला नको. माझ्या एका छोटय़ा मित्राला शिकवताना मी त्याला या मिश्रणाकरता एक गंमत सांगितली होती. तीच तुम्हाला सांगतो. हे मिश्रण इमारतीच्या किंवा पुलांच्या बांधकामामध्ये वापरतात तशा पातळ सिमेंटसारखं हवं. ओतता यायला हवं, पण पाणीदार नको!

आता घरच्या मोठय़ांना सोबत घ्यायला विसरू नका. कारण यापुढे तापल्या तव्याशी काम करायचं आहे. चांगल्या तापल्या तव्यावर चमच्याने किंवा अर्धा कापलेला कांदा तेलामध्ये बुडवून तो तव्यावर फिरवून अगदी थोडं तेल पसरून घ्या. हा कांदा कसा वापरायचा? त्यामध्ये एक चमचा किंवा सुरी खुपसून तो सहज तेलामध्ये किंवा तव्यावर फिरवता येतो. तवा नॉनस्टिक असेल तर तेलाचा प्रश्नच नाही. आता तापल्या तव्यावर डावाच्या किंवा वाटीच्या मदतीने उत्तप्पम्चं मिश्रण टाका. हलक्या हाताने ते पसरा. हा उत्तप्पम् जरा जाडसरच असतो बरं का. डोशासारखा कागदी, पातळ, कुरकुरीत नसतो. आता तव्यावर झाकण ठेवून आच मध्यम करा. वाफेवर उत्तप्पम् शिजू द्या. साधारण अर्ध्या मिनिटात तो शिजेल. झाकण काढल्यावर तो वरून कोरडा दिसेल आणि काही सेकंदातच चारी बाजूंनी कडा सुटतील. आता हलकेच हा उत्तप्पम् तव्यावर उलटा आणि वरची बाजू खरपूस भाजा. आता आच वाढवलीत तरी चालेल, म्हणजे पुढच्या उत्तप्पम्पर्यंत तवा पुन्हा चांगला तापेल. काही सेकंदातच हा तव्यावरून पानात पडायला तयार असेल. आणि चट्टामट्टा व्हायलाही फार वेळ लागणार नाही.

या उत्तप्पम्ची खासियत म्हणजे यात किसलेलं गाजर, बीट, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, अर्धबोबडे केलेले मटार, उकडलेल्या बटाटय़ाचे तुकडे किंवा बारीक चिरलेल्या पालेभाज्याही घालता येतात. मी मेथी, पालक तर वापरला आहेच; पण बारीक चिरलेला लाल माठदेखील वापरला आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या वापरून याची लज्जत वाढवता येते. एकदा मी या मिश्रणामध्ये हातानेच चुरून पनीर घातलं होतं. आणि काय छान चव लागली होती राव! मला कधी आवडत असेल तेव्हा मी उत्तप्पम्च्या मिश्रणामध्ये हळद आणि चिमूटभर हिंगही घालतो. त्याने स्वाद उत्तम होतोच, शिवाय रंगदेखील छान पिवळाधम्मक होतो.

मला ही पाककृती आणि पदार्थ एका खास कारणाकरता आवडतो. आपल्याला आपल्या आवडीनिवडीप्रमाणे हवं तसं या पाककृतीशी मनमुराद खेळता येतं. प्रयोग करता येतात. या रवा उत्तप्पम्ला अगदी सहज आपलंसं करता येतं. तुम्हीही रवा उत्तप्पम् आपलासा करून पहा. मला वाचायला आवडेल तुमच्या प्रयोगांबद्दल!

– श्रीपाद

contact@ascharya.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2018 12:42 am

Web Title: rava uttapam recipe
Next Stories
1 वेगळेपण.. दोन नववर्षांमधलं!
2 मी? किंवा मी..?
3 डोकॅलिटी
Just Now!
X