कुनिदेशातल्या कथा, शिंगवाला उंदीर, कापसाची म्हातारी
 ‘कुनिदेशातल्या कथा’ हे पुस्तक उत्तर ध्रुवाजवळ असणाऱ्या कुनिदेशाची सफर घडवते. त्यात कुनिदेशातली भाषा, तिथला कुन्नीराजा, हिमपऱ्या, सोनपरी यांच्याशी आपली ओळख होते.  हे कुनी लोक म्हणे, आईला lok02म्हणतात ‘किकी.’ आणि बाबांना म्हणतात ‘तोतो’.. अशा या काल्पनिक, तरीही गमतीदार गोष्टींनी कथांमध्ये रंगत आणली आहे. चिंगू आणि पिंगू हे चतुर भाऊ-बहीण जातात शहराची सफर करायला. तर हुशार होण्यासाठी वाघोबा जातो माणसांच्या शाळेत आणि घाबरट शिंगवाल्या उंदीरमामाला खारुताई व मनीमाऊ  धीट बनवतात, अशा धमाल गोष्टी रंगीत चित्रांसह छोटय़ा दोस्तांना वाचायला मिळणार आहेत ‘शिंगवाला उंदीर’ या पुस्तकात. शिवाय कापसाची म्हातारी उडत उडत दुसऱ्या गावात जाते, तिला भेटणाऱ्या अनोख्या दोस्तांची कथा आहे ‘कापसाची म्हातारी’ या पुस्तकात. पाण्याचा थेंब आणि रुसलेला इंद्रधनु-धनुकडा यांची गोष्टही गमतीदार आहे. ऋजुता घाटेची बोलकी चित्रे पुस्तकाची शोभा वाढवतात.
लेखक- स्वप्नाली मठकर- मनोविकास प्रकाशन

छोटय़ांसाठी मोठय़ा गोष्टी
‘सीतेचं सौंदर्य’, ‘जय-पराजय’, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशा एकाहून एक सरस अशा तब्बल शंभर कथांचा खजिना या पुस्तकात दडला आहे. हरिवंशराय बच्चन, शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल, टॉलस्टॉय, रँग्लर रघुनाथ परांजपे या महान व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील बोधप्रद कथाही रंजक आहेत. काही पौराणिक, संस्कारक्षम तर काही धाडसी अशा बहुढंगी कथांमुळे पुस्तक परिपूर्ण झाले असून बालदोस्तांना नक्कीच आवडेल असे आहे.
लेखक- वर्षां गजेंद्रगडकर- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे</strong>

रोबोटची दुनिया
यंत्रमानव अर्थात रोबोट हे अनेक चित्रपटांमधून आपण पाहतो. मात्र त्यांच्या निर्मितीमागे दोन हजार वर्षांपूर्वीची तपश्चर्या आहे. यासाठी कुणी प्रयत्न केले, सध्या या क्षेत्रात कोणते नवीन संशोधन सुरू आहे? याची तपशीलवार नोंद असणारे माहितीपर पुस्तक म्हणजे ‘रोबोटची दुनिया’. भविष्यात स्पर्शज्ञान असणारे वा स्वतंत्र बुद्धी असणारे रोबोटही मानवजातीच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती यात आहे.
लेखक- पुंडलिक गवांदे- मंजुल प्रकाशन

अशा लढल्या रणरागिणी
दिल्लीच्या तख्तावर बसणारी करारी रझिया सुलताना, चंदेलच्या रजपूत घराण्यातली व पुढे गोंडवनची महाराणी झालेल्या राणी दुर्गावतीची युद्धसमयी मुघलांना धूळ चारणारी व्यूहरचना, तसेच विजापूरची राणी चाँदबीबी हिने अहमदनगरची राजगादी टिकवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत मुघलांशी दोन हात करत गाजवलेल्या पराक्रमाच्या कथांमधून या धाडसी रणरागिणींचे दर्शन घडते. कित्तूरची राणी चेन्नम्मा आणि शत्रूशी लढताना रणांगणावर वीरमरण आलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्फूíतदायी कथा या पुस्तकात आहेत. लहानग्यांना या कथा प्रेरणादायी ठरतील.
लेखक- सुनील अंबिके, मंजुल प्रकाशन

भूताई लोटणं/ बेअर्ड काका
खोडकर टिल्लूला कार्टुन पाहण्यापासून रोखण्यासाठी मम्मी आणि टप्पू यांनी काय केले त्याची सुरस कथा ‘बेअर्ड काका’मध्ये आहे. तर टिल्लूचे प्राणिमित्र आणि जंगल सफारीतल्या सुरस कथा ‘भुताई लोटण’मध्ये आहेत.
लेखक- सुरेश वांदिले- कनक बुक्स

खारुताई आणि सावलीबाई, झाडआजोबा
बालदोस्तांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ससोबा, सुरवंटराव, बदकपिल्लू, फुलपाखरू, खारुताई यांच्यावरील कवितांचा संग्रह म्हणजे ही पुस्तकं. ऊन पडलं कडक कडक, चंद्र चांदण्यांची आभाळाची पाटी, घरात लागली मुंग्यांची रांग अशी अनेक सोपी गाणी यात आहेत. तर झाडआजोबा, कैरीबाई, फूलबाळ या कवितांमधून निसर्गातली नवलाई टिपली आहे.
लेखक- संगीता बर्वे- दिलीपराज प्रकाशन

गाणी पाखरांची, लालमपऱ्या आणि संगणेश
कोतवाल, टिटवी, बुलबुल अशा अनेक पक्ष्यांवर केलेल्या कवितांचा खजिना म्हणजे ‘गाणी पाखरांची.’ ‘अरे अरे मोरा थाट तुझा भारी, पावसात नाचताना काय दिसे स्वारी’, ‘मधुपक्षी इवला इवला मध चोरतसे फुलांतला’ अशा अनेक काव्यपंक्ती बालदोस्तांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
लेखक- शोभा बडवे- दिलीपराज प्रकाशन

गप्पांशी गप्पा
गप्पा मारणे, गोष्टी ऐकणे हे बालमनाचे सहजहट्ट असतात. त्यातूनच देवबाप्पाशी गप्पा मारल्या तर.. हीच भन्नाट कल्पना घेऊन बाप्पा कुठे राहतो, त्याचे विसर्जन केल्यावर त्याच्या घरी कसा जातो.. अशा अनेक रंजक माहितीची गुंफण कवितेत करत हा संग्रह तयार झाला आहे. ‘काढावं वाटतं दुकानाचं नेटवर्क एक, गणपतीच्या दारी शेंदूर नि चंदनाचे लेप’ अशा ओळींनी पानोपानी रंगत आणली आहे.
नयना राजे- मधुराज पब्लिकेशन्स

कॅप्टन कावेरी मंगळावर!
कॅप्टन कावेरी गंगाधर सातपुते म्हणजे एक गोड मुलगी. अत्यंत धाडसी, अभ्यासू आणि जिज्ञासू. तिच्या डोक्यात सतत प्रश्नांचं चक्र सुरू असतं. नाना प्रश्न विचारून ती आई-बाबा, शिक्षकांना भंडावून सोडते. पण सर्वाना तिच्या कुतूहलपूर्वक प्रश्नांची गंमत वाटते. कावेरीच्या मनात अनेक शंका येतात. मग त्या शंकांचं निरसन करण्यासाठी ती पूर्णपणे झपाटते. पुस्तकं वाचते. संदर्भ शोधते. तिच्यातली ही अभ्यासू वृत्ती आणि श्रद्धेने व झपाटल्यागत काम करण्याच्या वृत्तीमुळे ती तिचे मित्र आकाश आणि पवन यांच्या मदतीने यान बनवते आणि ती तिघं थेट जातात मंगळ ग्रहावर. तिथे ती कशी पोहोचतात? मंगळावरील ऑलिम्पस नावाची व्यक्ती त्यांना कशी मदत करते, हे या कथेत उलगडत जातं. ही कथा पुढे सरकताना मंगळ ग्रहावरील वातावरण, पृथ्वीवासीयांची मंगळावर जाण्यासाठी चाललेली धडपड या सर्वाची माहिती उलगडत जाते. मंगळ ग्रहावरील  लोकांना काय वाटतं? त्यांना पृथ्वीवरचा माणूस कसा भासतो? त्याच्याविषयी ते कसा विचार करतात? अशा अनेक गोष्टींचा उलगडा ही कथा करते.
 लेखक- बबन मिंडे- अक्षरसारस्वत प्रकाशन