22 April 2019

News Flash

विज्ञानवेध : रोबो मित्र

तुम्हा मुलांसाठी म्हणून खास रोबो मित्र आता मिळायला लागला आहे. तो तुमच्याबरोबर ल्युडो खेळू शकेल

मेघश्री दळवी

रोबो म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कारखान्यात धडाधड काम करणारी यांत्रिक मूर्ती. पण हेच रोबो आता आपण माणसांना मदत करायला पुढे येत आहेत. या रूपात ते आपली काळजी घेतील आणि आपल्याला सोबत करतील.

तुम्हा मुलांसाठी म्हणून खास रोबो मित्र आता मिळायला लागला आहे. तो तुमच्याबरोबर ल्युडो खेळू शकेल, चित्रकोडी सोडवू शकेल, झालंच तर गोष्टी सांगेल, थोडाफार डान्सही करेल. हो, मात्र आई-बाबा घरी नसताना अभ्यासाला बुट्टी मारण्याचा विचार असेल तर सोडा तो. कारण घरातल्या या रोबोचा एक डोळा तुमच्या अभ्यासाकडे असेल!

पण नाराज नका होऊ. तो तितक्याच तत्परतेने तुम्हाला अभ्यासात मदत करायला येईल. एखादा विषय अडला तर समजावून सांगेल. मित्राबरोबर बसून गप्पा मारत मारत अभ्यास करायला तुमची ना नसते, हो ना? फक्त मित्राच्या जागी हा रोबो मित्र!

तुम्ही शाळेत जाता आणि आई-बाबा ऑफिसला. तेव्हा हाच मित्र तुमच्या आजी-आजोबांची काळजी घेईल. त्यांना औषध घेण्याची आठवण करेल. त्यांना काही त्रास झाला तर इमर्जन्सी अलार्म देईल. शिवाय, तुमच्या आई-बाबांना मधूनमधून घरची हालहवाल सांगेल; म्हणजे तेही निर्धास्तपणे आपल्या कामाकडे लक्ष देऊ  शकतील.

अलीकडे रोबोटिक्समधलं बरंचसं संशोधन हे रोबो माणसाला कसे मदत करू शकतील, याबाबत होत आहे. विशेष करून मुलं आणि वयस्कर माणसं यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणीतरी सतत सोबत असणं चांगलं असतं. रोबो न चुकता, न कंटाळता, न थकता हे काम करू शकतात. घरातल्या प्रत्येकाला ओळखून त्याप्रमाणे जेवण आणि औषध देणे, त्यांना छोटय़ामोठय़ा गोष्टींमध्ये मदत करणे, उठताबसता आधार देणे, त्यांच्याबरोबर बोलत त्यांना प्रसन्न ठेवणे अशी कामं या रोबोंना अगदी सहज जमतात.

तेव्हा लवकरच आपल्या घरात असे

रोबो मित्र दिसायला लागतील आणि आपणही त्यांच्याबरोबर मस्त मजा

करत असू!

meghashri@gmail.com

First Published on November 25, 2018 1:01 am

Web Title: robo friends