26 September 2020

News Flash

खेळायन : रुबिक क्यूब

दोन मराठी पुस्तकं वाचली की एक हिंदी आणि एक इंग्लिश पुस्तक वाचायचं असा आईने घालून दिलेला नियम होता.

उन्हाळ्याची सुट्टी सुरूझाल्यावर मनस्वीचं सुरुवातीला उशिरापर्यंत झोपणं, आरामात टी.व्ही. बघणं, मित्र-मैत्रिणींबरोबर खेळणं हे सगळं करून झालं. मग उन्हाळी शिबिरात जाऊन झालं, ट्रीपला जाऊन झालं. तरीही सुट्टी शिल्लक होतीच! आता नवीन काय करायचं, हा प्रश्न तिला आणि अर्थातच आई-बाबांनाही पडलेला होता. त्यात आजी-आजोबासुद्धा नेमके आत्ताच अमेरिकेला आत्याकडे गेले होते. त्यामुळे मनस्वी दिवसभर घरीही एकटीच असायची. आजीचा भजनाचा ग्रुप, आजोबांचा सीनियर सिटीझन ग्रुप- त्यांच्या त्याबद्दलच्या गप्पाटप्पा हे सगळंच ती मिस करत होती. मग बाबाने तिला एक मस्त खेळणं आणून दिला- ‘रुबिक क्यूब’. बाबाने त्यातले रंगीबेरंगी चौकोन फिरवून त्याच्यावरच्या रंगाचं कॉम्बिनेशनच पूर्ण बदलून टाकलं आणि त्यातले तिला हव्या त्या रंगाचे चौकोन एकाच पृष्ठभागावर आणायला सांगितले. मनस्वीने खूप प्रयत्न केला, पण तिला काही ते जमेना! दिसायला सोपं दिसलं तरी रुबिक क्यूब सोडवणं हे अवघड काम आहे हे तिच्या लक्षात आलं आणि तिने तो रुबिक क्यूब खेळण्यांच्या खणात आत कुठेतरी ठेवून दिला! आता सुट्टीत काय करायचं, हा पुन्हा पडलेला प्रश्न सोडवणं म्हणजे आई-बाबांना रुबिक क्यूब सोडवण्या इतकंच कठीण वाटायला लागलं!
मग आईने तिला भरपूर पुस्तकं आणून दिली. दोन मराठी पुस्तकं वाचली की एक हिंदी आणि एक इंग्लिश पुस्तक वाचायचं असा आईने घालून दिलेला नियम होता. त्यामुळे मनस्वीच्या तिन्ही भाषा चांगल्या झाल्या होत्या. आईने आणलेल्या पुस्तकांत डॉ. जयंत नारळीकरांचं ‘प्रेषित’ हे पुस्तक होतं. ती विज्ञान कादंबरी वाचून तर मनस्वी भारावून गेली होतीच; पण गोष्टीतला आलोक तीन वर्षांचा असतानाही रुबिक क्यूब सोडवू शकतो आणि आपण मात्र एकदा जमलं नाही तर रुबिक क्यूब खणात लांब कुठेतरी ठेवून देतो, याचं मनस्वीला वाईट वाटलं. काहीही करून या सुट्टीत रुबिक क्यूब सोडवायला शिकायचं असा तिने निश्चयच केला. तिचा बाबा तिला नेहमी म्हणतो, की कुठल्याही गोष्टीचा कधीही कंटाळा येत असेल किंवा भीती वाटत असेल तर त्या गोष्टी विषयीची जास्तीत जास्त माहिती जमवायची. म्हणजे त्या गोष्टीची, त्या विषयाची ओळख होते आणि मग कंटाळा किंवा भीती पळून जाते! मनस्वीने हीच गोष्ट लक्षात घेऊन रुबिक क्यूबविषयी माहिती जमा करायला सुरुवात केली आणि तिला समजलं की १९७४ साली रुबिक क्यूबची निर्मिती झाली. हंगेरीतल्या बुडापेस्ट इथल्या एर्नो रुबिक ((Erno Rubik) नावाच्या एका तरुण प्राध्यापकाने या क्यूबचा शोध लावला. आर्किटेक्चरच्या या प्राध्यापकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेहमी नवनवीन पद्धती वापरायची आवड होती. त्यातूनच या क्यूबची निर्मिती झाली.
हा क्यूब इतका लोकप्रिय होईल याची प्रा. रुबिक यांना स्वत:लाही कल्पना नव्हती. सुरुवातीला हंगेरीतल्या एका कंपनीने या क्यूबचं मॅन्युफ्रॅक्चरिंग केलं. तेव्हा त्याचं नाव ‘मॅजिक क्यूब’ असं ठेवलं गेलं होतं. पण मग त्याला ‘रुबिक क्यूब’ हे नाव कसं मिळालं? आणि असं काय घडलं, की ज्यामुळे ८० च्या दशकात रुबिक क्यूब घराघरांत पोचला? या प्रश्नांची उत्तरं मनस्वीनं शोधली तेव्हा तिला माहिती मिळाली- सत्तरच्या दशकात हंगेरीत आयात-निर्यातीवर खूप कडक र्निबध होते. त्यामुळे ‘मॅजिक क्यूब’ हंगेरीच्या बाहेर घेऊन जाणं हे कठीण काम होतं. पण त्यातही एक आशेचा किरण दिसला. काही गणितज्ञांच्या प्रयत्नांमुळे ‘मॅजिक क्यूब’ हंगेरी बाहेर जाऊ शकला. आणखी एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे एका व्यावसायिकाने १९७९ मध्ये तो न्यूरेम्बर्ग टॉय फेअरमध्ये नेला. तिथून टॉम क्रीमर (Tom Kremer) या खेळणी तज्ज्ञाच्या प्रयत्नांमुळे आयडियल टॉय कंपनीने ‘मॅजिक क्यूब’चं मार्केटिंग करायचं मान्य केलं. तेव्हा ‘मॅजिक क्यूब’चं नाव बदलून ‘रुबिक क्यूब’ केलं गेलं आणि हे खेळणं अख्ख्या जगात लोकप्रिय झालं. इतकंच नाही तर अंतराळातही गेलं! कमीत कमी वेळात रुबिक क्यूब सोडवण्याच्या स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या, व्हिडीओज, हॉलिवूड मूव्हीज, टी.व्ही. शोज सगळीकडे रुबिक क्यूब झळकायला लागला. रुबिक क्यूबची माहिती शोधता शोधता मनस्वीला प्रा. एर्नो रुबिक यांचं एक वाक्य वाचायला मिळालं. ”If you are curious, you’ll find the puzzles around you. If you are determined, you will solve them.’ हे वाचल्यावर तर तिने रुबिक क्यूब हातात घेतला आणि तासाभराच्या अथक प्रयत्नांती तो सोडवला. मग तिला त्यातली गंमत कळली आणि आता तर ती टायमर लावून रुबिक क्यूब सोडवते. मित्रमैत्रिणी जमून रुबिक क्यूब सोडवायच्या स्पर्धासुद्धा घेतात. मनस्वीचे आई-बाबा तिची जिद्द आणि चिकाटी यावर खूश आहेत. शिवाय ‘सुट्टीत काय करायचं’ हा प्रश्न सध्यातरी सुटलेला आहे!
अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 1:21 am

Web Title: rubik cube
Next Stories
1 ऑफ बिट
2 डोकॅलिटी
3 मुंगीताई
Just Now!
X