22 November 2019

News Flash

ऑफ बिट : मलाच समजू दे

शाळा-कॉलेजमध्ये कोणीतरी शिकवतो आणि आपण शिकतो, हा सर्वाचाच दृढ समज असतो.

शाळा-कॉलेजमध्ये कोणीतरी शिकवतो आणि आपण शिकतो, हा सर्वाचाच दृढ समज असतो. पण हा समज पूर्णत: खरा नाही. अनेकदा आपण स्वत:च आपले शिक्षक असतो. काही वेळा शाळेत एखादा गट करतात त्यावेळी कोणी लीडर होतो, कोणी आयोजक होतो, कोणी भांडणे करतो, तर कोणी मिटवतो, कोण दादागिरी करतो तर कोण इतरांना सांभाळून घेतो.. एखादा उत्साहाने वावरत असतो तर एखादा काहीच करत नाही. या सगळ्या प्रकारच्या मुलांच्या निरीक्षणातून आपल्या चांगल्या वागण्याबाबतचे शिक्षण नकळतच घडत असते. सहलीसाठी गेल्यावर जबाबदारीने वागणे स्वत:ची आणि स्वत:च्या वस्तूंची काळजी घेणे, सर्वाबरोबर हसत-खेळत वावरणे, खाऊ वाटून खाणे, इतरांशी योग्य रीतीने वागणे, बोलणे याची माहिती होतेच, पण गाडीबाहेर खाऊसाठी याचना करणाऱ्या आपल्या वयाच्या मुलाकडे पाहून आपल्याला मिळणाऱ्या अन्नाची किंमतही आपल्याला समजते. निवासी शिबिरे ठरावीक दिनक्रमाचे महत्त्व, वैयक्तिक, सामाजिक स्वच्छतेचे भान, वस्तू, भावना यांची देवाणघेवाण, मित्रत्व, आपुलकी यांची गरज, आई-वडिलांचे आपल्या जीवनातील महत्त्व आपल्या लक्षात आणून देतात. शाळेतील क्रीडा सप्ताह, फनफेअर यातून कामातून मिळणाऱ्या आनंदाची कमाई होतेच. पण बरोबरीने

जीतहार किंवा नफातोटा स्वीकारण्याची

वृत्ती आपोआपच निर्माण होते. काही वेळा हरण्यातही मजा असते हे आपला संघ हरूनही जेव्हा अनेक वैयक्तिक बक्षिसे आपल्या अगर आपल्या मित्र-मैत्रिणींच्या खाती जमा होतात तेव्हा पटते. इतरांच्या यशातही आपला आनंद आपण पाहू शकतो हे अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यावर आपल्याला जाणवते. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन या दिवशी राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण, आपला तिरंगा फडकताना पाहून भरून येणारा उर हे सारे त्या कार्यक्रमांमध्ये स्वत: आनंदाने सहभागी झाल्याशिवाय समजणे खरेच अशक्य. त्यामुळे यापुढे तरी आपणहून अशा सर्व कार्यक्रमांना हजेरी लावणार ना. कोणतीही टाळाटाळ न करता आणि मलाच समजू दे ना, असे म्हणणार ना कोणीही शिकवण्याची वाट न पाहता.

joshimeghana.23@gmail.com

First Published on September 25, 2016 12:49 am

Web Title: school college
Just Now!
X