04 April 2020

News Flash

गजाली विज्ञानाच्या : शितावरून भाताची परीक्षा

शाळेत जात असताना तुषारने खिशातून डबी काढून श्रीला दाखवली. त्यात एक किडा होता

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदा हरम

शाळेत जात असताना तुषारने खिशातून डबी काढून श्रीला दाखवली. त्यात एक किडा होता. श्री म्हणाला, ‘‘हा तर लेडीबर्ड बीटल आहे.’’

तुषार म्हाणला, ‘‘हो, मला माहिती आहे. आज आपल्या सायन्स टीचरना दाखवेन म्हणतो.’’

श्री : इतका का रे इंटरेस्ट तुला?

तुषार : अरे, मागच्या आठवडय़ात आमच्या सोसायटीत एका शास्त्रज्ञाने बीटल्सचं प्रदर्शन भरवलं होतं. मला खूप आवडलं. दोघे बोलत बोलत ते शाळेत पोहोचले. पहिला तास सायन्सचा होता. निधीबाई वर्गात येताच तुषारने तो किडा बाईंच्या हाती दिला. ‘‘माहिती सांगाल का?’’ म्हणून त्याने विचारणा केली. बाई सर्व वर्गाला उद्देशून म्हणाल्या, ‘‘या निमित्ताने आज मी तुम्हाला वेगळी माहिती सांगणार आहे.’’ डबी दाखवत त्या म्हणाल्या, ‘‘हा आहे लेडी बर्ड बीटल किंवा लेडीबग.’’ ती डबी वर्गात फिरवायला सांगितली. त्यापुढे म्हणाल्या, ‘‘हा डबीतला लेडीबग गडद लाल रंगाचा आहे. याशिवाय तो पिवळा वा केशरी रंगाचाही असतो. पंखांवर काळे ठिपके असतात, पण काही वेळा ठिपक्यांऐवजी पट्टेही असतात. त्यांचे पाय, डोकं आणि स्पृशा काळ्या असतात. यांचं वैशिष्टय़ असं की यांचे ठळक, गडद रंग त्यांच्या भक्षकांना सांगतात की, आमच्यावर हल्ला करू नका.’’

श्री : म्हणजे नेमकं काय? रंगाचा काय संबंध बाई?

बाई : छान प्रश्न विचारलास श्री! ‘गडद रंग आणि वाईट चव’ असं समीकरण त्यांना भक्षकाच्या मनावर बिंबवायचं असतं.

समीर : पण बाई, नवीन भक्षकांना किंवा प्रथमच ते हा किडा पकडत असतील तर त्यांना कसं कळणार?

बाई : अगदी बरोबर! एखाद्या हल्ल्यातून त्यांना हे समजतं. मग पुढच्या वेळी ते अशा किडय़ाच्या वाटेलाही जात नाहीत.

समीर : म्हणजे शितावरून भाताची परीक्षा असेच ना?

बाई : १००% बरोबर! जीवसृष्टीत काही सजीव दिसायलाच असे काही असतात की ते जणू विषारीपणाची, वाईट चवीची किंवा ते धोकादायक आहेत अशा तऱ्हेची सूचना भक्षकाला देत असतात. या प्रकाराला ‘अपसूचकता’ असे संबोधतात.

तुषार : बाई, लाल रंगाचा बेडूक याचेच उदाहरण ना?

बाई : काही विशिष्ट जातीचे बेडूक भडक रंगाचे म्हणजे पिवळा, लाल, निळ्या रंगाचे असतात. हे विषारी असतात. जितका भडकपणा अधिक तितकाच विषारीपणा अधिक. काळा आणि पांढरा रंग ही अपसूचकतेच्या बाबतीत परिणामकारक असतो.

श्री : याचं कोणतं उदाहरण बाई?

बाई : हनी बॅजर, चांदी अस्वलही म्हणतात याला. यांच्या अंगावर रुंद काळे आणि पांढरे पट्टे असतात. हा प्राणी निमुळता असून पाठीच्या भागात प्रचंड रुंद असतो. त्याची त्वचा लक्षणीयरीत्या सलसर असल्यामुळे ती सहज वळू शकते. किंवा त्याला पीळ पडू शकतो. मारामारीला उपयुक्त अशी मानेवरची त्वचा ६ मिमी जाडीची असते. डोकं अगदी छोटं आणि चपटं असतं. डोळे लहान आणि कान म्हणजे त्वचेवर एक खाच असते. मारामारीमध्ये इजा कमी व्हावी, याकरिता हे सारं!

समीर : बाई, मी टीव्हीवरच्या कार्यक्रमात ऐकलं होतं की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात निर्भय प्राणी म्हणून याची गणना होते.

बाई : अगदी बरोब्बर! त्यांना मोठे किंवा अणकुचीदार दात नसले, तरी पंजे अगदी मजबूत असतात. तसेच, चढण्याकरिता किंवा खणण्याकरिता उपयोगी पडतील अशी मजबूत नखं असतात. सलसर, जाड त्वचेमुळे चावे, नखोरे यापासून संरक्षण होतं.

श्री : पण बाई, काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांचा काय उपयोग?

बाई : शरीरावरील काळे-पांढरे पट्टे तो प्राणी हल्लेखोर असल्याचं भक्षकाला सुचवतो. हेच तर अपसूचकता दर्शविण्याचं ठळक लक्षण आहे. चित्ता, सिंहासारख्या प्राण्यांनी हल्ला केला तर हनी बॅजर त्यांचा चांगलाच प्रतिकार करतो. हनी बॅजरची शिकार झाल्याचं सहसा ऐकू येत नाही.

तुषार : बाई, त्यांच्या नावात असलेल्या ‘हनी’चा काही संबंध आहे का?

बाई : आहे तर, तो नेहमी मधमाश्यांची पोवळी शोधत असतो. कारण त्याला मध प्रचंड आवडतो. चला, आज आता इथेच थांबू. या सर्व माहितीकरिता समीरने जी म्हण सांगितली ना. त्याच अर्थाची दुसरी म्हण शोधा बरं!

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 1:52 am

Web Title: science balmaifal article abn 97
Next Stories
1 ज्योतिर्मय दिवाळी
2 जगा आणि जगू द्या
3 गजाली विज्ञानाच्या : विनाश काले, विपरीत बुद्धी
Just Now!
X