पितळी अथवा तांब्याच्या भांडय़ातील पाणी पिण्यासाठी वापरावे, असे आपले वाडवडील सांगत आले आहेत. त्यामागचे शैक्षणिक तत्त्व त्यांना कदाचित माहीतही नसेल, पण असे पाणी अधिक स्वच्छ व आरोग्यवर्धक असते, असे आता शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झाले आहे.
विकसनशील व अप्रगत देशांत, जिथे पिण्याचे स्वच्छ पाणी अद्यापही उपलब्ध नाही, तिथे पाणी साठविण्यासाठी मातीची अथवा प्लास्टिकची भांडी वापरली जातात. पण त्यापेक्षा अशा देशांत पितळेची भांडी लोकांना देता आली तर अनेक जलजन्य रोगांपासून त्यांचे रक्षण होऊ शकेल. अशा देशांमधून प्रतिवर्षी सुमारे २० लाख मुले जलजन्य रोगांमुळे प्राणास मुकतात.
भारताजवळच्या या प्राचीन ज्ञानाची वैज्ञानिक सिद्धता देण्याचे काम इंग्लंडमधील न्यूकॅसलच्या नॉर्थ अंब्रिया विद्यापीठातील एका वैज्ञानिक चमूने केले आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉब किड यांच्याकडे या चमूचे नेतृत्व आहे.
या वैज्ञानिकांनी पाण्याचे काही नमुने प्लास्टिक, पितळी व मातीच्या भांडय़ात ठेवले. त्यामध्ये काही विशिष्ट जिवाणूंना सोडण्यात आले. या सर्व भांडय़ातील जिवंत जिवाणूंची पाहणी ६.२४ आणि ४८ तासांनंतर करण्यात आली. त्यात असे आढळले की, पितळी भांडय़ातील जिवाणूंची संख्या वेगाने कमी होऊन ४८ तासांनंतर ती जवळजवळ लक्षातही येणार नाही एवढी कमी झाली. माती अथवा प्लास्टिकच्या भांडय़ांमध्ये अशी घट होताना आढळली नाही.
या वैज्ञानिकांच्या मते, ‘पितळ’ या मिश्रधातूमध्ये असणाऱ्या तांब्याच्या परिणामामुळे जिवाणूंचे हे प्रमाण घटते. कारण पाणी ठेवल्यानंतर पितळेमधील तांब्याचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात. हे तांबे जैव प्रक्रियेला अडथळा निर्माण करते. पेशींचे पापुद्रे व पेशीद्रव्यांवर ते परिणाम करते व त्यामुळे जिवाणूंच्या दृष्टीने ते कर्दनकाळ ठरते. परिणामी पितळी भांडय़ात ठेवलेले पाणी स्वच्छ व आरोग्यवर्धक बनते. त्यामुळे जिथे पाणी फारसे स्वच्छ व शुद्ध नाही, तिथे किमान ते वापरण्यापूर्वी पितळेच्या भांडय़ात साठवण्यास सुरुवात करावी. आरोग्यासाठी ते लाभदायक ठरेल.

चोख सोन्यापासून दागिने का बनवत नाहीत?
जगातील सोन्याची सर्वात मोठी उलाढाल लंडनमधील मार्केटमध्ये होते. मात्र सर्वाधिक सोने वापरले जाते ते भारतातच. भारतीयांना विशेषत: महिलांना सोन्याचे जबरदस्त वेड. कोणताही आनंदी प्रसंग असो, नटण्यासाठी, खरेदीसाठी येथील महिला पहिली पसंती देतात ती सोन्यालाच. पण कोणताही सोन्याचा दागिना घ्या, तो शंभर टक्के चोख कधीच नसतो. कारण सोने जरी जड असले तरी तो मृदू धातू आहे. त्यामुळे १०० टक्के चोख सोन्यापासून दागिना बनवल्यास त्याचा आकार सहज दाबल्यानेही बदलून जातो. त्यामुळे दागिने बनविताना त्यात थोडय़ा प्रमाणात तरी तांबे मिसळावेच लागते.
सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात. २४ कॅरेट सोने म्हणजे शंभर टक्केचोख सोने. मात्र, सोन्याचे दागिने सहज वाकू नयेत, ते अधिक कठीण बनावेत, यासाठी त्यात थोडय़ा प्रमाणात तांबे मिसळतात. एक कॅरेट म्हणजे १००/२४ टक्के. म्हणून २२ कॅरेट सोने म्हणजे ९१.६७ टक्केशुद्ध सोने. १८ कॅरेट म्हणजे ७५ टक्के शुद्ध सोने व उर्वरित तांबे.