13 August 2020

News Flash

कार्टूनगाथा : कवडीचुंबक म्हातारा!

डिस्नेने या परिवाराची संपूर्ण कथा ‘डकटेल्स’ या नावाने १९८७ मध्ये टीव्हीवर आणली

(संग्रहित छायाचित्र)

श्रीनिवास बाळकृष्णन

जगातील सर्वात श्रीमंत माणसांची नावं आपण इथून तिथून ऐकलेली असतीलच. बिल गेट्स, बफे, जॅक मा, रिचर्ड ब्रॅन्सन.. अशी अनेक. त्यात आपले अंबानी, बजाज, हिंदुजाही! तुम्हाला सांगतो, या सर्व अफवा आहेत. श्रीमंतांबाबतची अर्धवट, अपूर्ण किंवा धादांत खोटी माहिती शिक्षकांनी, पालकांनी, काका-मामांनी आजवर आपल्याला दिली असेल. आज मी तुम्हाला एकदम खरी माहिती देणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत कोण? त्यांच्याकडचा पैसा काळा की गोरा? कसे मिळवले इतके पैसे? काय करतो त्या पशांचं? वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशी न करता तुम्हाला या लेखातूनच मिळतील.

वर नावे घेतलेल्या श्रीमंत माणसांची श्रीमंती एकत्र केली तरी कमी भरेल इतका श्रीमंत अवलिया कार्टून जगतात होऊन गेलाय. तो आहे दि ग्रेट ‘स्क्रुज मॅकडक.’ डकबर्ग या शहरात राहणारा! आपला डोनाल्ड डक होता ना, त्याचा दूरचा काका! डोनाल्डला अनेक कार्टूनमध्ये ज्या तीन बदमाश लुई, डुई, हुई सोबत पाहिले असेल त्यांचाही हा लाड पुरवणारा काका.. अंकल स्क्रुज!

त्याचे देशोदेशी स्वत:च्या मालकीचे नफा कमावणारे उद्योग पसरलेत. एका आलिशान राजवाडासदृश बंगल्यात राहणारा, महागडी गाडी, पण तीही एकच. स्वत:चे विमान, जहाज, हेलिकॉप्टर, इत्यादी वापरणारा. सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे याची पैसे साठवण्याची तिजोरी! शहरातील एक सुरक्षित व उंच अख्खी इमारत म्हणजे याची तिजोरी. लोकांना रिसॉर्टमधल्या पाण्यात निवांतपणा करायला आवडतो, तर याला डॉलरने भरलेल्या इमारतीत पोहायला आवडतं. एका डुबकीत याला सर्व पैसे मोजता येतात. कमी झालेला एकही डॉलर याच्या नजरेतून सुटत नाही. आपल्याला स्वप्न भुताची पडतात, तर याला पैसे गायब झाल्याची! म्हणून हा आपल्याला कवडीचुंबक, कंजूष, पसापूजक वाटेल. म्हणजे तो तसा आहेही. पण त्याने हा पसा जाम कष्टाने आणि हुशारीने मिळवला आहे. आधी त्याच्या गोल्डी नावाच्या मैत्रिणीसोबत खाणीतून सोनं शोधलं. मग आलेल्या पैशातून अफाट गुंतवणूक करत तो इथवर पोहोचला. त्याने मिळवलेला पहिला डॉलर किंवा पहिला सोन्याचा तुकडा अजूनही त्यांच्या म्युझिअममध्ये जपून ठेवला आहे. नफा मिळवण्यासाठी नवे तंत्र विकसित करत राहणे हा त्याचा सर्वात आवडता उद्योग. नफा हेच जीवन. म्हणून तो थोडा अरसिकही वाटतो. तिजोरीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही सतत असतेच. त्यामुळे आपल्याला हा चिंताग्रस्त म्हातारा वाटू लागतो. त्याच्या जीवनात रंग भरलेत ते तीन पुतणे व एका वेबीने. त्यांच्यासाठी काय पण! हा कधी कधी पसाही सोडायला तयार होणारा.

इतक्या मोठय़ा बंगल्याचा नोकर एकच. ड्रायव्हर, मदतनीस एकच. कुकही एकच! अत्यंत मोजकी माणसे कामाला. फुकटच्या नातेवाईकांना- चल फूट!

गियरलूज जायरो नावाचा कल्पक व जुगाड स्पेशालिस्ट संशोधक, लॉन्चपॅड म्हणून अपघातात रेकॉर्ड केलेला विमानचालक असा याचा मिनिमम परिवार!

डिस्नेने या परिवाराची संपूर्ण कथा ‘डकटेल्स’ या नावाने १९८७ मध्ये टीव्हीवर आणली. जादूगार चेटकीण मॅजिका, बिगल बॉइज् नावाचे दरोडेखोर, स्क्रोन्ज नावाचा कट्टर प्रतिस्पर्धी या कथा रोमांचक बनवतात. कठीण प्रसंगात लुई, डुई आणि हुईच्या ज्युनिअर उडचक गाइडच्या सल्ल्यानुसार स्वत:ला वाचवतात. अशा वेळी मोठय़ांनी लहानग्यावर दाखवलेला विश्वास आपल्या डोळ्यात पाणी आणतो हो! या कार्टूनचे शीर्षक- गीत खूप गाजले. लोकांना अजूनही तोंडपाठ आहे.. (२७ च्या पाढय़ा-इतकं)

ते पाहूनच तुम्हाला विनोदी साहसकथा पाहण्याची उत्सुकता वाढते. प्रत्येक विषय एक-दोन भागांत संपत असल्याने शॉर्ट अँड स्वीट गोष्टी आपल्याला खिळवून ठेवतात. हे कार्टून १९८०च्या दशकातले असले तरी आजही ताजे वाटते. त्यातले चटकदार संवाद अमेरिकन संस्कृतीतले असल्याने एक प्रकारचे स्वातंत्र्यच प्रत्येक व्यक्तिरेखेला आहे. यात करामती मुले लहान असल्याने काही फरक पडत नाही. सर्व त्यांचे ऐकतात. त्यांना अंकल स्क्रुज किंवा इतर उगाचच ओरडत नसल्याने लहान मुलांना असेच श्रीमंत अंकल आमचेही असावेत असं वाटून जातं.

इतकंच नाही तर, पशाने पसा कसा वाढतो, जगण्यासाठी पैसे किती महत्त्वाचे असतात, आलेल्या पशातून जगणं कसं सुधारायचं? असं कधीच कुठल्याच कार्टूनने, शाळेने, क्लासने न दिलेलं आर्थिक ज्ञान अंकल स्क्रुज अगदी सहजतेने देतात. सर्वस्व गमावल्यावर खचून न जाता पुन्हा ते मिळवण्याची हिंमत हे कार्टून देतं. नैतिकता जपत शत्रूवर कुरघोडी कशी करावी, कुटुंबानं एकत्र कसं राहावं याचं कृतीतून मार्गदर्शन आजोबा म्हणून समस्त मुलांना करतात.

त्यावेळेच्या अमेरिकन आणि आजच्या शहरी भारतीय छोटय़ा कुटुंबातील मुलांना हे नातं जामच आवडलं असणार! म्हणून हे कार्टून अल्पावधीत लोकप्रिय झालं असावं.

२०१७ मध्ये मॅट यंगबर्ग, फ्रान्सिस्को अँगोन्स यांनी डकटेल्सची पुन्हा निर्मिती केली. आजवर अनेक गेम, व्हिडीओ गेम्स, खेळणी, वस्तूंवर यांचा वापर केला आहेच. युटय़ुबवर आजही अनेक एपिसोड आपल्याला पाहता येतात. हे देशोदेशीचे अत्यंत बारकावे टिपत असल्याने भूगोल व इतिहास पक्का करण्यासाठी उत्तम कार्टून आहे. नक्की पाहा!

chitrapatang@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 12:02 am

Web Title: scrooge mcduck balmaifal article cartoon abn 97
Next Stories
1 ज्वलनशील पदार्थाची गंमत
2 गजाली विज्ञानाच्या : आलिया भोगासी, असावे सादर!
3 तू सुखकर्ता..
Just Now!
X