|| मुक्ता चैतन्य

तुम्ही सेल्फी काढता का? अर्थातच काढत असणार. वाढदिवसाला, ट्रिपला गेल्यावर, कधी अभ्यासाला एकत्र भेटल्यावर, खेळायला मित्रमत्रिणींच्या घरी गेल्यावर.. तुम्ही नक्की सेल्फी काढत असणार. सेल्फी काढल्यावर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करता? दोन मिनिटं थांबा आणि विचार करा. सेल्फी काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करता? सेटिंगमध्ये जाता किंवा एखाद्या फोटो अ‍ॅपमध्ये. तिथे जाऊन तुम्हाला हवा तसा फोटो एडिट करता. मला माहीत आहे- तुम्हाला सगळे एडिट अ‍ॅप्स वापरता येतात. तुम्ही तुमचा फोटो अधिक छान करता आणि मग तो व्हॉट्स अ‍ॅपवरून इतरांना पाठवता. बरोबर ना? आता तुम्ही म्हणाल, की आई आणि बाबाही असंच करतात. मग? बरोबर आहे. लहान-मोठे सगळेच असं करतात. पण मोठय़ांना काही गोष्टी माहीत असतात. तुम्ही अजून कोवळ्या वयात आहात. म्हणून काही विषयांची तुम्हाला माहिती करून देणं आवश्यक आहे. तर तुम्ही तुमचा सेल्फी मस्त नीटनेटका करून- म्हणजे स्किन सॉफ्ट करून, त्वचेचा काळेपणा कमी करून, चेहरा आणखीन ब्राइट करून, डोळे ब्राइट करून फोटो सेव्ह केलात खरा; पण असा नीटनेटका केलेला फोटो म्हणजे तुम्ही आहात का? आपले केस, आपल्या त्वचेचा रंग, आपले डोळे, चेहऱ्यावर आलेलं एखाद् दुसरं मुरुम यात लपवण्यासारखं किंवा बदलण्यासारखं काय असतं, सांगा बरं?

सर्वानाच सुंदर दिसावं असं वाटत. ते बरोबरच आहे. पण सौंदर्य म्हणजे काय, याचा विचार कधी केला आहे का? गोरं असणं, नाकी-डोळी छान असणं म्हणजे सुंदर असणं असतं का? काळ्या, सावळ्या, गव्हाळ रंगाची त्वचा असलेले लोक सुंदर नसतात का? तर असं मुळीच नाहीये. निसर्गानं जन्माला येताना आपल्याला जे रूप दिलं आहे ते सुंदरच आहे. आपला रंग, चेहरा, उंची, बांध्याची ठेवण या सगळ्या गोष्टी सुंदरच आहेत. त्यामुळे एखादं अ‍ॅप वापरून कृत्रिमपणे सुंदर दिसण्याचा प्रयत्न कशाला करायचा? आता तुम्ही म्हणाल- आहे तसा फोटो टाकला की बरोबरचे मित्रमत्रिणी टिंगल करतात. नावं ठेवतात. जोक्स मारतात. तुमची अडचण समजू शकते. बरोबरच्या मुलामुलींनी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून तुम्ही हे करता. पण आपण जसे नाही तसं इतरांना दाखवणं, खरंच आनंद देतं का? की टिंगल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना त्यांची चूक दाखवून देणं अधिक शहाणपणाचं आहे? विचार करा!

आपण कसे दिसतो, ज्याला मोठय़ांच्या भाषेत ‘बॉडी इमेज’ म्हणतात, ते कधीही इतरांच्या नजरेतून ठरवायचं नसतं. आज हे तुम्हाला सांगायचं कारण- सेल्फी, सोशल मीडियात तुम्ही स्वत:चे जे काही फोटो टाकता आणि त्यावर लोक ज्या काही प्रतिक्रिया देत असतात, त्यावरून आपण स्वत:विषयी मत बनवायला लागतो. हे आपण मुद्दामून करतो असं नाही, पण सातत्याने सोशल मीडियावरच्या आपल्या फोटोंना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आपण विचार करत राहिलो तर हळूहळू तिथे लोक जे काही सांगतात, बोलतात, नावं ठेवतात, टिंगल करतात, तेच खरं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. तुम्ही अजून लहान आहात. पण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लोक हा विचार करत नाहीत की, आपण लहान मुलाच्या पोस्टला प्रतिक्रिया देतोय. किंवा एखादा मित्र/मत्रीण मुद्दाम ‘बुिलग’ करण्यासाठीही वाईटसाईट प्रतिक्रिया देतात. त्यामुळे लोक काय विचार करतात, आपल्या दिसण्याबद्दल काय बोलतात, यावरून कधीही स्वत:विषयीचं मत ठरवू नका.

आज मी केनेथ शिनोझुका या मुलाची टेड टॉकची लिंक शेअर करतेय. केनेथच्या आजोबांना अल्झायमर होता. त्यांची काळजी घेणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. ते वेळी-अवेळी घराबाहेर पडायचे आणि हरवायचे. म्हणून मग केनेथने एक प्रेशर सेन्सर तयार केलं- जे आजोबांच्या पलंगापाशी ठेवता येईल. जेणेकरून त्यावर आजोबांचा पाय पडला तर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये अलर्ट वाजेल आणि त्या व्यक्तीला आजोबा उठले आहेत याची माहिती मिळू शकेल. डिमेन्शिया आणि अल्झायमर झालेल्या रुग्णांसाठी त्याला सेंसर बेस्ड टेक्नॉलॉजी तयार करायची आहे. या विषयात त्याने बरंच संशोधनही केलं आहे. त्याने काय काय प्रयोग केले आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.ted.com/talks/kenneth_shinozuka_my_simple_invention_designed_to_keep_my_grandfather_safe/transcript ही लिंक वापरू शकता. ऐका, वाचा, बघा, मजा करा!

 

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)