डॉ. अपर्णा महाजन

खूप खूप वर्षांपूर्वी एका छोटय़ा शहरात एक राक्षस राहत होता. महालासारखं भलंमोठ्ठं घर होतं त्याचं. आणि घरापुढे खूप मोठ्ठी सुंदर बाग. त्या बागेत सगळीकडे हिरवंगार, लुसलुशीत गवत होतं. त्यातून चांदण्यासारख्या फुलांची झाडं डोकावत. पीचची खूप झाडं होती. वसंत ऋतू आला की सगळी झाडं मोतिया गुलाबी रंगाच्या मोहरांनी भरून जात आणि हिवाळ्यात सोनेरी पीच फळांनी झाडं लगडून जात. हरतऱ्हेचे पक्षी तिथे येत, मनमुराद गाणी म्हणत.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता
Eight year old child molested in Khandeshwar
खांदेश्वर येथे आठ वर्षांच्या बालकावर अत्याचार

त्या बागेत शेजारच्या शाळेतून, शाळा सुटल्यावर छोटी मुलं खेळायला येत. पक्ष्यांची शीळ ऐकता ऐकता म्हणत, ‘‘कित्ती मज्जा येतेय ना या बागेत?’’ गेली सात वर्षे त्या घरात राक्षस राहिलाच नव्हता. तो त्याच्या चेटकीण मत्रिणीकडे राहायला गेला होता. सात वर्षे पोटभर गप्पा मारून झाल्यावर त्याला आपल्या घराची, बागेची आठवण आली आणि त्याने परतायचं ठरवलं. घरी येऊन बघतोय तर काय? ही सारी छोटी मुलं त्याच्या बागेत मनसोक्त  हुंदडत होती. खेळत होती. झाडावर चढून झोके घेत होती.

‘‘काय रे पोरटय़ांनो, काय करताय इथे? पळा येथून..’’ तो कडाडला. आणि मुलांनी धूम ठोकली.

‘‘ही माझी एकटय़ाची बाग आहे. एकटय़ाची म्हणजे अगदी फक्त माझीच. दुसऱ्या कुण्णी इथे येता कामा नये. मीच एकटा खेळणार माझ्या बागेत.’’ असं स्वत:शी पुटपुटत तो त्याच्या महालात आला. तातडीने त्याने घराच्या चारी बाजूंनी मोठ्ठी भिंत बांधून घेतली आणि मोठ्ठय़ा अक्षरात सूचना लिहिली, ‘‘परवानगीशिवाय येणाऱ्यावर सक्त कारवाई केली जाईल.’’

असा अत्यंत स्वार्थी राक्षस होता तो.

बिच्चारी मुलं! त्यांना खेळायला जागाच नव्हती. मग ते रस्त्यावर खेळत. पण दगडामातीच्या रस्त्यावर त्यांच्या नाजूक पायांना खडे बोचत. मग ते त्या भल्यामोठ्ठय़ा भिंतीभोवती फेऱ्या मारत आणि नाराजीच्या सुरात म्हणत, ‘‘कित्ती मज्जा यायची ना आपल्याला आतल्या बागेत!’’

म्हणेम्हणेपर्यंत वसंत ऋतू आला. आजूबाजूची सगळी झाडं नव्या पालवीने भरून गेली. मात्र या स्वार्थी राक्षसाच्या बागेतून हिवाळा गेलाच नाही. तिथे ना झाडांना नवी पालवी आली, ना फुलं. त्यामुळे पक्षी नाहीत, पक्ष्यांची गाणी नाहीत. फक्त गोठवणारी थंडी आणि थंडी. एकदा चुकून एका फुलांनी मान वर काढली, पण ती सूचना बघून त्याला मुलांबद्दल खूपच वाईट वाटलं. मुलं येणार नाहीत आता, म्हणून पुन्हा ते गवतात डोकं खुपसून झोपी गेलं.

सगळं कसं थंड, शांत, चतन्यहीन! असंच वातावरण आवडणारे दोघजण आले तिथे. एक होतं बर्फ आणि दुसरा हिम. एकमेकांना टाळ्या देऊन म्हणाले, ‘‘र्अे, या बागेला वसंत ऋतू विसरलेला दिसतोय! आपल्यासाठी बरंच झालं नं! चल, आता वर्षभर इथेच मुक्काम ठोकू! मग बर्फाने सगळ्या बागेवर पुन्हा एक बर्फाची जाड चादर पांघरली. हिमानी सगळ्या झाडांवर हिमकणांची पखरण केली. त्यांनी आपल्या आणखी दोन मित्रांना बोलवायचा घाट घातला. उत्तरेकडचा अतिथंड वारा आणि गारा. अंगभर लोकरीचे कपडे गुंडाळून, स्वत:ला गुरगुटून, लपेटून आला वारा आणि करडय़ा रंगाच्या गाराही आल्या टणाटण वर्षांव करत. नुसता धुमाकूळ घातला तिथे चौघांनी.

राक्षस दुलयांवर दुलया पांघरून, थंडीने गारठून खिडकीच्या बाहेर बघत स्वत:शी म्हणाला, ‘‘यंदा, वसंत ऋतूला एवढा का वेळ लागला बरे?’’ त्याची बर्फाच्छादित पांढरीशुभ्र बाग बघून त्याला उन्हं यावीत, बाग बहरावी, असं वाटे. पण वसंत ऋतू रुसून बसला होता जणू! बाहेर, इतर झाडांची फळे पाडाला लागून, सोनेरी झाली होती. पण या राक्षसाच्या बागेत ना फुलं, ना फळं! थंडीने गारठून अंथरुणात उशिरापर्यंत लोळत पडलेल्या राक्षसाला, एके दिवशी लीनेट पक्ष्याच्या मंजुळ शीळेनी जाग आली. त्याच्या बेडरूमच्या खिडकीखाली बसून लीनेट आनंदाची गाणी म्हणत होता. त्याच्या शीळेनी, वसंत आला की काय असे वाटून,  बर्फ, हिम, गारा, वारा गेले घाबरून.. पळालेच धूम बागेबाहेर.

राक्षसाने उडीच मारली आनंदात. ‘‘अरे, आला रे आला, वसंत ऋतू!’’ म्हणत बाहेर आला. बाहेर पाहिले तर काय? त्याच्या कडेकोट भिंतीला एक छोटासा बोगदा पाडला होता आणि त्यातून वाकून वाकून, छोटी मुले सरपटत बागेत आली होती. झाडांच्या फांद्या पकडून कोणी झोके घेत होते, कोणी घोडाघोडा खेळत होतं. सगळी झाडे जादू झाल्यासारखी पानाफुलांनी डवरली होती. झाडांनासुद्धा किती विलक्षण आनंद झाला होता! पानंफुलं, पक्ष्यांचा चिवचिवाट.. सगळीकडे नुसता आनंदीआनंद, चतन्य आणि उत्साह भरून गेला होता.

मात्र, दूरवर एका कोपऱ्यात एक झाड तसेच होते. बर्फाने, हिमाने  झाकलेले. आणि त्या झाडाभोवती एक छोटा मुलगा फेऱ्या मारत होता, एखादी फांदी हाताला लागेल या आशेने. पण त्याचा हातच पोचत नव्हता. झाडही त्याला जमेल तेवढं वाकून मदत करायचा प्रयत्न करत होतं. ‘‘चढ, चढ.. पकड फांदी,’’ म्हणत होतं. पण तो फारच चिमुकला होता. उडी मारूनही त्याला फांदी हाताला येत नव्हती.

राक्षसाने सगळीकडे नजर फिरवली. ‘‘कित्ती स्वार्थी होतो मी! आत्ता कळले मला वसंत का रुसला होता बागेवर ते..’’ त्याने त्या छोटय़ा मुलाकडे पाहिले आणि त्याच्या मनात खूप प्रेम दाटून आले. त्याला झाडावर बसवू आणि आधी ती भिंत पाडून टाकू असा विचार करत तो बागेत आला. मुलं खूप घाबरली त्याला. जीव मुठीत धरून धूम पळाली. मुलं गेल्यागेल्या पुन्हा बर्फाचा पाऊस सुरू झाला. तो छोटा मुलगा मात्र तिथेच होता थांबलेला. डोळ्यातल्या पाण्यामुळे त्याला राक्षस येताना दिसलाच नाही. पाठीमागून हळूच राक्षसाने त्याला उचलले आणि काळजीपूर्वक फांदीवर बसवले. आणि एका क्षणात कडकड होत सगळं बर्फ वितळून गेलं. पुन्हा फुले फुलली, पक्षी गाणी म्हणू लागले. त्या मुलाने आपले चिमुकले हात राक्षसाच्या गळ्यात टाकले आणि त्याची पापी घेतली. हे बघणारी बाकी मुले बिचकत बिचकत पुन्हा आत आली. ‘‘मुलांनो, आत्तापासून ही बाग तुमची रे..’’ असे सांगितले आणि मुलांनी आनंदानी एकच गिल्ला केला. राक्षसही त्यांच्याबरोबर खेळू लागला. सगळीकडे आनंदाचे राज्य पसरले. जाताना सगळे राक्षसाला टाटा करून गेले. पण तो छोटा मुलगा काही राक्षसाला दिसला नाही. त्याने सगळ्यांना विचारले. पण तो कोण, कुठे राहतो, त्याचे नाव काय कोणालाच माहीत नव्हते. तो राक्षसाला फार प्रिय होता. कारण आयुष्यात इतकी गोड पापी घेणारा आणि घट्ट मिठी त्याला मारलेला एवढा एकमेव मुलगा होता. राक्षसाला त्याची खूप आठवण येई. तो त्याची दररोज वाट पाहत असे.

म्हणता म्हणता कित्ती दिवस, कित्ती वर्षे गेली. राक्षस आता म्हातारा झाला होता. त्याला मुलांच्यात खेळता येईना, पळता येईना. मग तो त्याच्या मोठ्ठय़ा आरामखुर्चीत निवांत बसून मुलांचे खेळ पाहत बसे.

एका हिवाळ्यात पहाटे, असंच तो खिडकीतून बाहेर पाहत बसला होता. ‘‘र्अे!’’ त्याने आश्चर्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळून पहिले. काय बघत होता तो! त्या दूरवरच्या कोपऱ्यातले झाड आज वेगळेच दिसत होते. त्याच्या फांद्या सोनेरी दिसत होत्या आणि त्याला चंदेरी फळे लागली होती. शिवाय त्यावर चांदण्यांसारखी असंख्य छोटीछोटी पांढरी फुले आली होती. आणि.. आणि त्याच झाडाखाली त्याचा तो लाडका छोटू उभा होता.

त्याला पाहताच, होत्या नव्हत्या शक्तीनिशी तो जवळजवळ पळतच त्याला भेटायला गेला. जवळ जाऊन पहिले तर त्याच्या इवल्या हातांवर आणि पायांवर नखांनी ओरबाडल्यामुळे रक्त आले होते. राक्षसाचा जीव कळवळला. ‘‘कोणी केलं असं? मला सांग. मी तलवारीने त्याला मारूनच टाकतो’’. छोटू म्हणाला, ‘‘नाही.. नाही. या तर प्रेमाच्या जखमा आहेत अरे!’’

त्याच्या या बोलण्याने राक्षसाला समजले हा सर्वसामान्य मुलांपेक्षा कोणीतरी वेगळा आहे.. छोटूलाही कळले,  राक्षसाला जाणवले ते. तो मंद गोड हसला आणि म्हणाला, ‘‘मला तू तुझ्या बागेत खेळू दिलंस मागच्या वेळी. आता मी तुला माझ्या स्वर्गातल्या बागेत घेऊन जायला आलोय. चल.’’

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मुले आली. त्यांचा राक्षस मित्र दिसला नाही म्हणून त्याला शोधू लागली. आणि त्यांना त्या दूरवरच्या कोपऱ्यातल्या झाडाखाली राक्षस निपचित झोपलेला दिसला. शांत, प्रसन्न चेहऱ्याने आणि त्याच्या अंगावर झाडावरची चांदण्यासारखी पांढरी फुले विखुरल्यासारखी पडलीयत. त्यांना जाणवले की आता राक्षस आपल्याबरोबर परत कधीच खेळणार नाही. विस्फारलेल्या आणि अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी सगळे आपल्या दोस्ताकडे पाहत होते.

(ऑस्कर वाइल्ड यांच्या ‘द सेल्फिश जायंट’ या कथेचा स्वैर अनुवाद.)

aparnavm@gmail.com