मुक्ता चैतन्य

एव्हाना तुम्हा सर्वाना सुट्टय़ा लागल्या असतील. सुट्टीत कुणाचं मामाच्या गावाला जायचं प्लॅिनग झालं असेल, तर कुणाचं समर कॅम्पला. कुणी घरीच इतर भावंडांबरोबर धम्माल करणार असतील, तर अजून कुणी अजून काही. मी लहान होते तेव्हा सुट्टय़ा पडल्या की मामाच्या गावाला जायचे. मग वाडय़ात यथेच्छ उंडारून झालं, आंबे हाणून झाले की कंटाळा यायला लागायचा. दुपारच्या रणरणत्या उन्हात मोठे बाहेर खेळू द्यायचे नाहीत, मग करायचं काय? मग आम्ही मुलं नाटुकल्या बसवत असू. आधी एखादी मस्त गोष्ट आम्हीच तयार करायचो, जरा मोठे ताई-दादा डायलॉग लिहून द्यायचे. कुणी एक ताई-दादा नाटक बसवायचे आणि मग आम्ही त्याचे वाडय़ातल्या वाडय़ात प्रयोग लावत असू. नुसती धम्माल! त्यानिमित्ताने मेकअपच्या गोष्टी मिळायच्या. राजा-राणीचं नाटक असेल तर मामीच्या कपाटातल्या साडय़ा मिळायच्या. फुल टू टाइमपास. दुपार कुठल्या कुठे पळून जायची. शिवाय तेव्हा साधेसे कॅमेरेही असायचे घरात. मग कुणी तरी ताई-दादा आमच्या नाटकबाजीचे फोटोही काढायचे. तुम्ही करता की नाही नाटक? कुठल्या नाटय़शिबिराला जाऊन नाही, घरीच सगळी भावंडं, मित्रमत्रिणींना जमवून एखादी गोष्ट रचून ती इम्प्रुवाइज करत नाटक उभं करून बघा, खूप मज्जा येते. आता तर काय तुमच्या हातात स्मार्टफोन आहे. या छोटुशा नाटकाच्या मेकिंगचा आणि प्रत्यक्ष नाटकाचा व्हिडीओही तुम्ही तयार करू शकता. किंवा एखादा तुमच्या आवडीचा विषय घेऊन शॉर्ट फिल्म बनवू शकता. मोबाईलवर शूटिंग करून मग एडिटिंग अ‍ॅप्लिकेशन्स वापरून ती फिल्म एडिटही करू शकता. सुट्टीचा प्रोजेक्ट म्हणून असं एखादं नाटक किंवा शॉर्ट फिल्म बनवायला काय हरकत आहे? दर वेळी कुठल्या तरी कॅम्पला कशाला जायला हवं, चार मित्रमत्रिणी गोळा करून आपणच कॅम्प निर्माण करू शकतो की घरच्या घरी!

या नाटकाच्या आणि शॉर्ट फिल्मच्या मेकिंगमध्ये अधूनमधून कंटाळा आलाच समजा, किंवा एखाद् दिवशी काही न करता नुसतंच लोळत पडावंसं वाटलं (मला माहीत आहे तुम्हाला लोळत पडायला आवडतं. वर्षभर शाळा आणि क्लासेसच्या मागे धावल्यावर सुट्टीत अधूनमधून लोळत पडना तो मंगता है! बरोबर!!) तर एकीकडे यूटय़ूबवरच्या काही धमाल शॉर्ट फिल्म्स नक्की बघा. यूटय़ूबवर लहान मुलांसाठीच्या शॉर्ट फिल्म्सचा अक्षरश: खजिना आहे. यूटय़ूबवर गेल्यावर अ‍ॅवॉर्ड वििनग शॉर्ट फिल्म्स फॉर चिल्ड्रेन असा सर्च टाका, जगभरातल्या एक सो एक फिल्म्स बघायला मिळतील. आजच्या भागात अशाच भन्नाट ६ फिल्म्सच्या िलक्स मी तुम्हाला देणार आहेच, पण या फिल्म्सबरोबरच अजूनही विविध विषयांवरच्या खूप चांगल्या शॉर्ट फिल्म्स यूटय़ूबवर आहेत त्या नक्की बघा. म्हणजे तुमची शॉर्ट फिल्म बनवायलाही तुम्हाला मदत होईल आणि जगभरातल्या शॉर्ट फिल्म्स एका क्लिकवर तुम्हाला बघता येतील.

सुट्टीत सारखा कशाला हवा ना अभ्यास? सारखं कशाला हे शिक आणि ते शिक. मग अशा वेळी मित्रमत्रिणी, भावंडांच्या सोबतीने या शॉर्ट फिल्म्स नक्की बघा.

रेड अलर्ट

‘तुम्हाला पिझ्झा, बर्गर, चिप्स खाऊ नका,’ असं कुणी म्हणतं का? पण समजा, तुम्ही रोज सकाळ-संध्याकाळ जंक फूड खायला लागलात तर काय होईल? डिजिटल मीडिया जंक फूडसारखा आहे. जंक फूड किती खायचं आणि किती वेळा खायचं हे जसं आई ठरवत असते ना, तसंच डिजिटल मीडिया किती वापरायचा हे ठरवणं गरजेचं आहे आणि तुम्ही मुलंही ते ठरवू शकता. दर वेळी आई-बाबांनी आपल्यासाठी नियम कशाला करायला हवेत. रोज जंक फूड खाल्लं तर आपण आजारी पडू शकतो हे आपल्याला माहीत आहे, हो ना! तसंच डिजिटल मीडियाचा सतत वापर केला तरीही आपलं शरीर आजारी पडू शकतं. रात्री अंधारात मोबाईल वापरला की डोळ्यांच्या आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात. सतत मोबाईलमध्ये घुसून बसलं की पाठीच्या आणि बोटांच्या हालचालींच्या समस्या उद्भवू शकतात, मान दुखायला लागते. डिजिटल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या इतर इमोशनल प्रॉब्लेम्सची चर्चा आपण नंतर करणार आहोत, पण शारीरिक त्रासही सुरू होतात. ते आपण स्वत:ला का चिकटवून घ्यायचे ना! त्यामुळे सगळी डिजिटल गॅजेट्स वापरायची, पण थोडा वेळच. त्यामुळे तुम्हाला नीट झोप लागत नाहीये, डोळे चुरचुरायला लागलेत, पाठ, मान दुखतेय असं वाटलं तर सरळ गॅजेट ठेवून द्यायचं आणि आई-बाबांना सांगायचं. म्हणजे त्यावर आवश्यक उपाय, व्यायाम ते तुम्हाला सांगू शकतील. सो, सुट्टीत शाळा नाहीये, क्लासेस नाहीयेत, ऊन खूप आहे म्हणून सदासर्वदा गॅजेट्समध्ये डोकं घालून बसू नका.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)