आपण रोज विविध प्रकारचे आवाज ऐकत असतो. या आवाजांची आपल्या कानाला जाणवणारी पट्टीही वेगवेगळी असते. या वेगळेपणाचा उगम आपण या प्रयोगात पाहणार आहोत.

साहित्य : सारख्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या पाच बाटल्या, पाणी.
 कृती : एक बाटली पूर्णपणे रिकामी ठेवून उरलेल्यातली एकेक बाटली पाण्याने पाव, अर्धी, पाऊण आणि बाटलीच्या गळ्यापर्यंत पूर्ण भरा. दोन बाटल्यांमध्ये साधारण चार बोटे अंतर ठेवून त्या पाचही बाटल्या एका ओळीत ठेवा. मग एकेका बाटलीच्या उघडय़ा तोंडाजवळ ओठ नेऊन जोराने फुंकर मारा. प्रत्येक बाटलीतून येणारा आवाज काळजीपूर्वक ऐका.
हाच प्रयोग तुम्ही बाटल्यांची संख्या वाढवून अधिक वेगवेगळ्या पातळ्यांपर्यंत पाणी भरून करून पाहा.
एकच बाटली उपलब्ध असेल तर त्याच बाटलीत आळीपाळीने वेगवेगळ्या पातळ्यांपर्यंत पाणी भरून प्रयोग करा.
वेगवेगळ्या आकारांच्या बाटल्या घेऊन हाच प्रयोग करून त्यातून येणाऱ्या आवाजांचे वैविध्य अनुभवा.
वैज्ञानिक तत्त्व – बाटलीच्या तोंडाशी जेव्हा तुम्ही फुंकर मारता तेव्हा बाटलीतल्या हवेत तुम्ही मारलेल्या फुंकरीमुळे कंपने निर्माण होतात. बाटलीतल्या हवेची उंची जेवढी जास्त तेवढी त्या बाटलीतल्या हवेतली कंपने सावकाश होतात. त्यामुळे तो आवाज खालच्या पट्टीतला येतो. याउलट, ज्या बाटलीत जास्त पाणी भरलेले असते, म्हणजेच बाटलीतल्या हवेची उंची कमी असते, त्या बाटलीतल्या हवेतली कंपने झपाटय़ाने होतात. त्यामुळे तो आवाज वरच्या पट्टीतला येतो.
‘जलतरंग’ या भारतीय वाद्यामध्ये याच तत्त्वाचा वापर केलेला असतो.