News Flash

पिटुकला सिंह आणि मोठ्ठा उंदीर

बाबा, मला आज यार्दी मावशींनी गोष्ट सांगितली.

पिटुकला सिंह आणि मोठ्ठा उंदीर

प्रा. हेमंत पाटील
‘‘बाबा, मला आज यार्दी मावशींनी गोष्ट सांगितली.’’

‘‘कोणती?’’

‘‘घरडा पोपट! मला खूप आवडली.’’

‘‘घरडा पोपट? ही कोणती गोष्ट?’’

‘‘अहो, गुजरातीत घरडा म्हणजे म्हातारा. ती नाही का पोपटाची गोष्ट! एक म्हातारा पोपट इतर तरण्या पोपटांना शहाणपणाचे बोल सांगत असतो, की पारध्याच्या जाळ्यावर कधी बसू नये. आणि जर बसलात, तर एकत्र उडून जायचं. ती गोष्ट यार्दी मावशींनी आज सिद्धीला सांगितली.’’

‘‘म्हणजे सिद्धीला गोष्टी आवडतात तर! असं असेल तर मी तिला आजपासून रात्री झोपताना एक तरी गोष्ट सांगणार. पाहू या तिला मी सांगितलेली गोष्ट आवडते का?’’

‘‘तुमचं काय बाप-लेकीचं गुळपीठच आहे. गोष्ट सांगून झाल्यावर तुमचं ‘अहो रूपम.. अहो ध्वनी!’ सुरू होईलच.’’

‘‘असं असेल तर गोष्टीनंतर तू तुझं नेहमीप्रमाणे देतेस तसं परखड मत देणारच. त्यामुळे फिट्टम्फाट!’’

‘‘नाही. मी काही लगेच देणार नाही माझं मत. काही दिवस ऐकून मगच सांगणार. आहे का तुमच्याजवळ तेवढा गोष्टींचा साठा?’’

‘‘बघ तू आता. रोज एक नवीन गोष्ट ऐकायला मिळेल तुम्हा माय-लेकींना!’’

‘‘सिद्धी, विनाकारण दुसऱ्याला त्रास दिला तर काय होतं माहिती आहे तुला?’’

‘‘नाही माहिती बाबा!’’

‘‘तर मग ऐक.. उंदीर आणि सिंहाची गोष्ट! फार फार पूर्वी की नाही, उंदीर हा आजच्याएवढा बारकुडा नव्हता, तर तो चक्क सिंहाएवढा मोठा होता.’’

‘‘आणि सिंह केवढा होता?’’

‘‘सिंह एकदम पिटुकला होता.’’

‘‘सिंह एवढा लहान? मग तो मोठा कसा झाला?’’

‘‘तीच तर मजेची गोष्ट आहे! आता लक्ष देऊन ऐक. उंदीर आकाराने खूपच मोठा असल्यामुळे आणि त्याला खूप सारी शक्ती असल्यामुळे भयंकर गर्व झालेला होता. तो येता-जाता इतर छोटय़ा छोटय़ा प्राण्यांना खूप त्रास द्यायचा. बिचाऱ्या सिंहाला तर फारच! कुठे सिंहाचं शेपूट धरून त्याला फेकून दे.. नाहीतर तोंडाजवळ आणून ‘मी तुला आता खाणार!’ म्हणून पंजाने उचलून तोंडाजवळ नेणार. जिवाच्या भीतीने थरथर कापायचा तो पिटुकला सिंह! त्याचं घाबरणं बघून उंदीर खो-खो हसायचा. हे असं खूप दिवस चाललं. मग एके दिवशी त्याला कोल्ह्यने सांगितलं की, ‘तू देवाकडे तुझी तक्रार घेऊन जा. तो तुला न्याय देईल.’ त्याप्रमाणे सर्व छोटे छोटे पिटुकले सिंह जंगलातील देवाच्या मंदिरात गुपचूप गेले. त्यांनी हात जोडून देवाची करुणा भाकली. देवाला त्यांची दया आली. त्याने सर्व सिंहांना तिथे येण्याचं कारण विचारलं. कारण कळताच देवाने उंदराला बोलावून घेतलं आणि ‘तू सिंहाला का छळतोस?’ असं विचारलं. उंदीर फार मस्तवाल झालेला होता. त्याने देवालाही जुमानलं नाही. उलट असं उत्तर दिलं की, ‘देवा, तूच मला मोठं आणि शक्तिशाली केलं आहे. तेव्हा मी माझी शक्ती या लहानग्या सिंहाला दाखवणारच. शिवाय मला फार आनंद होतो, जेव्हा जेव्हा हे छोटे प्राणी मला पाहून घाबरतात. तसंही या पिटुकल्या सिंहाने मला घाबरलंच पाहिजे. नाही तर मग माझ्या मोठं असण्याला अर्थच काय?’

हे ऐकताच देव रागावला. त्याने लगेच उंदराला शाप दिला.. ‘ज्या मोठय़ा आकारामुळे तू उर्मट आणि बेताल झालेला आहेस, तो आकारच मी आता काढून घेतो? यापुढे तू सिंहाएवढा लहान होशील आणि सिंह तुझ्याएवढा मोठा होईल. त्याला मानेवर छान आयाळ येईल. तू मात्र पिटुकला होऊन सर्वाना घाबरून बिळात लपून राहशील. सिंह त्याच्या नव्या रूपात दिमाखदारपणे सर्वत्र फिरेल. त्याला कोणाचीही भीती वाटणार नाही.’

‘‘त्याप्रमाणे उंदीर हा आत्ता दिसतो एवढा पिटुकला झाला आणि सिंह आपण जंगलात बघतो तसा बलशाली झाला. एवढा मोठा होऊनही तो कधी उंदराला स्वत:हून त्रास देत नाही. उलट, उंदीरच त्याच्या जुन्या सवयीप्रमाणे सिंह  झोपलेला असताना त्याची आयाळ  कुरतडतो. त्यामुळे उंदराला साप मारून खाऊन टाकतो.’’

‘‘बाबा, यावरून आपण काय बोध घ्यायचा?’’

‘‘हेच- की मोठं झालं म्हणून उगाच लहानांवर ओरडायचं नाही आणि त्यांना छळायचं नाही.’’

‘‘मग आईला सांगा ना- की मला येता-जाता ओरडू नकोस आणि सारखी कामं सांगू नकोस म्हणून. नाहीतर ती लहान होईल आणि मी मोठी!’’

‘‘उलट, गेल्या जन्मी आपण दोघी मैत्रिणी असूनही तू तेव्हा माझं अजिबात ऐकलं नाहीस, म्हणून या जन्मी तुला माझी मुलगी केलेली आहे. कारण मुलीला आईचं आयुष्यभर ऐकावं लागतं. त्यातून सुटका नाही.’’

‘‘बापरे, माझं कायम नुकसानच होणार का हो, बाबा?’’

‘‘नुकसान कसं? तू आईचं ऐकणार. दोन्ही वेळेस ती तुला चविष्ट आणि भरपेट जेवण खाऊ घालणार. तुझ्यावर खूप खूप प्रेम करणार!’’

‘‘मग चालेल आईने मला ओरडलं तरी आणि काम करून घेतलं तरी! मला नाही बदलायचा माझा मुलीचा लहान आकार. राहू दे आईला मोठीच!’’

patilhs57@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2021 1:12 am

Web Title: small lion and big rat stories ssh 93
Next Stories
1 चमत्कार? नव्हे, विज्ञान!
2 निसर्गाशी कट्टी? नाही, गट्टी!
3 मन आनंद आनंद छायो!
Just Now!
X